सह्याद्री मराठी वाहिनी

Category: सौंदर्य

सौंदर्याची निगा राखून त्यात भर घालण्यासाठी उपयुक्त नैसर्गिक सौंदर्य सुचना जाणून घ्या. सदर वाचण्यासाठी सह्याद्री मराठी वाहिनी ला आवश्य भेट द्या!

  • केसांसाठीचा नैसर्गिक मुखवटा

    केसांसाठीचा नैसर्गिक मुखवटा

    सुक्या आणि कोरड्या केसांसाठी नारळ तेल + मध + अंडी मुखवटा अत्यंत प्रभावी उपाय आहे, कारण अंडी प्रोटीनयुक्त असल्यामुळे केसांचे पोषण आतून होते.  मध नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते आणि नारळ तेल केस मऊ व चमकदार ठेवते.

    यासाठी एक अंडं, एक मोठा चमचा मध आणि १ मोठा चमचा नारळ तेल नीट मिक्स करून केसांच्या मुळापासून टोकांपर्यंत लावा, हलक्या हाताने स्कैल्पवर मसाज करा आणि तीस –पंचेचाळीस मिनिटे झोपल्यास किंवा ठेविल्यास पोषण गहिरे जाऊन केस मऊ, घनदाट आणि नैसर्गिक चमकदार बनतात, नंतर कोमट पाण्याने शॅम्पू करून धुवा, ज्यामुळे केस ताजेतवाने, मजबूत आणि फाटलेले टोकही सुधारलेले राहतात. याचबरोबर, केस गळती आणि मजबुतीसाठी दही + मेथी + आलं मुखवटा खूप फायदेशीर आहे; दोन मोठे चमचे दही,एक मोठा चमचा मेथी पावडर आणि एक छोटा चमचा किसलेलं आलं एकत्र करून केसांवर लावा, हलक्या हाताने मोकळ्या स्कैल्पवर मसाज करा आणि तीस मिनिटे ठेवा, यामुळे केसांची मुळे घट्ट होतात, गळती कमी होते, स्कैल्प ताजेतवाने राहतो आणि केस अधिक घनदाट, पोषित व चमकदार दिसतात; नियमित वापर केल्यास हे मुखवटे केसांचे आरोग्य दीर्घकाळ टिकवतात आणि नैसर्गिक सौंदर्य वृद्धिंगत करतात.

  • काळजीपूर्वक करावे नेल एक्स्टेंशन

    काळजीपूर्वक करावे नेल एक्स्टेंशन

    हे फॅशनचे युग आहे ! प्रत्येकजण आपला ‘लूक’ आणि सौंदर्याची विशेष काळजी घेताना दिसतो. मुलगा असो किंवा मुलगी, आजकाल याबाबत खूप जागरूक झाले आहेत. विशेषत: महिला प्रत्येक प्रसंगात आकर्षक दिसण्यासाठी फार मेहनत घेतात. त्यांच्या पोशाखांपासून ते केशभूषा, पादत्राणे या सर्व गोष्टी महिलांना परिपूर्ण हव्या असतात. नखे हा सुद्धा सौंदर्याचा एक भाग आहे. आकर्षक नखांमुळे हातांचे सौंदर्य खुलते.

    स्वच्छ-सुंदर, सरळसोट नखे सर्वांनाच हवी असतात. नखे सजविण्यासाठी ब्युटिशियनकडे अनेक उपाय असतात. मुली नखांना छान आकार देतात. शिवाय असे नवनवे ‘ट्रेंड’ सहजपणे स्वीकारतात. आजकाल बऱ्याच मुली नखांना ‘परफेक्ट लूक’ देण्यासाठी ‘नेल एक्स्टेंशन’चा अवलंब करताना दिसतात.

    पावसाळ्यात नखांचे सौंदर्य वाढविण्यासाठी ‘नेल एक्स्टेंशन’ करतात; म्हणजेच नखे वाढवली जातात आणि त्यांना आकर्षक आकार देऊन ती डिझाईनने सजवली जातात; जेणेकरून ती फार सुंदर दिसतील. आता हे सर्वसामान्य झाले आहे. आपण जर ‘नेल एक्स्टेंशन’ करण्याचा विचार करीत असाल, तर एक आठवड्यासाठी दररोज तेल किंवा ‘मॉइश्चरायझर’ ने नखांना मसाज करा. यासाठी तुम्ही नारळ, बदाम तेल वापरू शकता.

    जर तुम्ही नखावरचे ‘नेल एक्स्टेंशन’ काढून टाकले असेल, तर नक्कीच काही दिवस नखांना ‘नेल पेंट’ वापरू नका. गरजेसाठी ‘नेलपेंट’ लावल्यास रात्री झोपण्यापूर्वी काळजीपूर्वक काढून टाका. हे करणे आवश्यकच असते; कारण नखे वाढवल्यामुळे, नखांना हवा उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत ‘नेल पेंट’ लावल्यास नखे नैसर्गिक हवेच्या संपर्कात येऊ शकणार नाहीत.

    ‘नेल एक्स्टेंशन’ केल्यामुळे नखे पातळ आणि कमकुवत होतात. त्यामुळे जर तुम्ही ‘नेल एक्स्टेंशन’ करीत असाल, तर त्यानंतर नखांवर ‘नेल स्ट्राँगर’ लावा. तसेच ‘नेल पेंट’ लावण्यापूर्वीही त्याचा वापर करा, जेणेकरून नखे मजबूत राहतील.

    नखे सुंदर दिसण्यासाठी आधुनिक कलात्मकता गरजेची आहे. अलीकडे नखे सजविण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुली या पर्यायांचा अवलंब करतात. सौंदर्यप्रसाधनाचे हे उपाय करीत असताना त्याचे विपरित परिणाम शरीराच्या त्या अवयवावर होऊ नयेत, याची दक्षता घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठीच कोणताही उपाय काळजीपूर्वक केलेलाच कधीही चांगला असतो.

  • ओठांची काळजी घ्यावी

    ओठांची काळजी घ्यावी

    ओठांचे फुटणे सामान्य आहे. अशा वेळी व्हॅसलीन किंवा लिप बाम वापरले जातात. काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास निश्चित चांगला परिणाम जाणवतो. हिवाळ्यात कोरडे वारे वाहत असतात. त्यामुळे त्वचा कोरडी होते, ओठांनाही भेगा पडतात. ओठांची त्वचा अतिशय नाजूक असते.

    त्यामुळे या बदलत्या ऋतूमध्ये ओठांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा फाटलेले ओठ चेहऱ्याच्या सौंदर्यावर डाग पाडण्याचे काम करतात. शिवाय ते वेदनाही देतात. लिप बाम आणि व्हॅसलीन लावल्याने विशेष असा फायदा होत नाही. त्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे ॲलर्जी किंवा चिडचिड होऊ शकते. कोरडेपणा आणखी वाढू शकतो.

    हिवाळ्यात ओठ फुटण्याचा त्रास होत असेल तर रोज झोपण्यापूर्वी बदामाचे तेल ओठांवर लावा. ५ मिनिटे ओठांना हलके मसाज करा. यामुळे संपूर्ण हिवाळ्यात आपले ओठ गुलाबी आणि मुलायम राहतील. फाटलेले ओठ बरे करण्यासाठी खोबरेल तेल हा एक चांगला उपाय आहे. जे लोक ओठ आणि त्वचेवर खोबरेल तेल लावतात, त्यांना कोरड्या ओठांची समस्या जाणवत नाही. दिवसातून २-३ वेळा ओठांवर खोबरेल तेल लावावे.

    यामुळे ओठांच्या दुखण्यापासून आराम मिळेल. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना क्रीम लावून मसाज करावे. याने ओठ 2-3 दिवसात मऊ आणि कोमल होतील. ओठ फुटण्याची समस्या असणाऱ्यांनी मध वापरावे. यामुळे ओठ मऊ होतील. भेगा कमी होतील. हिवाळ्यात खूप थंड किंवा गरम पाण्याने चेहरा वारंवार धुवू नये. जास्त रंग, वास किंवा अल्कोहोल असलेली उत्पादने वापरणे टाळावे. ओठांभोवतीची त्वचा स्वच्छ करावी. ओठांना व्यवस्थित मसाज करावा. रात्री झोपण्यापूर्वी लिप बाम वापरावा.

  • सुंदर चेहऱ्यासाठी

    सुंदर चेहऱ्यासाठी

    आपला चेहरा सुंदर दिसावा, असे सर्वांनाच वाटत असते. यासाठी काही गरजेच्या गोष्टी तर केल्याच पाहिजेत. सुंदर चेहऱ्यासाठी दिवसातून दोनवेळा चेहरा स्वच्छ धुवा. त्यामुळे चेहरा धुलीकणापासून मुक्त होतो. पाण्यामुळे चेहऱ्यावरील त्वचा पूर्णपणे स्वच्छ आणि तेजस्वी होते. डाग, पुरळ आणि निस्तेजपणावर देखील उपचार होतात.
    चेहरा बर्फाच्या थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचा चमकदार होईल. निरोगी दिसेल.

    मुरुमांची शक्यता कमी होईल. वृद्धत्वाची चिन्हे देखील कमी करेल. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होईल. चेहऱ्याचा मसाज हा तणाव दूर करण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. चेहऱ्यासाठी हा एक अप्रतिम उपाय आहे. मसाज वृद्धत्वविरोधी उपचार आहे.यामुळे तरुणपणाची चमक मिळते. रक्तप्रवाह सुरळीत होतो. विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. म्हणून हलक्या हाताने मसाज करावा.

    भरपूर पाणी प्यावे. पाण्याची कमतरता त्वचेवर दिसून येते. त्वचा कोरडी होते. अशा त्वचेवर सुरकुत्या पडण्याची शक्यता जास्त असते. आपण दररोज दोन ते तीन लिटर पाणी प्यावे. पाणी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढते. पेशींमध्ये पोषकद्रव्ये वाहून नेते. हे मुरुम, खुणा कमी करण्यास आणि वृद्धत्वाच्या प्रक्रियेस विलंब करण्यास देखील मदत करते.बाहेर जाताना फेस मास्क वापरा. याबाबत अजिबात आळस करू नका. पुरेशी झोप घ्या. विनाकारण जागरण करू नका. वेळेवर झोपा.

  • द्रव साबणाने त्वचा सुंदर

    द्रव साबणाने त्वचा सुंदर

    उन्हाळी हंगाम आला आहे आणि उन्हाळ्यासाठी योग्य शॉवरच्या नियमानुसार स्विच करण्याची वेळ आली आहे. बॉडी वॉशसह उन्हाळ्याच्या ब्लूजवर मात करण्यासाठी स्वतःला तयार करा जे त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि आनंददायी सुगंधाने ताजेतवाने ठेवते.

    बॉडी वॉश किंवा शॉवर जेल हा मुळात लिक्विड साबण आहे जो तुमची त्वचा स्वच्छ करतो, मॉइश्चरायझ करतो आणि पोषण करतो. हे बॉडी वॉश रेग्युलर बार साबणांसाठी योग्य रिप्लेसमेंट आहेत कारण ते प्रवासासाठी अनुकूल, वापरण्यास सोयीस्कर आणि भरपूर फोम तयार करतात. बॉडी वॉश हे तुलनेने स्वच्छ असतात कारण लिक्विड फॉर्म्युलेशन बाटलीत येते आणि हातांनी अस्पर्श केले जाते. असे बरेच ब्रँड आहेत जे अद्वितीय फॉर्म्युलेशन आणि विविध प्रकारांसह येत आहेत जे तुमच्या त्वचेसाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत.

  • चमकदार त्वचेसाठी

    चमकदार त्वचेसाठी

    आपण सुंदर, मोहक, आकर्षक दिसावे, असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. अनेकजणी त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. निरोगी त्वचा मिळविण्यासाठी महागड्या उत्पादनांचा वापर करतात; पण एवढे करूनदेखील काही महिलांना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता. त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी साजूक तूप चांगले आहे.

    आयुर्वेदात साजुक तुपाचा वापर वर्षानुवर्षे विविध आजार दूर करण्यासाठी सांगितलेला आहे. त्वचेसाठी देखील तुपाचा वापर करु शकता. तुपात असलेले ‘जीवनसत्व ए’ आणि ‘ओमेगा -3’ चे प्रमाण त्वचेला नैसर्गिकरित्या कोमल ठेवण्यासाठी मदत करते. त्वचेवरील कोरडेपणाची समस्याही दूर राहते. यासाठी घरगुती ‘चेहरा कलप’ अधिक उत्तम ठरू शकतो. तुपाचा वापर करून देखील घरच्या घरी हा कलप तयार करू शकता. स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हा कलप तयार करता येतो.

    बनविण्याची पद्धत खालीलप्रमाणे :
    २ चमचे बेसन पीठ, दीड चमचा तूप, १ चमचा गुलाबपाणी या तीन गोष्टी एकत्रित करून चांगले मिश्रण बनवा. त्यानंतर हे तयार मिश्रण चेहऱ्याला लावा. हे मिश्रण सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. तुपामुळे चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. नेहमीच तुपाचे २ ते ३ थेंब चेहऱ्याला लावून मसाज केले तर चेहरा अगदी खुलून दिसतो. दररोज चेहऱ्याला देशी तुपाने मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते; परिणामी त्वचेवर चमक येते. त्यामुळे चेहऱ्यावर उत्साह टिकवून ठेवण्यासाठी देशी तुपाचा वापर करू शकता. बहुतांश लोक आपल्या ‘डाएट’मध्ये देखील प्राधान्याने तुपाचा समावेश करतात.

  • घामोळ्यापासून सुटकेसाठी घरगुती उपाय

    घामोळ्यापासून सुटकेसाठी घरगुती उपाय

    उन्हाळा म्हटला की येणारा प्रचंड घाम आणि त्या घामामुळे शरीरावर येणारे लाल चट्टे, घामोळी यांमुळे जीव अगदी हैराण होतो. जिथे घाम साचतो त्याठिकाणी हमखास आपल्याला बारीक पुरळ आलेले दिसते. त्या पुरळाला खाज सुटली की माणूस अक्षरशः बेचैन होतो. यावर काही घरगुती उपायांनी मात करता येते. पण याची तीव्रता वाढल्यास मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

    ‘मुलतानी माती’ कुठल्याही औषधांच्या दुकानात अगदी सहज उपलब्ध होते. आवश्यक तेवढी मुलतानी माती एका वाटीत काढायची. तिच्यात पाणी मिसळून गुठळ्या होणार नाहीत ना याकडे लक्ष द्यायचे. तिची पेस्ट बनवायची आणि जिथे घामोळ्या किंवा लाल चट्टे आहेत त्या भागावर लावायची. ती वाळल्यावर थंड पाण्याने धुवायची. एक दिवसाआड हा उपाय केल्यास तुम्हांला फरक जाणवू शकतो.

    ‘चंदन’ तर मूळातच थंड. त्यामुळे चंदन उगाळून किंवा चंदनाच्या पावडरची पेस्ट तयार करायची. चंदन उगाळताना किंवा चंदनाच्या पावडरची पेस्ट तयार करताना तिच्यात गुलाबपाणी मिसळावे. ते शरीराला लावावे. कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवाने. हे आठवड्यातून ३ वेळा केल्यास शरीराची होणारी लाही कमी होते.

    कधी ‘दही’ अंगाला लावलेले पाहिले आहे का किंवा तुम्ही कधी लावले आहे का? जर नसेल, तर हा उपाय नक्की करा. दह्यामध्ये विषाणूंशी लढण्याची सर्वांत जास्त शक्ती असते. एका वाटीत दही घ्यायचे. ते फेटून त्याची पेस्ट करून घ्यायची आणि खाज येणाऱ्या शरीराच्या भागाला लावायची. १५ ते २० मिनिटांनी दही लावलेला भाग धुवून टाकायचा. हा उपाय जर रोज केला, तर शरीरामधील उष्णता कमी होण्यास मदत होते.

    ‘कोरफडी’चा गर एका वाटीत काढून घ्यायचा. तो गर जिथे घामोळ्या किंवा लाल चट्टे आले आहेत त्या भागाला लावायचा. अर्ध्या तासानंतर धुवून टाकायचा. हा उपाय तुम्ही दिवसातून कितीही वेळा करू शकतात.
    ‘कच्ची कैरी‘ शिजवून घ्यायची. तिचा गर काढून तो फ्रिजमध्ये ठेवायचा. मग जिथे घामोळे आहे त्या भागावर लावायचा. थोड्यावेळाने धुवून टाकायचा. त्यामुळे घामोळ्यांपासून आराम मिळतो आणि शरीरातील उष्णताही कमी होते.

    ‘कडुलिंब’ हा मूळातच बहुगुणी आणि औषधी आहे. कडुलिंबाची पाने एक लीटर पाण्यात उकळवून घ्या. त्या पाण्याने दररोज आंघोळ केल्यास उन्हाळ्यामुळे येणाऱ्या घामोळ्याचा, लाल चट्ट्यांचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे तुम्ही कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करूनही ती लावू शकतात. ती लावल्यावर १५ मिनिटांनी धुवून टाकायची. आठवड्यातून दोन वेळा ही पेस्ट लावल्यास फरक जाणवेल.

  • केसांचे पोषण असे करा

    केसांचे पोषण असे करा

    आपले केस जाड आणि सुंदर असावेत असे प्रत्येक मुलीला वाटते. यासाठी ती बाजारातून अनेक महागडे पदार्थ खरेदी करते, आणि स्पाही घेते; परंतु या सर्वांमध्ये अनेक रसायने असतात, ज्यामुळे केस मुळांपासून कमजोर होऊन कोरडे होतात. काही घरगुती उपाय आहेत, जे केसांच्या पोषणासाठी फायदेशीर आहेत.

    एरंडेल तेल
    एरंडेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व ‘ई’ असते. हे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. एरंडेल तेल आपल्या केसांवर व्यवस्थित लावायचे आहे. अर्ध्या तासानंतर केस धुवू शकता.

    संत्र्यांची प्युरी
    केस जाड करण्यासाठी संत्र्याची प्युरी प्रभावी ठरू शकते. संत्र्याच्या प्युरीने केसांना मसाज करावे. अर्ध्या तासाने केस धुवावेत.

    अंडी
    एक ते दोन अंडी फेटून हे मिश्रण केसांना ३० मिनिटे लावावे. केस धुतल्यानंतर, तुम्हाला आपोआप सकारात्मक परिणाम दिसू लागतील.

    मेथीदाणे
    केसांसाठी मेथीदाणे फार उपयोगी आहेत. भिजवलेल्या मेथीदाण्यांची पेस्ट करुन ती केसांचया मुळांना लावावी. यामुळे केसांचे पोषण होईल.

    हे घरगुती उपाय आजीच्या अनुभवांतून आलेले आहेत. त्यांचा अवलंब केल्यास नक्कीच चांगले परिणाम दिसतील. तरीही वैद्यकीय सल्ला घेतल्यास कधीही चांगलेच !

  • घरीच बनवा आवळा कंडिशनर

    घरीच बनवा आवळा कंडिशनर

    घरी बनवलेले फेसपॅक किंवा हेअर मास्कचा नियमित वापर उत्कृष्ट परिणाम देतो. आपले केस रेशमी आणि मजबूत बनवण्यासाठी घरच्या घरी कंडिशनर कसे बनविणे शक्य आहे. हे कंडीशनर दही आणि मेथीच्या दाण्यांपासून बनवले जाते. ते केसांवर खूप चांगले परिणाम दर्शवते. आवळा हा जीवनसत्व ‘सी’चा एक शक्तिशाली स्रोत आहे. हा ‘कोलेजन’ निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. केसांची ताकद आणि लवचिकता राखण्यासाठी ‘कोलेजन’ आवश्यक आहे. यामुळे केस मजबूत होतील. तुटण्याची शक्यता कमी होईल.

    हे रक्ताभिसरण वाढवू शकते, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो. जर तुमच्या केसांमध्ये खूप कोंडा असेल तर आपण कंडिशनर लावू शकता. नियमितपणे लावल्याने टाळू निरोगी होईल. आवळा केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी ओळखला जातो. आवळ्याचे कंडिशनिंग गुणधर्म केसांना मऊ बनवतात. आवळा कंडिशनरचा प्रभावीपणे फायदा होण्यासाठी ते स्वच्छ आणि ओल्या केसांवर लावा. नंतर काही वेळ राहू द्यावे आणि नंतर चांगले धुवावे.

    या कंडिशनरसाठी लागणारे साहित्य : 2 चमचे मेथी दाणे, अंबाडीचे दाणे २ चमचे तांदूळ, १ आवळा, ठेचून आले, पाणी, अर्धा लहान चमचा एरंडेल तेल, 1 मोठा चमचा बदाम तेल, आवळ्याचा रस किंवा आवळा पावडर
    हा कंडीशनर बनविण्यासाठी एका काचेच्या भांड्यात मेथी दाणे आणि तांदूळ घाला. त्यात पाणी घालून रात्रभर भिजवू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेले साहित्य गाळून घ्या. त्यात ठेचलेला आवळा आणि आले घाला. पाणी घालावे. एका कढईत थोडा कढीपत्ता घालून मिश्रण एक मिनिट उकळवा. आता हे मिश्रण गाळून घ्या. आवळा पावडर किंवा आवळ्याच्या रसात गाळलेले मिश्रण मिसळा. नंतर त्यात अर्धा मोठा चमचा एरंडेल तेल आणि १ मोठा चमचा बदाम तेल घाला. केसांना नीट मसाज करताना ते लावा. तासभर तसेच राहू द्या आणि नंतर केस स्वच्छ धुवा.
    हा प्रयोग करण्यापूर्वी आपल्या ब्युटिशिअनचा सल्ला घ्या.

  • केसांचे पोषण

    प्रत्येक मुलीला तिचे केस निरोगी आणि पोषक असावेत असे वाटते. शेवटी सुंदर केस आत्मविश्वासासोबतच तुमचे सौंदर्य वाढवतात. प्रदूषण, धूळ, माती आणि घाण यांच्या संपर्कात आल्याने केसांचे सौंदर्य नष्ट होते. याशिवाय केसांमध्ये पोषण नसल्यामुळेही केसांचे सौंदर्य हिरावले जाते. त्यामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात. तुम्ही कोरड्या केसांनी त्रस्त असाल तर काळजी करू नका. गुडगावचे आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. रॉबिन शर्मा यांनी इन्टाीधग्रामवर केसांना पोषण देण्यासाठी दोन घरगुती उपाय सांगितले आहेत. हे उपाय कोरड्या टाळूचे पोषण करतातच; शिवाय मुळांना आतून मजबूत करतात. सुक्या फळांमध्ये भरपूर पोषणतत्वे असतात. केसांचे आरोग्य राखण्यासाठी येथे सांगितलेला पदार्थ बनवून पहा.

    सर्वप्रथम खजूर आणि अंजीर एका भांड्यात रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. आता दुस-या दिवशी भोपळ्याचे दाणे, नारळाची शेव, अंबाडीच्या बिया, बदाम, अक्रोड, काळे तीळ आणि काजू समप्रमाणात घ्या. आता त्यांना मिक्सरमध्ये हलके हलवा. नंतर तुपात तळून घ्या. आता भिजवलेले खजूर आणि अंजीर मॅश करुन तुपात तळून घ्या. ड्रायफ्रुट्स आणि बियांच्या मिश्रणात मिसळा. या मिश्रणाने तुम्ही 6 ते 10 ग्रॅमचे लाडू बनवू शकता. तज्ज्ञांच्या मते, सकाळी नाश्त्यात एक ते दोन लाडू खा. हे लाडू चांगले चावून खावेत.

    केस चमकदार करण्यासाठी बाहेरून पोषण मिळणे देखील आवश्यक आहे. यासाठी औषधी वनस्पतींपासून बनवलेले तेल खूप फायदेशीर ठरते. वनौषधी तेल बनवण्यासाठी भृंगराज, मंजिष्ठ, मुळी, अश्वगंधा, आवळा, रोझमेरी, हिबिस्कस आणि चहापत्ती घ्या. हे सर्व खोबरेल तेलात गरम करा. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर ते कोमट झाल्यावर गाळून बाटलीत भरून ठेवा. हे हर्बल तेल तुम्ही केस मजबूत करण्यासाठी रोज वापरू शकता. फक्त २०-३० दिवसांत तुमच्या केसांमध्ये खूप फरक दिसेल.

  • कानातील आकर्षक दागिने

    कानातील आकर्षक दागिने

    सणासुदीचा, लग्नसमारंभांचा हंगाम सुरू आहे. या उत्साहाच्या वातावरणात महिलांना वेशभूषा करण्यासाठी निमित्त आणि चांगली संधी मिळते. सणासुदीच्या काळात महिला सुंदर पोशाख आणि दागिन्यांची निवड करतात. पोशाख कितीही जड असला तरी मॅचिंग ज्वेलरी घातल्याशिवाय एकूणच साज अपूर्ण वाटतो. कपड्यांप्रमाणे दागिन्यांचा ट्रेंडही बदलत राहतो. दागिन्यांमध्ये कानातील दागिने सर्वात खास असतात. हे दागिने कानाचे सौंदर्य वाढवतातच, शिवाय व्यक्तीही फार सुंदर दिसते.

    ‘कुंदन ज्वेलरी’ हा कानातील दागिन्यांचा सदाबहार प्रकार आहे. आपणांस बाजारात आणि ऑनलाइन दागिन्यांच्या संकेतस्थळावर सर्वत्र ‘कुंदन’ कानातल्यांचे नवीनतम प्रकार सहज मिळतील. ‘चांदबाली’ हे चंद्राचे झुमके आहेत. खरे तर चांदबाली प्रकार इतके सुंदर असतात की, बघणारा फक्त बघतच राहतो. ‘चांदबाली’ शैलीचे कानातले सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्याचा आकार अर्ध्या चंद्रासारखा असतो. आपण आपल्या आवडीनुसार जड किंवा हलके चांदबाली निवडू शकता. ‘अमेरिकन डायमंड’ हा एक कानातील दागिन्यांचा प्रकार आहे. सणासुदीच्या काळात, बहुतेक सण रात्री साजरे होतात. अमेरिकन हिरा सर्वोत्तम आहे. त्यामुळे हे दागिने रात्री विशेष खुलतात. विशेष म्हणजे हे दागिने पारंपारिक आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखांसोबत वापरता येतात.

  • चेहऱ्यासाठी घरगुती लेप

    चेहऱ्यासाठी घरगुती लेप

    पिठाच्या कोंड्यापासून बनविलेला लेप सौंदर्यवर्धक आहे. उन्हाळ्यात घाम, तसेच उष्णतेमुळे त्वचा रखरखीत होत असते. अशा वेळी रसायनयुक्त लेप वापरण्यापेक्षा घरगुती लेप स्वतःच बनवून त्वचा चमकदार करता येते.

    चेहऱ्याची त्वचा उजळविण्यासाठी पिठाचा कोंडा उपयुक्त आहे. आणखी साहित्य मिसळून पिठाच्या कोंड्याचा लेप घरी बनविता येतो. यासाठी पिठाचा कोंडा एक चमचा, गुलाबपाणी एक चमचा, एक चिमूटभर हळद, कोरफडीचा द्रव एक चमचा, इ. साहित्य लागते.

    प्रथम एका भांड्यात गव्हाचा कोंडा घ्यावा. आता त्यात गुलाबपाणी, हळद आणि कोरफडीचा द्रव घालावा. हे सर्व छान मिसळून लेप तयार करावा. हे मिश्रण चेहऱ्यावर हळूवार लावावे. चेहऱ्यावर १० मिनिटे तसेच राहू द्यावे. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करावा. यामुळे चेहरा छान चमकदार होईल.

  • त्वचा नितळ बनवा

    त्वचा नितळ बनवा

    लिंबाचा वापर केवळ पेयासाठीच नसून त्वचेसाठीही लिंबाचा फायदा उत्तम होतो. कारण यातील जीवनसत्व ‘सी’ हे त्वचेसाठी एक चांगले आणि उत्तम पोषक तत्व ठरते. घरीच बनवा फेसपॅक आणि मिळवा सुंदर नितळ त्वचा !
    साहित्य :
    १ लहान चमचा तांदळाचे पीठ
    5 थेंब लिंबाचा रस
    अर्धा चमचा गुलाबपाणी

    बनविण्याची पद्धत : एका भांड्यामध्ये तांदळाचे पीठ घ्या. त्यात लिंबाचा रस आणि गुलाबपाणी मिसळून घ्या.
    आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटांनी चेहरा धुवा. आठवड्यातून एक वेळा या ‘फेसपॅक’चा उपयोग करून बघा.

    हा फेसपॅक चेहऱ्याला चमक देणारा आहे. चेहऱ्याला आणि त्वचेला अधिक चमकदार करण्यास तो मदत करतो. तांदळाच्या पिठात चेहऱ्याला अधिक तजेलदार करण्याचे तत्व असते. लिंबू हे त्वचा नितळ करण्याचे काम करते. या दोघांमधील गुणधर्मानी चेहरा अधिक चमकदार होतो. आपल्या ‘ब्युटीशियन’चा सल्ला अवश्य घ्या.

  • रोज रहा ताजेतवाने

    रोज रहा ताजेतवाने

    आजच्या जगात दररोज ताजेतवाने दिसणे फार गरजेचे आहे. कार्यालय असो की घर, आप ले व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे, असे प्रत्येक महिलेला वाटत असते. या धकाधकीच्या जीवनात अगदी रोज ताजेतवाने दिसण्यासाठी चेहर्‍यावर ‘मेक-अप’ असायला हवा, असा आपला समज असेल तर तो बाजूला ठेवायला हवा.

    जीवनशैलीतील अगदी साध्या बदलांनी आणि काही उपायांनी दररोज ताजेपणाचा अनुभव घेऊ शकता.
    रोज स्वच्छ आंघोळ करावी. नियमितपणे केस धुवावेत. चेहरा धुण्यासाठी चांगल्या फेसवॉशचा वापर करावा .
    केसांची नीट काळजी घ्यावी. ‘मेक-अप’ करायचा असेल तर ‘लाइट’ आणि नैसर्गिक शेड्सचा वापर करावा.
    दिवसा ‘सनस्क्रीन’ लावूनच घराबाहेर पडावे. कोणताही हंगाम असला तरी ‘सनस्क्रीन’ टाळू नका.

    ताजी फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा. नियमितपणे फळे आणि भाज्या खाव्यात. भरपूर पाणी प्यावे. यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातील. तुमच्या त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळेल.
    कायम हसत रहा. आनंदी, उत्साही राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मूड चांगला राहील. तुमच्या चांगल्या मूडचे प्रतिबिंब चेहर्‍यावर पडल्याशिवाय राहणार नाही.

    रात्री शांत आणि भरपूर झोप घ्या. चांगल्या झोपेमुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता. झोप नीट झाली नाही तर चिडचिड होते. आपण कितीही महागडे उपाय केले, महागड्या ‘स्पा’मध्ये गेलात तरीही अपुर्‍या झोपेमुळे आपला चेहरा तजेलदार दिसणार नाही. त्यामुळे झोपेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नको.

  • केसांकडे दुर्लक्ष नकोच

    केसांकडे दुर्लक्ष नकोच

    जाड आणि मजबूत केस प्रत्येकाला हवे असतात. केस निरोगी ठेवण्यासाठी आपण काय-काय करत असतो. एकापेक्षा एक महाग उत्पादने वापरतो. काही वेळेस घरगुती उपायदेखील केले जातात; परंतु तरीही केसांशी संबंधित समस्या कमी होत नाहीत. काही वेळेस तर त्या बंद झाल्या तरी पुन्हा त्रास सुरू होतो.काही वेळेस कळत-नकळतपणे आपण आपल्या केसांसंदर्भात काही अशा चुका करतो, ज्यामुळे केसांशी संबंधित समस्या वाढतच जातात. अशाच काही चुका, ज्याकडे वेळीच लक्ष देऊन आपण आपले केस सर्व समस्यांपासून वाचवू शकाल. केसांसंदर्भात या चुका कधीही करू नका.

    केस वारंवार कंगव्याने विंचरणे टाळावे; कारण केस जास्त विंचरल्याने केस कमकुवत तर होतीलच; शिवाय ते तेलकटही होतील. गुंता झालेले केस सोडविण्यासा रुंद दातांचा कंगवा वापरावा; आणि हळुवारपणे जटा सोडवाव्यात.केस धुण्यासाठी कमीत कमी शाम्पू वापरावा. जास्त केस धुण्याने केस खराब होतात; पण तुम्ही कसेही जास्त दिवसांनी केस धुवू नका. जास्त वेळ केस न धुतल्याने डोक्यातील सुक्ष्म छिद्रे ‘ब्लॉक’ होतात, ज्यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच दर तिसऱ्या दिवशी केस धुणे चांगले असते.

    जर तुम्ही केस वाळविण्यासाठी ‘हेअर ड्रायर’चा जास्त वापर करीत असाल तर असे करणे टाळावे. त्यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात.केस ओले असताना सर्वात कमकुवत असतात. ओले केस झाडल्यावर ते अधिक तुटू शकतात. केसांच्या समस्या टाळण्यासाठी कधीही ओले केस विंचरून ‘हेअर स्टाइल’ करू नका. ते प्रथम वाळू द्यावेत, त्यानंतरच ‘स्टाइलिंग’ साधने वापरा.

    कंगवा आणि ‘स्टाइलिंग’ साधने नियमितपणे स्वच्छ केली पाहिजेत. त्यांच्यावर साचलेली घाण तुमचे केस खराब करू शकते. कंगवा आणि ब्रश आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करावेत. काही महिन्यांच्या वापरानंतर ते बदलणे चांगले आहे, कारण त्यामुळे डोक्यात संसर्ग होऊ शकतो.केस मोकळे सोडून कधीही झोपू नका. कारण त्यामुळे त्यांचा गुंता होण्याची अधिक शक्यता निर्माण होते. संतुलित आहार न घेतल्यानेही केसांशी संबंधित समस्या निर्माण होतात.

  • साध्या उपायांनी पळवा डाग

    साध्या उपायांनी पळवा डाग

    शरीरावर जखमा होणे, यात विशेष काही नाही ! कधी खेळताना, काम करताना किंवा एखाद्या अपघातात अंगावर जखमा होतात. या जखमा भरुन येण्यास ठराविक वेळ जातो. कधीकधी जखम बरी झाली, तरी त्याचा डाग मात्र तसाच राहतो. हा डाग दिसण्यासारखा असला, तर नैराश्य येते. हे डाग घालविण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय करुन पहावेत.

    मेथीचे दाणे रात्रभर भिजवावेत. सकाळी त्याचे वाटण करून लेप बनवावा. हा लेप जखमेवर लावावा. लेप पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. मेथीप्रमाणेच हळदीचा लेप बनवून लावल्यास जखम लवकर भरण्यास तसेच व्रण दूर होण्यास मदत होते. बटाट्याची साल काढून ती जखमेवर लावावी; मात्र ही साले स्वच्छ धुवून घ्यावीत.

    लिंबू आणि टोमॅटो घरात सहज उपलब्ध असतात. जखम थोडीशी बरी झाल्यानंतर हा उपाय करावा. साध्या पाण्याने जखमेचा भाग स्वच्छ धुवून घ्यावा. त्यावर ओला आणि स्वच्छ कपडा ठेवा. काही तासाने ताज्या लिंबाच्या रसात बुडवलेले कापड या जखमेवर ठेवा.

    त्वचा सुकल्यानंतर त्यावर टोमॅटोचा रस लावावा, असे दिवसातून दोन वेळा केल्यास जखमेचा डाग कमी होण्यास मदत होईल. बदामाचे तेल जखमेवर लावल्यावर त्यापासून लवकर आराम मिळेल. दिवसातून दोनवेळा हे तेल जखमेवर लावून हलका मसाज करावा.

  • पाणी प्या सुंदर बना

    पाणी प्या सुंदर बना

    आपण कधीही वृद्ध होऊ नये, कायम तरूण दिसावे असे प्रत्येकालाच वाटते. नेहमी तरूण, सुंदर दिसावे, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते, नाही का?अनेक अभिनेते, अभिनेत्री वयाची पन्नाशी उलटल्यानंतरही पंचविशीत असल्यासारखे दिसत असतात. यामागे त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायाम याची महत्वाची भूमिका असते.
    शरीरातील सर्व क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पाणी महत्वाचे आहे.

    सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्या. सकाळी १ ते २ ग्लास गरम पाणी प्यायल्याने आतडे स्वच्छ राहते. पोट साफ होण्यास मदत होते. याशिवाय आजारांचा धोका टळतो. त्वचा चमकदार राहते. थंड पाणी पिणे टाळा. उन्हाळा असो किंवा हिवाळा थंड पाणी पिऊ नका. थंड पाणी सतत प्यायल्याने मेंदू व हृदयाच्या नसांवरही परिणाम होतो. अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. जेवल्यानंतर पाणी पिऊ नका.

    आयुर्वेदीक तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर लगेचच थंड पाणी पिऊ नका. जेवल्यानंतर अन्न पचविण्यासाठी वेळ द्यावा लागतो. जर तुम्ही लगेचच पाणी प्यायलात तर जठराग्नी थंड पडतो. यामुळे अन्न पचण्याची क्रिया थंड होते. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी पिणे उत्तम ठरते.

    कायम तरूण दिसण्यासाठी आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने नव्हे तर पाण्याने करा. याचे कारण असे की पाण्यामुळे त्वचेच्या ऊतींची भरपाई होण्यास मदत होते. रोज बदाम आणि अक्रोड खा. यामध्ये असलेले ‘ई’ जीवनसत्व त्वचेचे पोषण करते.प्रथिनयुक्त अन्न जेवा. ते खराब झालेल्या ऊतींना बरे करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते. नियमित प्राणायाम- योगासने करा.

  • केसांसाठी उपयुक्त मेथीदाणे

    केसांसाठी उपयुक्त मेथीदाणे

    मेथीदाण्यात फॉलिक अ‍ॅसिड, जीवनसत्व ए, सी आणि के यासारख्या पोषकतत्वांचा समावेश असून केसांची वाढ आणि केसांशी संबंधित समस्यांवर ती गुणकारी ठरतात. मेथीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण अधिक असते. जे शरीराला आतून आणि केसांना बाहेरून पोषण प्रदान करतात.

    केसांच्या समस्यांमधून सुटका मिळण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा हे प्रत्येकाला माहीत नसते. केस गळती होत असेल तर मेथी दाण्याचे फायदे होतात. २ चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्यानंतर भिजलेले मेथी दाणे त्याच पाण्याचा वापर करून मिक्सरमधून वाटून बारीक करून घ्यावे. हे वाटण केसांना लावावे. साधारण २० मिनिटे तसेच ठेवून त्यानंतर शाम्पूने धुवावेत. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून २ वेळा याचा वापर करावा.

    कोंड्यासाठी मेथी दाण्याचा अधिक चांगला वापर करता येऊ शकतो. याकरिता दोन चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी बारीक करून घ्यावेत. त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा. हे मिश्रण केसांना लावावे आणि ३० मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर केस शाम्पूने धुवावेत. असे केल्याने कोंडा लवकर निघून जाईल.
    केसांना मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठीही मेथी दाण्याचा उपयोग करता येतो. तसेच यामुळे केसगळतीही थांबते.

    केसांचे आरोग्य सांभाळण्यासाठी एक चमचा मेथीचे वाटण आणि १ चमचा नारळाचे दूध मिसळून घ्यावे. हे मिश्रण केसांना मुळापासून लावावे. मिश्रण लावताना बोटांचा वापर करावा.२० मिनिटे तसेच ठेवून मग थंड पाणी आणि शाम्पूने धुवावेत. मेथीतील लोह रक्तप्रवाह चांगला ठेवते आणि केसांची वाढ होण्यास तसेच केस अधिक सुंदर आणि मजबूत होण्यास मदत करते. केसांच्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी आहारामध्येही याचा समावेश करू शकता. मेथी दाण्याचे पाणी पिणेही सोयीस्कर ठरते. हे उपचार वैद्यकीय सल्ल्याने करणे योग्य आहे.

  • दातांचे सौंदर्य

    दातांचे सौंदर्य

    दरवर्षी २० मार्च हा दिवस ‘जागतिक दंत आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी या दिवसाची संकल्पना ‘तुमच्या तोंडाचा अभिमान बाळगा’ अशी आहे. दातांच्या समस्यांबद्दल बोलायचे झाले तर दात पिवळे पडणे, हिरड्या दुखणे, दातदुखी आणि दात कमकुवत होणे अशा अनेक समस्या खूप त्रास देतात.

    आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने आपण आपले दात पांढरे आणि चमकदार बनवू शकता. वडाच्या फांदीचा वापर आपण दात साफ करण्यासाठी देखील करू शकता. वडाची मुळे तुरट असतात, जी केवळ दात पांढरे करीत नाहीत, तर दात आणि हिरड्यांचे आरोग्य देखील सुधारतात. तुळशीचा अनेक प्रकारे आपण वापर करू शकतो. हा उपाय करण्यासाठी तुळशीची पाने सुकवून त्याची भुकटी बनवावी. ही भुकटी दात घासण्यासाठी वापरावी. तुळशीची हिरवी पाने दातांची स्वच्छता सुधारतात, आणि दात पांढरे होतात. हे ‘पायोरिया’ सारख्या दंत समस्यांवर देखील उपचार करू शकते.

    पांढरे निरोगी दात मिळविण्यासाठी कडुलिंब हा पारंपरिक उपाय आहे. कडुलिंबाच्या फांद्या आजही अनेक भारतीय ‘टूथब्रश’ म्हणून वापरतात. कडुलिंबाच्या तेलामध्ये तुरट आणि जंतुनाशक गुणधर्म असतात, जे श्वासाची दुर्गंधी रोखतात, दातांमधील जंतू नष्ट करतात. दात पांढरे करण्यासाठी आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्रिफळा वापरू शकता. त्यामुळे तोंडाचे व्रण कमी होण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी त्रिफळा पाण्यात उकळवा. थंड होऊ द्या. कोमट झाल्यावर या पाण्याने दात स्वच्छ धुवा.

  • जपा नखांचे सौंदर्य

    जपा नखांचे सौंदर्य

    हात आणि बोटे सुंदर दिसण्यासाठी महिला नखांवर रंग (नेलपेंट) लावतात. नखांना रंग देऊन सजविण्याचे अनेक प्रकार आजकाल बाजारात दिसतात. निरनिराळ्या प्रकारच्या रंगांचे आजकाल नखांवर प्रयोग केले जातात; मात्र बऱ्याच वेळेस हे रंग चुकीच्या पद्धतीने लावण्यामुळे नखांचे सौंदर्य बिघडते; कारण या रंगांमध्ये हानिकारक रसायने असतात.

    नखांना अशा पद्धतीने सजविताना काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत. नखावरचा जुना रंग काढून नवीन रंग देताना आधीचा रंग पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. बऱ्याचजणींना वेळ नसल्याने आहे त्या रंगावरच त्या रंग देतात. असे करणे नखांसाठी मुळीच चांगले नाही. त्यामुळे नखांचे पोषण होत नाही. यासाठी नखे नेहमी ‘रिमूव्हर’ने स्वच्छ करून घ्यावीत; आणि मगच नवीन रंगाचा साज द्यावा.

    नखावरील रंग काढण्यासाठी नेहमी चांगल्या ‘रिमूव्हर’चा वापर करावा. जर नखांवरील रंग नखांनीच खरडून काढलात तर यामुळे नखांवर ओरखडे उठतात. नखांचे सौंदर्य खराब होतेच; पण नखांची वाढही खुंटते. नखे कायम निरोगी राहण्यासाठी ही चूक कधीच करू नका. नखांना रंग लावल्यानंतर कमीत कमी अर्धा तास कोणतेही काम करू नका. जरी आपला रंग लगेच वाळला तरीही काही मिनिटे हात तसेच ठेवावेत. असे न केल्यास रंग व्यवस्थित वाळत नाही, आणि मग नखांमध्ये आणि त्यांच्याखाली असणाऱ्या कोशिकांमध्ये पसरतो. रंगामधील रसायने नखे आणि कोशिकांचे नुकसान करतात. यासाठी रंग सुकण्याची वाट पहा.

  • राणीहाराची परंपरा आजही कायम

    राणीहाराची परंपरा आजही कायम

    महिलांच्या सुंदरतेमध्ये भर घालतात ते म्हणजे दागिने ! चेहर्‍यावरील मेकअप, केशरचना आणि साड्यांसह दागिन्यांमुळे स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलून येते. प्रत्येक महिलेकडे वेगवेगळ्या पद्धतीचा दागिन्यांचा ‘सेट’ हा असतोच. कोणत्या कार्यक्रमात कसे दागिने वापरायचे हेदेखील ती ठरवत असते. तसे तर आज काल बाजारात विविध प्रकारचे आकर्षक दागिने दिसून येतात; परंतु काही पारंपरिक दागिने मात्र आजही आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. सगळ्यात लक्ष वेधून घेणारा दागिना म्हणजे ‘राणीहार’ ! अर्थात ‘राणीहार’ म्हटले की आपल्यासमोर पूर्वीच्या राण्यांच्या प्रतिमा उभ्या राहतात. आजही अनेक नववधू लग्नामध्ये ‘राणीहार’ घालण्याला प्राधान्य देतात.

    हा ‘राणीहार’ कोणत्याही सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानातून विकत घेऊ शकता. ‘राणीहार’ हा खरे तर राजस्थानी संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करतो. राजस्थानच्या राजघराण्यातील महिला आपल्या श्रृंगारात या हाराचा समावेश करून घेत होत्या. कोणत्या शतकात या हाराची निर्मिती झाली अथवा कोणत्या राणीने सर्वात पहिल्यांदा या हाराचा उपयोग केला, हे सांगणे तसे कठीण आहे; मात्र, आजही राजपूत घराण्यात अशा पद्धतीचे ‘राणी हार’ घालण्याची परंपरा कायम आहे. अनेक घरात पिढ्यानपिढ्या हा हार जपत असल्याचे दिसून येते. पूर्वीच्या काळी हा हार राणी घालत असल्यामुळेच याला ‘राणी हार’ असे नाव प्राप्त झाले. मोती अथवा रत्नांनी हा हार पूर्वीपासून तयार करण्यात येतो. किमान तीन ते चार लड असणारा हा ‘राणीहार’ अत्यंत सुंदर दिसतो आणि मोठा असतो.

    आजच्या काळात यामध्ये अनेक बदलही झालेले दिसून येतात. मुख्यत्वे आता केवळ श्रीमंत घराण्यातील महिलाच नाही, तर अगदी मध्यमवर्गीय महिलाही अशा पद्धतीचा ‘राणीहार’ आपल्या दागिन्यांमध्ये समाविष्ट करून घेतात. आता यातही नवे ‘ट्रेंड’ येताना दिसतात. तुम्हाला ‘चोकर’ सह जास्त लड असणारा ‘राणीहार’ मिळू शकतो. तसेच तुम्ही एखाद्या भरजरी साडी अथवा भरजरी लेहंग्यावर याचा वापर करू शकता . 5 लड असणारा ‘राणीहार’ही उपलब्ध असतो. हा तुम्ही ‘व्ही’ नेकलाईनच्या ब्लाऊजवर घालू शकता. साधारणतः 3-5 लड असणारे ‘राणी हार’ तुम्हाला सोनाराच्या दुकानात अथवा बाजारात ‘इमिटेशन ज्वेलरी’मध्ये उपलब्ध होतात. जे तुम्ही भरजरी साड्या अर्थात ‘कांजीवरम’ साडी, ‘बांधणी’ अथवा ‘बंधेज’ साडी, ‘लहरिया’ साडी, लेहंगा यासह परिधान करू शकता.

    राणीहार हा रत्न, मोती आणि वेगवेगळ्या खड्यांनी तयार करण्यात येतो. याची मूळ किंमत ही लाखोंच्या घरात असते. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने ‘राणीहार’ तयार करून घेऊ शकता. तुम्हाला ‘आर्टिफिशियल’ अथवा ‘इमिटेशन’ राणीहार हवा असेल, तर तो बाजारामध्ये साधारणतः 500 रूपयांपासून ते तुमच्या खिशाला परवडेल अशा किंमतीपर्यंत मिळू शकतो. तुम्हाला वेगवेगळ्या ‘डिझाईन्स’ आणि तुमच्या आवडत्या खड्यांमध्येही राणीहार मिळू शकतात. तुम्ही तुमच्या लेहंगा आणि साडीच्या रंगाप्रमाणे याची खरेदी करू शकता.

  • सब्जा खा प्रसन्न रहा

    सब्जा खा प्रसन्न रहा

    रखरखीत उन्हाळ्यात शरीराला थंड पदार्थांची गरज असते. पोटाशी संबंधित काही समस्या यावेळी डोके वर काढतात. सब्जा हा उन्हाळ्यातील एक उत्तम उपाय आहे. आपली त्वचा उन्हाने रखरखीत झालेली असते. किरकोळ आजार आणि त्वचेवर होणारा परिणाम यामुळे माणूस वैतागून जातो. तो वैताग चेहऱ्यावर उमटतो. प्रसन्नतेचा अनुभव घेण्यासाठी या दिवसात सब्जा खावा.

    सब्जाच्या बियांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’ मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सब्जा पचनासाठी फायदेशीर आहे. यातील थंड गुणधर्म पोटातील उष्णता कमी करतात.

    त्वचा कोरडी आणि निर्जीव झाली असेल, तर प्रभावित भागावर सब्जाच्या बिया लावू शकता. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. सब्जाच्या बिया खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. केसांना सुंदर ठेवण्यासही ते मदत करते. त्यात प्रथिने आणि लोह मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.

    सब्जाचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. अतिखाण्यावर नियंत्रण ठेवता येते. उन्हाळ्याच्या दिवसात अपचनचा त्रास होत असल्यास आवर्जून दिवसभरात सब्जाचे सेवन करावे. या दिवसात, कमी पाणी पिण्यामुळे लघवीची समस्या उद्भवते. अशावेळी सब्जाचे पाणी नियमित सेवन केल्याने चांगला आराम मिळतो.

  • गुलाबी टिंट आणि ब्लशचा वापर

    गुलाबी टिंट आणि ब्लशचा वापर

    गाल गुलाबी दिसण्यासाठी महिला गुलाबी टिंट आणि ब्लश वापरतात. ब्लशशिवाय मेकअप अपूर्ण दिसतो. ब्लशमुळे चेहऱ्याला चमकदारपणा येतो. काही वेळा चेहऱ्यावर लाली जास्त काळ टिकत नाही, याचे कारण ब्लशचा योग्य वापर न करणे असू शकते. लाली दीर्घकाळ टिकण्यासाठी काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतात. त्वचेला मसाज करणे महत्वाचे आहे. जेव्हा त्वचेची चांगली काळजी घ्याल, तेव्हाच ब्लश त्वचेत व्यवस्थित मिसळेल. मेकअप लागू करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करुन मसाज करणे आवश्यक आहे. मेकअप कोरड्या किंवा तेलकट त्वचेवर सहज चिकटत नाही. यासाठी प्राइमर लावायला विसरू नका.

    त्वचेच्या प्रकारासाठी योग्य फॉर्म्युला निवडा
    जर तुम्ही मेकअपमध्ये नवशिक्या असाल, तर सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे, की पावडर, क्रीम आणि डाग हे ब्लशचे तीन प्रकार आहेत. त्वचेच्या प्रकारानुसार तुम्हाला ते स्वतःसाठी निवडावे लागेल. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला स्किन स्टेन फॉर्म्युला निवडावा लागेल. क्रीम ब्लश सामान्य त्वचेसाठी योग्य असतात. यामुळे त्वचेला सुंदर तेज मिळते. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर पावडरचा फॉर्म्युला वापरुन पहा.

    ब्लश त्वचेवर योग्य प्रकारे लावणे म्हणजे ते त्वचेशी चांगले समरस होणे होय. कोणतेही सौंदर्यप्रसाधन तुमच्या चेहऱ्यावर तेव्हाच छान दिसेल, जेव्हा ते चेहऱ्यावर व्यवस्थित लावले जाईल. त्वचेवर मेकअप लावण्यापूर्वी, ब्लेंडर ओले करा. त्यातील सर्व पाणी पिळून घ्या. त्वचेवर दाबून वापरा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. जर तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखू शकत नसाल, तर ब्लश जास्त काळ स्थिर ठेवण्यासाठी प्रथम तुम्ही क्रीम लावू शकता. त्यानंतर चेहऱ्यावर पावडर ब्लश लावून ब्रशने चांगले मिसळा. तुम्ही टिंट आणि पावडर ब्लशदेखील लावू शकता. तुमचा मेकअप पूर्ण केल्यानंतर तो सेटिंग स्प्रेने पूर्ण करा.

  • मुलांच्या त्वचेची काळजी घ्या

    मुलांच्या त्वचेची काळजी घ्या

    उन्हाळ्यात मुलांचे अंग घामामुळे थबथबलेले असते. बाहेरील उष्णता आणि अंगावरचा ओलेपणा त्वचेवर परिणाम करतो. यामुळे मुलांना अंगावर खाज सुटणे, त्वचेवर पुरळ येणे, घामोळे येणे अशा तक्रारी सुरु होतात. त्यामुळे मुले चीडचीड करू लागतात. याकरिता मुलाला दिवसातून २ वेळा आंघोळ घालावी. त्यामुळे त्याचे शरीर थंड होईल. या दिवसात मुलांना सुती कपडे घालावेत. त्यामुळे अंगावरील पुरळाची समस्याही कमी होईल. मुलाच्या आंघोळीसाठी बेसन किंवा उटण्याचा वापर करावा.

    घरातील खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. मुलांना कोंडत वातावरणात ठेवू नये. खोली हवेशीर असली पाहिजे. या दिवसात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. उष्णतेमध्ये शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते. पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान सहज नियंत्रित राहते. त्यामुळे मुलांना पाणी पिण्यास द्यावे. दिवसभरात मुले आवश्यक तेवढे पाणी पितात की नाही याकडे लक्ष ठेवावे.

    या दिवसात मिळणारी फळे मुलांना खाण्यास द्यावीत. जास्त तिखट, अति तेलकट पदार्थ मुलांना देऊ नयेत. मुलांना नैसर्गिक पेये पिण्यास द्यावीत.

  • ओठांसाठी लिप बाम

    ओठांसाठी लिप बाम

    अनेकजणांचे ओठांच्या कोरडेपणामुळे ओठ फाटतात. कधी-कधी अशा ओठातून रक्तही येऊ लागते. हिवाळ्याच्या दिवसात तर लोक या समस्येने फारच त्रस्त असतात. कडक उन्हाळ्यातही ओठ कोरडे होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी फाटलेल्या ओठांवर लिप बाम लावला जातो, आणि ते योग्य आहे. पण लिप बाम फक्त बाहेर जातानाच लावणे योग्य नाही. तो आपल्या ओठांच्या स्थितीनुसार कधी आणि कितीवेळा लावायचा हे निश्चित करून लावायला हवा.

    फाटलेल्या ओठांवर तुम्ही लिप बाम लावू शकता. हा लावताना लक्षात ठेवा की ज्यांचा तुम्हाला त्रास होणार नाही, असे लिप बाम वापरायला हवेत. तुम्ही लिप मॉइश्चरायझर देखील वापरू शकता. फाटलेल्या ओठांना सुस्थितीत आणण्यासाठी दिवसातून अनेक वेळा आणि झोपण्यापूर्वी लीप बाम लावा. जर ओठ खूप कोरडे पडले असतील, आणि फाटलेले असतील तर लीप बामचा जाड थर लावा. सकाळी आंघोळीनंतर लगेच लिप बाम लावा, जेणेकरून ओठांवर ओलावा येईल. लीप बाम ओठांचे संरक्षण करतो.

    दिवसभर ओठ हायड्रेशनसाठी तयार करतो.रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा लावा.दिवसातून 4 ते 5 वेळा फाटलेल्या ओठांवर लिप बाम लावू शकता. खूप उष्ण, थंड किंवा वारा असेल तर तिथेही ओठ चांगले ठेवण्यासाठी अनेक वेळा लिप बाम लावावा लागेल.