इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?
“दिनदर्शिकेवर दररोज एक तारीख बदलते… त्या प्रत्येक तारखेनं आपल्याला अनेक आठवणी, ऐतिहासिक वळणं आणि जगाला दिशा देणाऱ्या घटना दिल्या आहेत. इतिहासाचं पान उलटलं की त्यावर नोंदलेली प्रत्येक घटना काहीतरी नवीन सांगते — कधी समाज बदलला, कधी नवं तंत्रज्ञान आलं, तर कधी जगभर उलथापालथ झाली. चला तर मग, पाहूया आजच्या तारखेला या दिवशी इतिहासात काय काय घडलं होतं…”

*महाराष्ट्र विशेष दिन*
1997 : स्वातंत्र्यसैनिक नवलमल फिरोदिया यांचे निधन
नवलमल कुंदनमल फिरोदिया यांचा जन्म महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे झाला. पेश्याने ते एक वकील आणि एक उद्योगपतीही होते. ते स्वातंत्र्य चळवळीतही सक्रिय होते. फोर्स नावाची मोटार कंपनी त्यांनी सुरु केली. आज आपण रिक्षा पाहतो त्याची मूळ संकल्पना फिरोदिया यांच्या तीन चाकी टेम्पोतून जन्मली आहे.
2008 : साहित्यिक बाबुराव बागूल यांचे निधन.
बाबुराव बागुल हे आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. त्यांनी शोषित, उपेक्षितांच्या जीवनाचे भेदक चित्रण केले. त्यांचे ‘जेव्हा मी जात चोरली होती’ आणि ‘मरण स्वस्त होत आहे’ हे कथासंग्रह विशेष गाजले.
2012 : ‘माणिकराव गोडघाटे‘ – प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी यांचे निधन. (जन्म: 10 मे 1940) ‘ग्रेस’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले कवी म्हणजे माणिकराव गोडघाटे. मराठी साहित्यातील एक गूढ, दुःखवादी आणि अनन्यसाधारण कवी व ललित लेखक होते. ग्रेस यांनी यांच्या साहित्यातून दुःख, नॉस्टॅल्जिया आणि निसर्गाचे तरल पदर उलगडले. ‘वाऱ्याने हलते रान’ या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

1907 : ‘महादेवी वर्मा’ – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ यांचा जन्म.
महादेवी वर्मा या हिंदी साहित्यातील छायावादी युगाच्या प्रमुख कवयित्री, लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना त्यांच्या भावनिक काव्यामुळे ‘आधुनिक मीरा’ म्हटले जाते. ‘यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.
1972 : पहिली जागतिक संस्कृत परिषद सुरू.
नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पहिली जागतिक संस्कृत परिषद २६-३१ मार्च १९७२ या काळात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी भूषवले होते. संस्कृत भाषेचा वारसा, संशोधन आणि प्रसारासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जाते
1974 : गढवालमध्ये चिपको आंदोलन सुरू.
२६ मार्च १९७४ रोजी उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील हेनवलघाटी जवळच्या रेणी गावात गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलन सुरू झाले. कंत्राटदार झाडे तोडण्यासाठी आल्यावर, गौरा देवींनी २७ महिलांसह झाडांना मिठी मारून म्हणजेच चिपकून वृक्षतोड रोखली होती. हा लढा व्यावसायिक जंगलतोडीविरुद्ध आणि स्थानिक निसर्ग संरक्षणासाठी एक ऐतिहासिक महिला-नेतृत्त्वातील लढा बनला.

जागतिक जांभळा दिवस
जागतिक जांभळा दिवस म्हणजेच पर्पल डे हा दिवस अपस्मार या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट या आजाराविषयीचे गैरसमज दूर करणे आणि रुग्णांना पाठिंबा देणे हे आहे. कॅसिडी मेगन या मुलीने २००८ मध्ये या चळवळीची सुरुवात केली.
1971 : बांगलादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र .
बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन दरवर्षी २६ मार्च रोजी साजरा केला जातो, ज्याला ‘स्वातंत्र्य दिवस’ म्हणतात. या दिवशी पाकिस्तानपासून स्वतंत्र होऊन बांगलादेशाची निर्मिती घोषित करण्यात आली. शेख मुजीबूर रहमान यांनी या दिवशी पाकिस्तानी सैन्याविरुद्ध मुक्ती युद्धाची घोषणा केली होती, ज्यामध्ये भारताने निर्णायक मदत केली होती.
1973 : गुगल चे सह-संस्थापक लॅरी पेज यांचा जन्म.
लॉरेन्स एडवर्ड पेज हे एक अमेरिकन व्यापारी आणि संगणक शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सेर्गे ब्रिनसह गुगलची स्थापना केली. ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत.