
भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल भारत’ अभियानाला अकरा वर्षे पूर्ण झाली असून, या कालावधीत देशाने डिजिटल परिवर्तनाचा व्यापक आणि प्रभावी प्रवास पूर्ण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१५ साली या अभियानाची सुरुवात झाली होती. आज हे अभियान देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीचे केंद्रबिंदू बनले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट करत या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “डिजिटल भारताच्या माध्यमातून देशाला केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात आले नाही, तर सामान्य नागरिकालाही डिजिटल व्यवहार, सेवा आणि संवादासाठी सज्ज करण्यात आले आहे.”
अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आरोग्य, शिक्षण, बँकिंग, शासनसेवा, शेतकरी सेवा, व्यवसाय, व्यवहार अशा प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर डिजिटल क्रांती झाली आहे. सरकारी सेवांमध्ये पारदर्शकता आली असून, लाभार्थ्यांपर्यंत थेट मदतीचा लाभ पोहोचू लागला आहे.