सह्याद्री मराठी वाहिनी

संपादकीय धोरण व मार्गदर्शिका

सह्याद्री मराठी

संपादकीय ओळख व मार्गदर्शिका  —  दस्तऐवज १

हा दस्तऐवज उपसंपादकांसाठी आहे.

प्रत्येक सदराचे स्वरूप, आत्मा आणि लेखनाचे मापदंड येथे दिले आहेत.

मजकूर ढाचा चेकलिस्टसाठी दस्तऐवज २ पाहावा.

सदर १  |  आज दिनांक

◆ सदर ओळख

हे सदर वाचकाच्या दिवसाची सुरुवात आहे. पंचांग, राशी, दिनविशेष, सुभाषित आणि व्यंगचित्र — या पाच घटकांनी वाचकाला माहिती, उत्साह, आध्यात्मिक स्पर्श आणि हलकेफुलके हास्य मिळायला हवे. दिवस सुरू होण्याआधी वाचकाने हे उघडले पाहिजे.

◆ सदराचा आत्मा

“आजचा दिवस खास का आहे — हे वाचकाला सर्वात आधी आपल्याकडून कळले पाहिजे.”

◆ टोन

सकारात्मक, ऊर्जादायी, आत्मीय. जड शब्द नाहीत. वाचक सकाळी उठून हे वाचतो — त्याला उमेद मिळाली पाहिजे.

◆ उदाहरण

उदाहरण :

आजचे सुभाषित — “उद्योगाचे फळ लक्ष्मी, आळसाचे फळ दारिद्र्य” — हे फक्त सुभाषित म्हणून नको, त्याचा आजच्या जगण्याशी अर्थ सांगा.

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  पंचांग अचूक असावे — एक आकडा चुकला तर विश्वास जातो

✔  दिनविशेषात महाराष्ट्र, देश, जग — तिन्ही असावे

✔  सुभाषिताचा अर्थ सोप्या भाषेत — संस्कृत कळत नाही सर्वांना

✔  टवाळखोरमध्ये आजच्या घटनेचा संदर्भ असावा — जुने चालत नाही

✔  राशी भाकीत — सकारात्मक कोन घ्या, भीती दाखवू नका

✖  पंचांग copy-paste नको — स्रोत तपासा

✖  दिनविशेष म्हणजे Wikipedia नव्हे — निवडकता हवी

✖  सुभाषित फक्त छापणे नको — अर्थ नाही तर मूल्य नाही

✖  टवाळखोर राजकीय द्वेषावर आधारित असू नये

✖  राशीत “आजचा दिवस वाईट” असे थेट लिहू नका

सदर २  |  बातम्या

◆ सदर ओळख

बातम्या हा सदराचा कणा आहे. महाराष्ट्र, देश, जग — तीन वर्तुळांत वाचकाला माहिती द्यायची आहे. येथे तथ्य सर्वोच्च आहे. मत नाही, अतिरंजन नाही, पक्षपात नाही.

◆ सदराचा आत्मा

“बातमी म्हणजे आरसा — त्यात वास्तव दिसायला हवे, उपसंपादकाचे प्रतिबिंब नाही.”

◆ टोन

तटस्थ, स्पष्ट, थेट. पहिल्या वाक्यात मुख्य माहिती. विशेषणे कमीत कमी. वाचकाला स्वतः निर्णय घेऊ द्या.

◆ उदाहरण

उदाहरण :

चुकीचे : “सरकारने केलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे…” | बरोबर : “राज्य सरकारने [विषय] बाबत [निर्णय] घेतला. यामुळे [परिणाम]…”

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  ५W + १H — Who, What, When, Where, Why, How — प्रत्येक बातमीत असायला हवे

✔  स्रोत नमूद करा — “सूत्रांनी सांगितले” नको, नाव द्या शक्य असेल तर

✔  ठळक बातम्यांत चार वेगळ्या विषयांच्या बातम्या असाव्यात — एकाच विषयावर चार नाहीत

✔  स्थानिक बातमीत जिल्हा स्पष्ट नमूद करा

✖  बातमीत उपसंपादकाचे मत घालू नका

✖  “सूत्रांनुसार” किंवा “असे म्हटले जाते” — अशा अस्पष्ट बातम्या नको

✖  एकाच राजकीय पक्षाच्या बातम्यांचे प्राबल्य नको

✖  शीर्षक आणि मजकूर वेगळा असू नये — click-bait नको

सदर ३  |  वक्तव्ये

◆ सदर ओळख

राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या व्यक्तींनी काय म्हटले — हे नोंदवणे हे या सदराचे काम. प्रत्येकी दोन वक्तव्ये — म्हणजे सहा. वक्तव्य महत्त्वाचे की व्यक्ती — यापेक्षा संदर्भ महत्त्वाचा.

◆ सदराचा आत्मा

“वक्तव्य म्हणजे इतिहासाचा छोटा तुकडा — तो नेमका आणि संदर्भासह मांडा.”

◆ टोन

तटस्थ. अवतरण चिन्हात वक्तव्य द्या. संदर्भ स्पष्ट करा. प्रतिक्रिया असल्यास त्याही द्या — एकांगी नको.

◆ उदाहरण

उदाहरण :

चुकीचे : “मुख्यमंत्र्यांनी सांगितले की…” | बरोबर : मुख्यमंत्री [नाव] म्हणाले, “[संपूर्ण वक्तव्य].” हे [ठिकाण] येथे [कार्यक्रम] प्रसंगी बोलत होते.

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  वक्तव्य अवतरण चिन्हात — शब्दशः किंवा भाषांतर असेल तर स्पष्ट करा

✔  प्रसंग/संदर्भ द्या — कुठे, कधी, का बोलले

✔  महत्त्वाची वक्तव्ये निवडा — रोजची साधी विधाने नको

✔  तिन्ही स्तरांवर विविध विषयांची वक्तव्ये असावीत

✖  अर्धवट अवतरण — अर्थ बदलतो

✖  एकाच पक्षाची किंवा विचारधारेची वक्तव्ये नको

✖  वक्तव्यात संपादकाची भर घालू नका

✖  जुने वक्तव्य — आजचे हवे

सदर ४  |  अर्थकारण

◆ सदर ओळख

शेतकरी ते उद्योजक — महाराष्ट्राच्या अर्थविश्वातील प्रत्येक घटक या सदराचा विषय आहे. येथे माहिती फक्त वाचण्यासाठी नाही — वाचकाला ती उपयोगी पडली पाहिजे.

◆ सदराचा आत्मा

“अर्थकारण म्हणजे फक्त बाजारभाव नाही — माणसाच्या संघर्षाची, स्वप्नाची आणि यशाची गोष्ट आहे.”

◆ टोन

व्यावहारिक, माहितीपूर्ण, कधी प्रेरणादायी. जटिल आर्थिक संज्ञा टाळा — सामान्य वाचकाला कळेल असे लिहा.

◆ उदाहरण

उदाहरण :

शेती : “नाशिकच्या रमेश पाटलांनी ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून द्राक्षाचे उत्पादन दुप्पट केले — खर्च मात्र ३० टक्के कमी झाला.”

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  आकडे द्या — अंदाजे नाही, नेमके

✔  शासकीय योजनांची संपर्क माहिती द्या — फक्त उल्लेख नको

✔  यशस्वी उदाहरण द्या — प्रेरणा मिळते

✔  बाजारभाव अद्ययावत असावे — जुने घातक आहे

✖  फक्त समस्या सांगू नका — उपाय नसेल तर वाचक निराश होतो

✖  जटिल आर्थिक भाषा — GDP, fiscal deficit असे शब्द समजावून सांगा

✖  कंपनीची जाहिरात वाटेल असे लिखाण नको

✖  शेती म्हणजे फक्त नापिकी नाही — यशाच्या गोष्टीही हव्यात

सदर ५  |  करिअर कट्टा

◆ सदर ओळख

तरुण वाचक हे या सदराचे मुख्य लक्ष्य आहे. करिअर, शिक्षण, शिष्यवृत्ती, कौशल्य — हे सारे एकाच छताखाली. येथील माहिती चुकली तर वाचकाचे नुकसान होऊ शकते — त्यामुळे अचूकता सर्वोच्च आहे.

◆ सदराचा आत्मा

“करिअर कट्टा म्हणजे तरुणाचा विश्वासू मित्र — जो स्वप्न दाखवतो आणि त्याचा रस्ताही.”

◆ टोन

उत्साही, प्रेरणादायी, व्यावहारिक. तरुणांशी बोलतोय असे वाटले पाहिजे — औपचारिक नाही, आत्मीय.

◆ उदाहरण

उदाहरण :

“UPSC २०२५ : ८७९ जागा — अर्ज प्रक्रिया सुरू. पात्रता, अभ्यासक्रम आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या टिप्स — सविस्तर वाचा.”

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  तारखा नेमक्या द्या — परीक्षा, अर्ज मुदत, निकाल

✔  अधिकृत संकेतस्थळाचा उल्लेख करा

✔  यशस्वी विद्यार्थ्यांचे वास्तव अनुभव द्या

✔  परदेश शिक्षणात खर्चाचा वास्तव अंदाज द्या

✖  जुनी माहिती — परीक्षांचे नियम बदलतात, तपासा

✖  फक्त सरकारी नोकरी — खाजगी क्षेत्र, स्वयंरोजगारही महत्त्वाचा

✖  “नक्की मिळेल” असे दावे नका करू

✖  शिष्यवृत्तीची अंतिम मुदत चुकीची देऊ नका — वाचकाचे नुकसान

सदर ६  |  भटकंती

◆ सदर ओळख

महाराष्ट्राची ओळख — गड-किल्ले, तीर्थक्षेत्रे, समुद्र किनारे, जंगले. हे सदर वाचकाला घरातून बाहेर काढायला प्रेरित करणारे आहे. वर्णन इतके सजीव हवे की वाचकाने ठरवावे — “पुढच्या सुट्टीत येथे जायचेच!”

◆ सदराचा आत्मा

“भटकंती म्हणजे जाहिरात नाही — ते एक आमंत्रण आहे, महाराष्ट्राशी पुन्हा ओळख करून घेण्याचे.”

◆ टोन

आनंददायी, वर्णनात्मक, व्यावहारिक. वर्णन जिवंत हवे — पण माहिती अचूक. हॉटेल ब्रोशर वाटता कामा नये.

◆ उदाहरण

उदाहरण :

“रायगडावर उगवत्या सूर्याचा पहिला किरण जेव्हा महाराजांच्या समाधीवर पडतो — त्या क्षणाचा अनुभव शब्दांत नाही. पण तेथे पोहोचण्यासाठी…”

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  कसे जावे — वाहन, रस्ता, वेळ नेमका द्या

✔  राहणे-जेवण — किंमत अंदाज द्या

✔  सर्वोत्तम वेळ — पावसाळा, उन्हाळा, हिवाळा नमूद करा

✔  सावधानता — जंगलात, गडावर काय काळजी घ्यावी

✖  हॉटेल किंवा ट्रॅव्हल एजन्सीची जाहिरात वाटेल असे नको

✖  अवास्तव वर्णन — “स्वर्गच जणू” असे क्लिशे नको

✖  खर्च कमी दाखवू नका — वाचक निराश होतो

✖  फोटो नसेल तर किमान दिशादर्शक माहिती द्या

सदर ७  |  वेचक – वेधक

◆ सदर ओळख

“सह्याद्री मराठी”चे अनोखे सदर. वेचकमध्ये गर्दीत हरवलेली एखादी विलक्षण घटना, प्रसंग वा सत्य वेचून आणायचे. वेधकमध्ये पहिल्याच ओळीत वाचकाची नजर खिळवायची. दोन्ही सदरांना कोणत्याही विषयाचे बंधन नाही.

◆ सदराचा आत्मा

“वेचक म्हणजे हरवलेले सोने — वेधक म्हणजे थेट नेम. दोन्हींत एकमेवाद्वितीय मजकूर.”

◆ टोन

वेचक — शांत, हळुवार, कुतूहलजागक. वेधक — तीक्ष्ण, धक्कादायक, तात्काळ परिणाम करणारा.

◆ उदाहरण

उदाहरण :

वेचक : “१५ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबईत एका अनामिक शिक्षकाने जे केले ते आजही…” | वेधक : “महाराष्ट्रात दर १८ मिनिटांनी एक शेतकरी शेती सोडतो — आणि आपण बोलतो समृद्धीचे!”

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  वेचकची पहिली ओळ — कुतूहल जागवणारी हवी

✔  वेधकची पहिली ओळ — वाचकाने थांबायला हवे

✔  दोन्हींत विविध विषय — एकाच साच्यात अडकू नका

✔  वेचक : १०० ते १५० शब्द | वेधक : ५० ते ८० शब्द

✖  वेचक म्हणजे बातमी नाही — उदाहरण देऊन शिकवणे नाही

✖  वेधक म्हणजे सल्ला नाही — धक्का हवा, उपदेश नाही

✖  दोन्हींत जड भाषा नको

✖  वेचकमध्ये उपसंपादकाचे मत नको — घटना बोलू दे

सदर ८  |  हिरवाई

◆ सदर ओळख

निसर्ग, पर्यावरण, वन्यजीव — हे सदर वाचकाला निसर्गाशी पुन्हा जोडते. माहिती देताना काळजी वाटली पाहिजे — निसर्गाबद्दल, प्राण्यांबद्दल, भविष्याबद्दल. पण निराशावाद नको — कृती सुचवा.

◆ सदराचा आत्मा

“हिरवाई म्हणजे फक्त झाडे-पाणी नाही — ती आपल्या उद्याची काळजी आहे.”

◆ टोन

काळजीवाहक, माहितीपूर्ण, कधी आग्रही. वैज्ञानिक नाव द्या — पण सोप्या भाषेत समजावा. वाचकाला कृतीची प्रेरणा मिळाली पाहिजे.

◆ उदाहरण

उदाहरण :

“श्रीखंड्या — महाराष्ट्राचा राज्यपक्षी. Alcedo atthis. पण सह्याद्रीच्या नद्या आटत चालल्यात आणि हा पक्षी दिसेनासा होतोय. तुम्ही काय करू शकता?”

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  वन्यजीव — मराठी नाव + शास्त्रीय नाव दोन्ही द्या

✔  संवर्धन स्थिती — IUCN यादीनुसार सांगा

✔  वाचकाला काय करता येईल — हे प्रत्येक लेखात द्या

✔  स्थानिक उदाहरणे — महाराष्ट्राशी जोडलेले विषय प्राधान्याने

✖  अतिरिक्त निराशावाद — “सारे संपेल” असे नको

✖  तांत्रिक भाषेत बुडवू नका — सामान्य वाचकासाठी लिहा

✖  फक्त समस्या — उपाय नाही असे लिखाण टाळा

✖  आकडे खरे असावेत — अंदाजे आकडे सांगू नका

सदर ९  |  जीवनशैली

◆ सदर ओळख

खानपान, सौंदर्य, आरोग्य, दाम्पत्य जीवन, नातेसंबंध — वाचकाचे दैनंदिन जीवन समृद्ध करणे हे उद्दिष्ट. येथे वाचकाला “हे माझ्यासाठीच लिहिले आहे” असे वाटले पाहिजे.

◆ सदराचा आत्मा

“जीवनशैली म्हणजे जगणे शिकवणे नाही — जगण्याला अर्थ देणे.”

◆ टोन

मैत्रीपूर्ण, आत्मीय, व्यावहारिक. शिकवण्याचा आव नको — सोबत चालण्याची भावना हवी.

◆ उदाहरण

उदाहरण :

खानपान : “आजी बनवायच्या त्या आंबट-गोड कोकणी आमटीचे रहस्य — फक्त दोन गुपिते.” | आरोग्य : “३ मिनिटांचा श्वास व्यायाम — ताण कमी होतो हे संशोधनाने सिद्ध.”

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  पाककृती — प्रमाण नेमके द्या, अंदाजे नाही

✔  आरोग्य — तज्ज्ञाचा सल्ला नमूद करा

✔  दाम्पत्य जीवन — आदरपूर्वक, संयमित भाषा

✔  नातेसंबंध — एकांगी नाही, दोन्ही बाजू सांगा

✖  वैद्यकीय दावे सिद्ध नसतील तर करू नका

✖  “हे उत्पादन वापरा” असे थेट जाहिरात नको

✖  दाम्पत्य जीवनात असभ्य भाषा नको

✖  आरोग्य माहिती जुनी असू नये — नवीन संशोधन तपासा

सदर १०  |  तंत्रविश्व

◆ सदर ओळख

तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या भाषेत — मोबाईल, वाहने, AI, अवकाश संशोधन, शेती तंत्रज्ञान. वाचकाला “हे माझ्या कामाचे आहे” असे वाटले पाहिजे. तांत्रिक माहिती सोप्या भाषेत देणे हे मोठे कौशल्य आहे.

◆ सदराचा आत्मा

“तंत्रज्ञान समजणे हा आता अधिकार आहे — ते फक्त तज्ज्ञांसाठी नाही.”

◆ टोन

उत्सुक, सोपे, उपयुक्त. “हे असे असते” इतके सांगू नका — “हे तुमच्या कामी येईल” हे सांगा.

◆ उदाहरण

उदाहरण :

“नवीन iPhone की Samsung — खरेदीआधी हे वाचा.” | “ISRO ने काल केले ते नेमके काय — एका मिनिटात समजून घ्या.”

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  किंमत नेहमी द्या — वाचकाला पहिला प्रश्न हाच असतो

✔  तुलना करा — एकट्या उत्पादनापेक्षा तुलना उपयुक्त

✔  AI — उपयोग सांगा, भीती नको

✔  विज्ञान/अवकाश — भारताशी, महाराष्ट्राशी जोडा

✖  जड तांत्रिक भाषा — specs यादी म्हणजे लेख नाही

✖  उत्पादनाची जाहिरात वाटेल असे नको

✖  जुनी माहिती — तंत्रज्ञान झपाट्याने बदलते

✖  “हे सर्वोत्तम आहे” असे निरपेक्ष दावे नको

सदर ११  |  वारसा

◆ सदर ओळख

महाराष्ट्राचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जपणे आणि पुढे नेणे. सण, उत्सव, प्रथा, परंपरा, विस्मृत व्यक्ती — हे सारे येथे येतात. वाचकाला अभिमान वाटला पाहिजे — आणि जबाबदारीही.

◆ सदराचा आत्मा

“वारसा म्हणजे मागे वळून पाहणे नव्हे — आपण कुठून आलो हे जाणून पुढे जाणे.”

◆ टोन

आदरपूर्वक, अभिमानी, माहितीपूर्ण. भावनिक असावे — पण अंधश्रद्धाळू नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन सोडू नका.

◆ उदाहरण

उदाहरण :

“गणेशोत्सव — फक्त उत्सव नाही, लोकमान्य टिळकांनी एकत्र केलेली क्रांती. आज त्याचा अर्थ काय?” | “विस्मृत क्रांतिकारी : [नाव] — ज्यांच्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण होते.”

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  ऐतिहासिक तथ्य तपासा — चुकीचा इतिहास हानिकारक

✔  सण/व्रताचे वैज्ञानिक महत्त्वही सांगा

✔  विस्मृत व्यक्तींत विविधता — जाती, प्रदेश, लिंग

✔  सध्याशी जोडा — इतिहास आजच्या संदर्भात का महत्त्वाचा

✖  फक्त पूजाविधी — आत्मा नाही असे लिखाण नको

✖  एकाच समाजाचा इतिहास प्राधान्याने नको

✖  अंधश्रद्धा प्रसार होईल असे लिखाण टाळा

✖  “आपले सर्वोत्तम” — अतिरेकी अभिमान वस्तुनिष्ठतेला मारतो

सदर १२  |  रंगमंच

◆ सदर ओळख

मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक, मालिका, OTT, संगीत — फक्त शुक्रवारी. येथे परीक्षण म्हणजे कथानक सांगणे नाही — ते माध्यमाचे विश्लेषण आहे. वाचकाला “पाहावे की नाही” हे ठरवण्यास मदत करणे.

◆ सदराचा आत्मा

“रंगमंच म्हणजे मनोरंजनाचा दरवाजा — उपसंपादक तो उघडतो, आत डोकावतो आणि वाचकाला सांगतो — आत या की थांबा.”

◆ टोन

उत्साही, परखड, प्रामाणिक. स्तुतिपाठ नको, अकारण टीकाही नको. परीक्षण निःपक्षपाती असावे.

◆ उदाहरण

उदाहरण :

“[चित्रपट नाव] — दिग्दर्शकाचा धाडसी प्रयोग यशस्वी झाला का? तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट, पण कथा मध्यंतरानंतर सुटते. ४ पैकी ३ — कुटुंबासह पाहण्यासारखा.”

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  Spoiler देऊ नका — वाचक चित्रपट पाहणार आहे

✔  रेटिंग द्या — ५ पैकी किती, कोणासाठी योग्य

✔  कलाकार परिचयात माणूस दाखवा — फक्त career नको

✔  पडद्यामागे — तांत्रिक कर्मचाऱ्यांनाही श्रेय द्या

✖  परीक्षण म्हणजे कथानक सांगणे नाही — हे सर्वात मोठी चूक

✖  निर्माता/वितरकाशी संबंध असल्यास परीक्षण नाही

✖  “महान कलाकृती” किंवा “भयंकर” — अतिरेक टाळा

✖  कलाकाराचे वैयक्तिक जीवन — परीक्षणात आणू नका

सदर १३  |  माहिती

◆ सदर ओळख

सरकारी योजना, नोकरी, प्रकल्प, अर्ज प्रक्रिया, नागरिक हक्क, कायदा — नागरिकाच्या थेट उपयोगाची माहिती. येथे एक चुकीची तारीख किंवा अपूर्ण माहिती वाचकाचे नुकसान करू शकते. अचूकता सर्वोच्च.

◆ सदराचा आत्मा

“माहिती सदर म्हणजे नागरिक आणि सरकारमधला सेतू — तो मजबूत आणि विश्वासार्ह असला पाहिजे.”

◆ टोन

स्पष्ट, अचूक, थेट. जास्त भाषा नको — माहिती नेमकी द्या. वाचकाला शोधत बसू लागू नये.

◆ उदाहरण

उदाहरण :

“पीएम किसान सन्मान निधी — पात्रता, अर्ज कसा करावा, कागदपत्रे, pmkisan.gov.in — मुदत [तारीख].”

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  तारखा नेमक्या — अंदाजे नाही

✔  अधिकृत संकेतस्थळ/हेल्पलाइन नंबर द्या

✔  कागदपत्रांची यादी पूर्ण द्या

✔  जुनी माहिती असेल तर त्यावर “तपासा” असे नमूद करा

✖  जुनी योजना — बंद झालेल्या योजना देऊ नका

✖  अपूर्ण माहिती — “अधिक माहितीसाठी कार्यालयात या” एकट्याने पुरत नाही

✖  कायद्याचा चुकीचा अर्थ — तज्ज्ञाकडून तपासून घ्या

✖  आव्हान-प्रतिसाद नसलेल्या हेल्पलाइन नंबर देऊ नका

सदर १४  |  जिगरबाज

◆ सदर ओळख

महाराष्ट्राच्या जिद्दी, धाडसी, असाधारण माणसांची ओळख. स्वामिनी, हिरकणी, अधिकारी, समाजसेवक, उद्योजक — सर्व येथे येतात. येथे यश सांगायचे आहे — पण संघर्ष विसरायचा नाही. माणूस मोठा दाखवायचा आहे — देव नाही.

◆ सदराचा आत्मा

“जिगरबाज म्हणजे आरसा — वाचकाला त्यात स्वतःची शक्यता दिसली पाहिजे.”

◆ टोन

आदरपूर्वक, प्रेरणादायी, भावनिक — पण संयमित. अतिभावनिक नको, वस्तुनिष्ठता सोडू नका.

◆ उदाहरण

उदाहरण :

“नागपूरच्या [नाव] यांनी IAS परीक्षा सहाव्यांदा दिली — पाचव्या अपयशानंतर त्या तीन महिने घर सोडून गेल्या नाहीत. सहाव्यांदा — यश.”

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  संघर्ष दाखवा — फक्त यश नाही

✔  माणूस दाखवा — पद नाही, माणूस महत्त्वाचा

✔  विविधता — जाती, प्रदेश, वय, लिंग — सर्व वर्गातील जिगरबाज असावेत

✔  व्यक्तीच्या स्वतःच्या शब्दांत — quote द्या

✖  फक्त यशोगाथा — संघर्ष नसेल तर प्रेरणा नाही

✖  देव बनवू नका — माणूस म्हणून ठेवा

✖  एकाच क्षेत्रातील व्यक्तींचे प्राबल्य नको

✖  व्यक्तीच्या संमतीशिवाय खाजगी माहिती नको

सदर १५  |  संस्था परिचय

◆ सदर ओळख

शासकीय, खाजगी, सहकारी, शैक्षणिक, स्टार्टअप, रुग्णालये — वाचकाच्या उपयोगाच्या संस्थांची ओळख. येथील माहिती वाचकाला थेट उपयोगी पडली पाहिजे. संस्थेची जाहिरात नाही — वाचकाची सेवा आहे.

◆ सदराचा आत्मा

“संस्था परिचय म्हणजे माहितीचा दीपस्तंभ — वाचकाला योग्य दिशा दाखवणारा.”

◆ टोन

माहितीपूर्ण, तटस्थ, उपयुक्त. जाहिरातीसारखे वाटता कामा नये — वाचक समजदार आहे.

◆ उदाहरण

उदाहरण :

“[संस्थेचे नाव] — स्थापना [वर्ष]. सेवा : [काय]. पात्रता : [कोण येऊ शकते]. शुल्क : [किती]. संपर्क : [नंबर/पत्ता].”

✔  काय करावे ✖  काय टाळावे

✔  संपर्क माहिती पूर्ण आणि अद्ययावत द्या

✔  सेवा नेमक्या सांगा — सारेच करतो असे नको

✔  स्टार्टअपसाठी — उत्पादन/सेवा आणि समस्या कोणती सोडवते हे स्पष्ट करा

✔  रुग्णालय — विशेषज्ञता, शुल्क आणि संपर्क हे अत्यावश्यक

✖  जाहिरात वाटेल असे लिखाण — “सर्वोत्तम संस्था” असे नको

✖  पैशाच्या बदल्यात संस्था परिचय — हे संपादकीय धोरणाच्या विरुद्ध

✖  अपूर्ण संपर्क माहिती — वाचक अडतो

✖  बंद झालेल्या संस्थेचा परिचय — आधी खातरजमा करा