डिजिटल जनगणना राबवण्यासाठी सरकारची तयारी सुरू

देशातील आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत जनगणना प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, नोंदणी महासंचालक, तसेच विविध संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जनगणना ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून त्याद्वारे देशातील लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक स्थिती, रहिवास पद्धती आणि स्थलांतराची माहिती मिळते. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि गतिमान होण्यासाठी यंदा विशेष नियोजन करण्यात येत आहे.

गृहमंत्री शहा यांनी यावेळी सांगितले की, आगामी जनगणना ही डिजिटल पद्धतीने राबविण्याचा सरकारचा संकल्प असून, त्यासाठी विशेष अ‍ॅप आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. नागरिकांना स्वतःहून माहिती भरता येईल अशी प्रणाली देखील तयार केली जात आहे. यामुळे जनगणना अधिक सुलभ आणि विश्वासार्ह होणार आहे.

तसेच, जनगणनेत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत यासाठी प्रशिक्षण, जनजागृती, आणि क्षेत्रीय समन्वय अधिक प्रभावी करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद करत अमित शहा यांनी सर्व राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.

जनगणना ही केवळ लोकसंख्येची नोंद नसून, ती देशाच्या विकास धोरणांना दिशा देणारी प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.







21,993