
रशियाने युक्रेनच्या उत्तरेतील सीमेलगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर सैनिकी हालचाली सुरू केल्या असून, पन्नास हजारांहून अधिक विशेष प्रशिक्षित सैनिक या भागात तैनात केले आहेत. युक्रेनच्या लष्करप्रमुख जनरल ओलेक्सांद्र सिरस्की यांनी ही माहिती दिली.
सिरस्की यांच्या मते, रशिया सध्या संख्येच्या जोरावर दबाव निर्माण करण्याचे धोरण अवलंबत असून, युक्रेनच्या संरक्षण यंत्रणेला थकवण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे, या भागात रशियन फौजांची संख्या युक्रेनी सैन्याच्या तुलनेत तिप्पट आहे.
युक्रेनच्या सम्यी प्रांतातील सीमा भागात रशियाच्या लष्कराने आक्रमणाची तयारी सुरू केली असून, युक्रेनने काही भागांत रशियन सैनिकांना परत ढकलल्याचा दावा केला आहे. तसेच, रशियाने या सीमेवर बंकर, तटबंदी, आणि तांत्रिक अडथळे उभारण्याचे कामही सुरू केले आहे.
दररोज या संघर्षात तीनशे ते चारशे रशियन सैनिक मारले जात असल्याचेही युक्रेनने म्हटले आहे. तरीही, रशियाची हालचाल थांबलेली नाही. या भागात तोफखाना, ड्रोन, आणि क्लस्टर बाँब यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
रशियाच्या या वाढत्या हालचालींना उत्तर देण्यासाठी युक्रेनने सीमावर्ती भागात नवीन संरक्षण व्यवस्था, भक्कम तटबंदी, आणि ड्रोनविरोधी उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. रशियाच्या संभाव्य आक्रमणाला थोपवण्यासाठी हे पावले उचलली जात आहेत.