अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी सरकारचा कठोर निर्णय

राज्यात अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण आणि त्यातून होणाऱ्या सामाजिक परिणामांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महायुती सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात आता ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोकण आणि इतर भागांमध्ये अंमली पदार्थांचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्याचा गंभीर फटका तरुणाईला बसत आहे. केवळ तस्करीच नव्हे, तर शाळा, महाविद्यालय परिसरात ड्रग्स पोहोचत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले की, “राज्य सरकार अंमली पदार्थांच्या विरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेत आहे. अशा तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध ‘मकोका’सारख्या कडक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.”
‘मकोका’ अंतर्गत आरोपीवर संघटित गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा ठपका ठेवता येतो, आणि त्यामुळे जामीन नाकारला जाऊ शकतो तसेच दीर्घकालीन शिक्षा होऊ शकते. यामुळे अंमली पदार्थांचा साखळी व्यवहार मोडून काढणे शक्य होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, विशेष शाखा आणि अंमली पदार्थविरोधी पथकांना यासंबंधी विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. किरकोळ विक्रेते नव्हे, तर तस्करीच्या मुळाशी असलेल्या सूत्रधारांवर थेट मकोका लावण्याच्या सूचना आहेत.
अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे गुन्हेगारी वाढ, तरुणाईचे नाश, आणि समाजातील असुरक्षिततेची भावना वाढीस लागते. त्यामुळे या निर्णयाचे समाजातून स्वागत होत असून, कठोर कारवाईची गरज असल्याचे मत विविध स्तरांवरून व्यक्त होत आहे. अंमली पदार्थांविरोधातील लढ्यात राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले असून, आता तस्करांविरोधात थेट ‘मकोका’ लागू केला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील गुन्हेगारी टोळ्यांना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवली जाणार असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.