इस्रायलकडून संरक्षण मंत्रालयावर हवाई हल्ला

इस्रायलने सिरियाच्या राजधानी दमिश्कवर तीव्र हवाई हल्ला करत सिरियन लष्कराच्या मुख्यालयासह संरक्षण मंत्रालयाचा परिसर लक्ष्य केला आहे. या कारवाईमागील कारण म्हणून दक्षिण सिरियात सुरु असलेल्या ड्रूझ समाजावरील दबाव आणि त्यांचे संरक्षण याचा उल्लेख इस्रायली लष्कराने केला आहे.

या हल्ल्यामुळे किमान तीन नागरिक मृत्यूमुखी पडले आणि ३० हून अधिक जण जखमी झाल्याचे सिरियाच्या अधिकृत सूत्रांनी जाहीर केले आहे. राजधानीत जोरदार स्फोटांचे आवाज ऐकायला मिळाले असून, काही ठिकाणी इमारतींचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.

दक्षिण सिरियात ड्रूझ आणि बेदुइन समुदायांमध्ये निर्माण झालेल्या संघर्षामुळे तणावाचे वातावरण आहे. इस्रायलने या पार्श्वभूमीवर हस्तक्षेप करत सीमाभागातील स्थितीला “धोकादायक” ठरवत ही कारवाई केल्याचे सांगितले. “ड्रूझ समाजावर होणाऱ्या आक्रमणांना थांबवण्यासाठी आम्ही सक्रिय झालो आहोत,” असे वक्तव्य इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यांनी केले.

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या हल्ल्याचे समर्थन करत म्हटले की, “इस्रायल शांततेचा पुरस्कर्ता आहे, परंतु आमच्या सीमेला आणि समाजाला धोका निर्माण करणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही. ही कारवाई योग्य वेळी दिलेले प्रत्युत्तर आहे.”

या घटनेनंतर अमेरिका, युरोपीय संघ आणि संयुक्त राष्ट्र संघाने दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि तणाव वाढू न देता शांततेच्या दिशेने पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे. दरम्यान, दमिश्क परिसरातील काही आंतरराष्ट्रीय तपास मोहिमा आणि मदत उपक्रम तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहितीही मिळत आहे.






184 वेळा पाहिलं