सह्याद्री मराठी
संपादकीय ओळख व मार्गदर्शिका — दस्तऐवज १
हा दस्तऐवज उपसंपादकांसाठी आहे.
प्रत्येक सदराचे स्वरूप, आत्मा आणि लेखनाचे मापदंड येथे दिले आहेत.
मजकूर ढाचा चेकलिस्टसाठी दस्तऐवज २ पाहावा.
सदर १ | आज दिनांक
◆ सदर ओळख
हे सदर वाचकाच्या दिवसाची सुरुवात आहे. पंचांग, राशी, दिनविशेष, सुभाषित आणि व्यंगचित्र — या पाच घटकांनी वाचकाला माहिती, उत्साह, आध्यात्मिक स्पर्श आणि हलकेफुलके हास्य मिळायला हवे. दिवस सुरू होण्याआधी वाचकाने हे उघडले पाहिजे.
◆ सदराचा आत्मा
“आजचा दिवस खास का आहे — हे वाचकाला सर्वात आधी आपल्याकडून कळले पाहिजे.”
◆ टोन
सकारात्मक, ऊर्जादायी, आत्मीय. जड शब्द नाहीत. वाचक सकाळी उठून हे वाचतो — त्याला उमेद मिळाली पाहिजे.
◆ उदाहरण
उदाहरण :
आजचे सुभाषित — “उद्योगाचे फळ लक्ष्मी, आळसाचे फळ दारिद्र्य” — हे फक्त सुभाषित म्हणून नको, त्याचा आजच्या जगण्याशी अर्थ सांगा.
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ पंचांग अचूक असावे — एक आकडा चुकला तर विश्वास जातो ✔ दिनविशेषात महाराष्ट्र, देश, जग — तिन्ही असावे ✔ सुभाषिताचा अर्थ सोप्या भाषेत — संस्कृत कळत नाही सर्वांना ✔ टवाळखोरमध्ये आजच्या घटनेचा संदर्भ असावा — जुने चालत नाही ✔ राशी भाकीत — सकारात्मक कोन घ्या, भीती दाखवू नका |
✖ पंचांग copy-paste नको — स्रोत तपासा ✖ दिनविशेष म्हणजे Wikipedia नव्हे — निवडकता हवी ✖ सुभाषित फक्त छापणे नको — अर्थ नाही तर मूल्य नाही ✖ टवाळखोर राजकीय द्वेषावर आधारित असू नये ✖ राशीत “आजचा दिवस वाईट” असे थेट लिहू नका |
सदर २ | बातम्या
◆ सदर ओळख
बातम्या हा सदराचा कणा आहे. महाराष्ट्र, देश, जग — तीन वर्तुळांत वाचकाला माहिती द्यायची आहे. येथे तथ्य सर्वोच्च आहे. मत नाही, अतिरंजन नाही, पक्षपात नाही.
◆ सदराचा आत्मा
“बातमी म्हणजे आरसा — त्यात वास्तव दिसायला हवे, उपसंपादकाचे प्रतिबिंब नाही.”
◆ टोन
तटस्थ, स्पष्ट, थेट. पहिल्या वाक्यात मुख्य माहिती. विशेषणे कमीत कमी. वाचकाला स्वतः निर्णय घेऊ द्या.
◆ उदाहरण
उदाहरण :
चुकीचे : “सरकारने केलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे…” | बरोबर : “राज्य सरकारने [विषय] बाबत [निर्णय] घेतला. यामुळे [परिणाम]…”
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ ५W + १H — Who, What, When, Where, Why, How — प्रत्येक बातमीत असायला हवे ✔ स्रोत नमूद करा — “सूत्रांनी सांगितले” नको, नाव द्या शक्य असेल तर ✔ ठळक बातम्यांत चार वेगळ्या विषयांच्या बातम्या असाव्यात — एकाच विषयावर चार नाहीत ✔ स्थानिक बातमीत जिल्हा स्पष्ट नमूद करा |
✖ बातमीत उपसंपादकाचे मत घालू नका ✖ “सूत्रांनुसार” किंवा “असे म्हटले जाते” — अशा अस्पष्ट बातम्या नको ✖ एकाच राजकीय पक्षाच्या बातम्यांचे प्राबल्य नको ✖ शीर्षक आणि मजकूर वेगळा असू नये — click-bait नको |
सदर ३ | वक्तव्ये
◆ सदर ओळख
राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या व्यक्तींनी काय म्हटले — हे नोंदवणे हे या सदराचे काम. प्रत्येकी दोन वक्तव्ये — म्हणजे सहा. वक्तव्य महत्त्वाचे की व्यक्ती — यापेक्षा संदर्भ महत्त्वाचा.
◆ सदराचा आत्मा
“वक्तव्य म्हणजे इतिहासाचा छोटा तुकडा — तो नेमका आणि संदर्भासह मांडा.”
◆ टोन
तटस्थ. अवतरण चिन्हात वक्तव्य द्या. संदर्भ स्पष्ट करा. प्रतिक्रिया असल्यास त्याही द्या — एकांगी नको.
◆ उदाहरण
उदाहरण :
चुकीचे : “मुख्यमंत्र्यांनी सांगितले की…” | बरोबर : मुख्यमंत्री [नाव] म्हणाले, “[संपूर्ण वक्तव्य].” हे [ठिकाण] येथे [कार्यक्रम] प्रसंगी बोलत होते.
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ वक्तव्य अवतरण चिन्हात — शब्दशः किंवा भाषांतर असेल तर स्पष्ट करा ✔ प्रसंग/संदर्भ द्या — कुठे, कधी, का बोलले ✔ महत्त्वाची वक्तव्ये निवडा — रोजची साधी विधाने नको ✔ तिन्ही स्तरांवर विविध विषयांची वक्तव्ये असावीत |
✖ अर्धवट अवतरण — अर्थ बदलतो ✖ एकाच पक्षाची किंवा विचारधारेची वक्तव्ये नको ✖ वक्तव्यात संपादकाची भर घालू नका ✖ जुने वक्तव्य — आजचे हवे |
सदर ४ | अर्थकारण
◆ सदर ओळख
शेतकरी ते उद्योजक — महाराष्ट्राच्या अर्थविश्वातील प्रत्येक घटक या सदराचा विषय आहे. येथे माहिती फक्त वाचण्यासाठी नाही — वाचकाला ती उपयोगी पडली पाहिजे.
◆ सदराचा आत्मा
“अर्थकारण म्हणजे फक्त बाजारभाव नाही — माणसाच्या संघर्षाची, स्वप्नाची आणि यशाची गोष्ट आहे.”
◆ टोन
व्यावहारिक, माहितीपूर्ण, कधी प्रेरणादायी. जटिल आर्थिक संज्ञा टाळा — सामान्य वाचकाला कळेल असे लिहा.
◆ उदाहरण
उदाहरण :
शेती : “नाशिकच्या रमेश पाटलांनी ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून द्राक्षाचे उत्पादन दुप्पट केले — खर्च मात्र ३० टक्के कमी झाला.”
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ आकडे द्या — अंदाजे नाही, नेमके ✔ शासकीय योजनांची संपर्क माहिती द्या — फक्त उल्लेख नको ✔ यशस्वी उदाहरण द्या — प्रेरणा मिळते ✔ बाजारभाव अद्ययावत असावे — जुने घातक आहे |
✖ फक्त समस्या सांगू नका — उपाय नसेल तर वाचक निराश होतो ✖ जटिल आर्थिक भाषा — GDP, fiscal deficit असे शब्द समजावून सांगा ✖ कंपनीची जाहिरात वाटेल असे लिखाण नको ✖ शेती म्हणजे फक्त नापिकी नाही — यशाच्या गोष्टीही हव्यात |
सदर ५ | करिअर कट्टा
◆ सदर ओळख
तरुण वाचक हे या सदराचे मुख्य लक्ष्य आहे. करिअर, शिक्षण, शिष्यवृत्ती, कौशल्य — हे सारे एकाच छताखाली. येथील माहिती चुकली तर वाचकाचे नुकसान होऊ शकते — त्यामुळे अचूकता सर्वोच्च आहे.
◆ सदराचा आत्मा
“करिअर कट्टा म्हणजे तरुणाचा विश्वासू मित्र — जो स्वप्न दाखवतो आणि त्याचा रस्ताही.”
◆ टोन
उत्साही, प्रेरणादायी, व्यावहारिक. तरुणांशी बोलतोय असे वाटले पाहिजे — औपचारिक नाही, आत्मीय.
◆ उदाहरण
उदाहरण :
“UPSC २०२५ : ८७९ जागा — अर्ज प्रक्रिया सुरू. पात्रता, अभ्यासक्रम आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या टिप्स — सविस्तर वाचा.”
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ तारखा नेमक्या द्या — परीक्षा, अर्ज मुदत, निकाल ✔ अधिकृत संकेतस्थळाचा उल्लेख करा ✔ यशस्वी विद्यार्थ्यांचे वास्तव अनुभव द्या ✔ परदेश शिक्षणात खर्चाचा वास्तव अंदाज द्या |
✖ जुनी माहिती — परीक्षांचे नियम बदलतात, तपासा ✖ फक्त सरकारी नोकरी — खाजगी क्षेत्र, स्वयंरोजगारही महत्त्वाचा ✖ “नक्की मिळेल” असे दावे नका करू ✖ शिष्यवृत्तीची अंतिम मुदत चुकीची देऊ नका — वाचकाचे नुकसान |
सदर ६ | भटकंती
◆ सदर ओळख
महाराष्ट्राची ओळख — गड-किल्ले, तीर्थक्षेत्रे, समुद्र किनारे, जंगले. हे सदर वाचकाला घरातून बाहेर काढायला प्रेरित करणारे आहे. वर्णन इतके सजीव हवे की वाचकाने ठरवावे — “पुढच्या सुट्टीत येथे जायचेच!”
◆ सदराचा आत्मा
“भटकंती म्हणजे जाहिरात नाही — ते एक आमंत्रण आहे, महाराष्ट्राशी पुन्हा ओळख करून घेण्याचे.”
◆ टोन
आनंददायी, वर्णनात्मक, व्यावहारिक. वर्णन जिवंत हवे — पण माहिती अचूक. हॉटेल ब्रोशर वाटता कामा नये.
◆ उदाहरण
उदाहरण :
“रायगडावर उगवत्या सूर्याचा पहिला किरण जेव्हा महाराजांच्या समाधीवर पडतो — त्या क्षणाचा अनुभव शब्दांत नाही. पण तेथे पोहोचण्यासाठी…”
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ कसे जावे — वाहन, रस्ता, वेळ नेमका द्या ✔ राहणे-जेवण — किंमत अंदाज द्या ✔ सर्वोत्तम वेळ — पावसाळा, उन्हाळा, हिवाळा नमूद करा ✔ सावधानता — जंगलात, गडावर काय काळजी घ्यावी |
✖ हॉटेल किंवा ट्रॅव्हल एजन्सीची जाहिरात वाटेल असे नको ✖ अवास्तव वर्णन — “स्वर्गच जणू” असे क्लिशे नको ✖ खर्च कमी दाखवू नका — वाचक निराश होतो ✖ फोटो नसेल तर किमान दिशादर्शक माहिती द्या |
सदर ७ | वेचक – वेधक
◆ सदर ओळख
“सह्याद्री मराठी”चे अनोखे सदर. वेचकमध्ये गर्दीत हरवलेली एखादी विलक्षण घटना, प्रसंग वा सत्य वेचून आणायचे. वेधकमध्ये पहिल्याच ओळीत वाचकाची नजर खिळवायची. दोन्ही सदरांना कोणत्याही विषयाचे बंधन नाही.
◆ सदराचा आत्मा
“वेचक म्हणजे हरवलेले सोने — वेधक म्हणजे थेट नेम. दोन्हींत एकमेवाद्वितीय मजकूर.”
◆ टोन
वेचक — शांत, हळुवार, कुतूहलजागक. वेधक — तीक्ष्ण, धक्कादायक, तात्काळ परिणाम करणारा.
◆ उदाहरण
उदाहरण :
वेचक : “१५ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबईत एका अनामिक शिक्षकाने जे केले ते आजही…” | वेधक : “महाराष्ट्रात दर १८ मिनिटांनी एक शेतकरी शेती सोडतो — आणि आपण बोलतो समृद्धीचे!”
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ वेचकची पहिली ओळ — कुतूहल जागवणारी हवी ✔ वेधकची पहिली ओळ — वाचकाने थांबायला हवे ✔ दोन्हींत विविध विषय — एकाच साच्यात अडकू नका ✔ वेचक : १०० ते १५० शब्द | वेधक : ५० ते ८० शब्द |
✖ वेचक म्हणजे बातमी नाही — उदाहरण देऊन शिकवणे नाही ✖ वेधक म्हणजे सल्ला नाही — धक्का हवा, उपदेश नाही ✖ दोन्हींत जड भाषा नको ✖ वेचकमध्ये उपसंपादकाचे मत नको — घटना बोलू दे |
सदर ८ | हिरवाई
◆ सदर ओळख
निसर्ग, पर्यावरण, वन्यजीव — हे सदर वाचकाला निसर्गाशी पुन्हा जोडते. माहिती देताना काळजी वाटली पाहिजे — निसर्गाबद्दल, प्राण्यांबद्दल, भविष्याबद्दल. पण निराशावाद नको — कृती सुचवा.
◆ सदराचा आत्मा
“हिरवाई म्हणजे फक्त झाडे-पाणी नाही — ती आपल्या उद्याची काळजी आहे.”
◆ टोन
काळजीवाहक, माहितीपूर्ण, कधी आग्रही. वैज्ञानिक नाव द्या — पण सोप्या भाषेत समजावा. वाचकाला कृतीची प्रेरणा मिळाली पाहिजे.
◆ उदाहरण
उदाहरण :
“श्रीखंड्या — महाराष्ट्राचा राज्यपक्षी. Alcedo atthis. पण सह्याद्रीच्या नद्या आटत चालल्यात आणि हा पक्षी दिसेनासा होतोय. तुम्ही काय करू शकता?”
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ वन्यजीव — मराठी नाव + शास्त्रीय नाव दोन्ही द्या ✔ संवर्धन स्थिती — IUCN यादीनुसार सांगा ✔ वाचकाला काय करता येईल — हे प्रत्येक लेखात द्या ✔ स्थानिक उदाहरणे — महाराष्ट्राशी जोडलेले विषय प्राधान्याने |
✖ अतिरिक्त निराशावाद — “सारे संपेल” असे नको ✖ तांत्रिक भाषेत बुडवू नका — सामान्य वाचकासाठी लिहा ✖ फक्त समस्या — उपाय नाही असे लिखाण टाळा ✖ आकडे खरे असावेत — अंदाजे आकडे सांगू नका |
सदर ९ | जीवनशैली
◆ सदर ओळख
खानपान, सौंदर्य, आरोग्य, दाम्पत्य जीवन, नातेसंबंध — वाचकाचे दैनंदिन जीवन समृद्ध करणे हे उद्दिष्ट. येथे वाचकाला “हे माझ्यासाठीच लिहिले आहे” असे वाटले पाहिजे.
◆ सदराचा आत्मा
“जीवनशैली म्हणजे जगणे शिकवणे नाही — जगण्याला अर्थ देणे.”
◆ टोन
मैत्रीपूर्ण, आत्मीय, व्यावहारिक. शिकवण्याचा आव नको — सोबत चालण्याची भावना हवी.
◆ उदाहरण
उदाहरण :
खानपान : “आजी बनवायच्या त्या आंबट-गोड कोकणी आमटीचे रहस्य — फक्त दोन गुपिते.” | आरोग्य : “३ मिनिटांचा श्वास व्यायाम — ताण कमी होतो हे संशोधनाने सिद्ध.”
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ पाककृती — प्रमाण नेमके द्या, अंदाजे नाही ✔ आरोग्य — तज्ज्ञाचा सल्ला नमूद करा ✔ दाम्पत्य जीवन — आदरपूर्वक, संयमित भाषा ✔ नातेसंबंध — एकांगी नाही, दोन्ही बाजू सांगा |
✖ वैद्यकीय दावे सिद्ध नसतील तर करू नका ✖ “हे उत्पादन वापरा” असे थेट जाहिरात नको ✖ दाम्पत्य जीवनात असभ्य भाषा नको ✖ आरोग्य माहिती जुनी असू नये — नवीन संशोधन तपासा |
सदर १० | तंत्रविश्व
◆ सदर ओळख
तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या भाषेत — मोबाईल, वाहने, AI, अवकाश संशोधन, शेती तंत्रज्ञान. वाचकाला “हे माझ्या कामाचे आहे” असे वाटले पाहिजे. तांत्रिक माहिती सोप्या भाषेत देणे हे मोठे कौशल्य आहे.
◆ सदराचा आत्मा
“तंत्रज्ञान समजणे हा आता अधिकार आहे — ते फक्त तज्ज्ञांसाठी नाही.”
◆ टोन
उत्सुक, सोपे, उपयुक्त. “हे असे असते” इतके सांगू नका — “हे तुमच्या कामी येईल” हे सांगा.
◆ उदाहरण
उदाहरण :
“नवीन iPhone की Samsung — खरेदीआधी हे वाचा.” | “ISRO ने काल केले ते नेमके काय — एका मिनिटात समजून घ्या.”
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ किंमत नेहमी द्या — वाचकाला पहिला प्रश्न हाच असतो ✔ तुलना करा — एकट्या उत्पादनापेक्षा तुलना उपयुक्त ✔ AI — उपयोग सांगा, भीती नको ✔ विज्ञान/अवकाश — भारताशी, महाराष्ट्राशी जोडा |
✖ जड तांत्रिक भाषा — specs यादी म्हणजे लेख नाही ✖ उत्पादनाची जाहिरात वाटेल असे नको ✖ जुनी माहिती — तंत्रज्ञान झपाट्याने बदलते ✖ “हे सर्वोत्तम आहे” असे निरपेक्ष दावे नको |
सदर ११ | वारसा
◆ सदर ओळख
महाराष्ट्राचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जपणे आणि पुढे नेणे. सण, उत्सव, प्रथा, परंपरा, विस्मृत व्यक्ती — हे सारे येथे येतात. वाचकाला अभिमान वाटला पाहिजे — आणि जबाबदारीही.
◆ सदराचा आत्मा
“वारसा म्हणजे मागे वळून पाहणे नव्हे — आपण कुठून आलो हे जाणून पुढे जाणे.”
◆ टोन
आदरपूर्वक, अभिमानी, माहितीपूर्ण. भावनिक असावे — पण अंधश्रद्धाळू नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन सोडू नका.
◆ उदाहरण
उदाहरण :
“गणेशोत्सव — फक्त उत्सव नाही, लोकमान्य टिळकांनी एकत्र केलेली क्रांती. आज त्याचा अर्थ काय?” | “विस्मृत क्रांतिकारी : [नाव] — ज्यांच्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण होते.”
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ ऐतिहासिक तथ्य तपासा — चुकीचा इतिहास हानिकारक ✔ सण/व्रताचे वैज्ञानिक महत्त्वही सांगा ✔ विस्मृत व्यक्तींत विविधता — जाती, प्रदेश, लिंग ✔ सध्याशी जोडा — इतिहास आजच्या संदर्भात का महत्त्वाचा |
✖ फक्त पूजाविधी — आत्मा नाही असे लिखाण नको ✖ एकाच समाजाचा इतिहास प्राधान्याने नको ✖ अंधश्रद्धा प्रसार होईल असे लिखाण टाळा ✖ “आपले सर्वोत्तम” — अतिरेकी अभिमान वस्तुनिष्ठतेला मारतो |
सदर १२ | रंगमंच
◆ सदर ओळख
मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक, मालिका, OTT, संगीत — फक्त शुक्रवारी. येथे परीक्षण म्हणजे कथानक सांगणे नाही — ते माध्यमाचे विश्लेषण आहे. वाचकाला “पाहावे की नाही” हे ठरवण्यास मदत करणे.
◆ सदराचा आत्मा
“रंगमंच म्हणजे मनोरंजनाचा दरवाजा — उपसंपादक तो उघडतो, आत डोकावतो आणि वाचकाला सांगतो — आत या की थांबा.”
◆ टोन
उत्साही, परखड, प्रामाणिक. स्तुतिपाठ नको, अकारण टीकाही नको. परीक्षण निःपक्षपाती असावे.
◆ उदाहरण
उदाहरण :
“[चित्रपट नाव] — दिग्दर्शकाचा धाडसी प्रयोग यशस्वी झाला का? तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट, पण कथा मध्यंतरानंतर सुटते. ४ पैकी ३ — कुटुंबासह पाहण्यासारखा.”
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ Spoiler देऊ नका — वाचक चित्रपट पाहणार आहे ✔ रेटिंग द्या — ५ पैकी किती, कोणासाठी योग्य ✔ कलाकार परिचयात माणूस दाखवा — फक्त career नको ✔ पडद्यामागे — तांत्रिक कर्मचाऱ्यांनाही श्रेय द्या |
✖ परीक्षण म्हणजे कथानक सांगणे नाही — हे सर्वात मोठी चूक ✖ निर्माता/वितरकाशी संबंध असल्यास परीक्षण नाही ✖ “महान कलाकृती” किंवा “भयंकर” — अतिरेक टाळा ✖ कलाकाराचे वैयक्तिक जीवन — परीक्षणात आणू नका |
सदर १३ | माहिती
◆ सदर ओळख
सरकारी योजना, नोकरी, प्रकल्प, अर्ज प्रक्रिया, नागरिक हक्क, कायदा — नागरिकाच्या थेट उपयोगाची माहिती. येथे एक चुकीची तारीख किंवा अपूर्ण माहिती वाचकाचे नुकसान करू शकते. अचूकता सर्वोच्च.
◆ सदराचा आत्मा
“माहिती सदर म्हणजे नागरिक आणि सरकारमधला सेतू — तो मजबूत आणि विश्वासार्ह असला पाहिजे.”
◆ टोन
स्पष्ट, अचूक, थेट. जास्त भाषा नको — माहिती नेमकी द्या. वाचकाला शोधत बसू लागू नये.
◆ उदाहरण
उदाहरण :
“पीएम किसान सन्मान निधी — पात्रता, अर्ज कसा करावा, कागदपत्रे, pmkisan.gov.in — मुदत [तारीख].”
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ तारखा नेमक्या — अंदाजे नाही ✔ अधिकृत संकेतस्थळ/हेल्पलाइन नंबर द्या ✔ कागदपत्रांची यादी पूर्ण द्या ✔ जुनी माहिती असेल तर त्यावर “तपासा” असे नमूद करा |
✖ जुनी योजना — बंद झालेल्या योजना देऊ नका ✖ अपूर्ण माहिती — “अधिक माहितीसाठी कार्यालयात या” एकट्याने पुरत नाही ✖ कायद्याचा चुकीचा अर्थ — तज्ज्ञाकडून तपासून घ्या ✖ आव्हान-प्रतिसाद नसलेल्या हेल्पलाइन नंबर देऊ नका |
सदर १४ | जिगरबाज
◆ सदर ओळख
महाराष्ट्राच्या जिद्दी, धाडसी, असाधारण माणसांची ओळख. स्वामिनी, हिरकणी, अधिकारी, समाजसेवक, उद्योजक — सर्व येथे येतात. येथे यश सांगायचे आहे — पण संघर्ष विसरायचा नाही. माणूस मोठा दाखवायचा आहे — देव नाही.
◆ सदराचा आत्मा
“जिगरबाज म्हणजे आरसा — वाचकाला त्यात स्वतःची शक्यता दिसली पाहिजे.”
◆ टोन
आदरपूर्वक, प्रेरणादायी, भावनिक — पण संयमित. अतिभावनिक नको, वस्तुनिष्ठता सोडू नका.
◆ उदाहरण
उदाहरण :
“नागपूरच्या [नाव] यांनी IAS परीक्षा सहाव्यांदा दिली — पाचव्या अपयशानंतर त्या तीन महिने घर सोडून गेल्या नाहीत. सहाव्यांदा — यश.”
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ संघर्ष दाखवा — फक्त यश नाही ✔ माणूस दाखवा — पद नाही, माणूस महत्त्वाचा ✔ विविधता — जाती, प्रदेश, वय, लिंग — सर्व वर्गातील जिगरबाज असावेत ✔ व्यक्तीच्या स्वतःच्या शब्दांत — quote द्या |
✖ फक्त यशोगाथा — संघर्ष नसेल तर प्रेरणा नाही ✖ देव बनवू नका — माणूस म्हणून ठेवा ✖ एकाच क्षेत्रातील व्यक्तींचे प्राबल्य नको ✖ व्यक्तीच्या संमतीशिवाय खाजगी माहिती नको |
सदर १५ | संस्था परिचय
◆ सदर ओळख
शासकीय, खाजगी, सहकारी, शैक्षणिक, स्टार्टअप, रुग्णालये — वाचकाच्या उपयोगाच्या संस्थांची ओळख. येथील माहिती वाचकाला थेट उपयोगी पडली पाहिजे. संस्थेची जाहिरात नाही — वाचकाची सेवा आहे.
◆ सदराचा आत्मा
“संस्था परिचय म्हणजे माहितीचा दीपस्तंभ — वाचकाला योग्य दिशा दाखवणारा.”
◆ टोन
माहितीपूर्ण, तटस्थ, उपयुक्त. जाहिरातीसारखे वाटता कामा नये — वाचक समजदार आहे.
◆ उदाहरण
उदाहरण :
“[संस्थेचे नाव] — स्थापना [वर्ष]. सेवा : [काय]. पात्रता : [कोण येऊ शकते]. शुल्क : [किती]. संपर्क : [नंबर/पत्ता].”
| ✔ काय करावे | ✖ काय टाळावे |
|
✔ संपर्क माहिती पूर्ण आणि अद्ययावत द्या ✔ सेवा नेमक्या सांगा — सारेच करतो असे नको ✔ स्टार्टअपसाठी — उत्पादन/सेवा आणि समस्या कोणती सोडवते हे स्पष्ट करा ✔ रुग्णालय — विशेषज्ञता, शुल्क आणि संपर्क हे अत्यावश्यक |
✖ जाहिरात वाटेल असे लिखाण — “सर्वोत्तम संस्था” असे नको ✖ पैशाच्या बदल्यात संस्था परिचय — हे संपादकीय धोरणाच्या विरुद्ध ✖ अपूर्ण संपर्क माहिती — वाचक अडतो ✖ बंद झालेल्या संस्थेचा परिचय — आधी खातरजमा करा |