‘भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था’ (एफटीआयआय) ही भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असलेली आणि केंद्र सरकारच्या सहाय्याने स्थापन केलेली एक चित्रपट संस्था आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरात ती आहे. ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. संस्थेची स्थापना पुण्यातील ‘प्रभात स्टुडिओ’ संकुलात झाली. ही पुण्यातील पूर्वीच्या ‘प्रभात फिल्म’ कंपनीच्या आवारात आहे. संस्थेची स्थापना सन 1960 मध्ये झाली.
संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगातील तंत्रज्ञ, अभिनेते आणि दिग्दर्शक यांचा समावेश आहे. चित्रपट पुरस्कार देखील प्रायोजित करते. संस्थेची स्थापना सन 1960 मध्ये होऊन सन 1961 मध्ये विविध अभ्यासक्रम सुरू झाले. ‘टेलिव्हिजन ट्रेनिंग विंग’ पूर्वी नवी दिल्लीत कार्यरत होती. 1974 मध्ये पुण्यात स्थलांतरित झाले. त्यानंतर, संस्थेला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे पूर्ण सहाय्य मिळाले. जुलै 2011 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी सांगितले की, या संस्थेला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून विकसित करण्यासाठी संसदेत विधेयक सादर केले जाईल. यामुळे संस्थेला विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आणि विशेषाधिकार मिळतील.
‘एफटीआयआय’ची टी नोंदणी सोसायटी कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. ‘गव्हर्निंग कौन्सिल’ची स्थापना सोसायटीच्या सदस्यांमधून निवडून केली जाते. ‘गव्हर्निंग कौन्सिल’ ही ‘एफटीआयआय’ची सर्वोच्च संस्था आहे. संस्थेचे सर्व प्रमुख धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ती जबाबदार आहे. एक संचालक संस्थेचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतो. त्याची धोरणे आणि कार्यक्रम राबवतो.
‘केंद्रीय लोकसेवा आयोग’ यालाच ‘संघ लोकसेवा आयोग’ असेही म्हणतात. या संस्थेची तरतूद भारतीय राज्यघटनेतील भाग १४, कलम ३१५-३२३ मध्ये दिलेली आहे. हा एक संवैधानिक आयोग आहे म्हणजेच, हा आयोग भारतीय संविधानातील तरतुदीनुसार स्थापन झाला आहे. ही देशातील एक निवड संस्था आहे. ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच संघसेवेच्या गट ‘अ’ व गट ‘ब’ कर्मचाऱ्यांच्या निवडी करते. हा आयोग ‘कर्मचारी, लोक तक्रारी आणि निर्वाहभत्ता मंत्रालयातील’ कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली येतो. संवैधानिक संस्था असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोग हा भारतीय न्यायव्यवस्था व निवडणूक आयोग याप्रमाणेच स्वायत्त आहे.
संघसेवेतील गट ‘अ’ व गट ‘ब’ तसेच अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांची नेमणूक, बदली, पदोन्नती व शिस्तीची कारवाई इ. करण्यासाठी भारत सरकार लोकसेवा आयोगाशी सल्लामसलत करते. हा आयोग थेट राष्ट्रपतींना अहवाल सादर करतो. हा आयोग राष्ट्रपतीमार्फत भारत सरकारला सल्ला देऊ शकतो; मात्र असे सल्ले बंधनकारक नसतात. ‘लोकसेवा आयोग’ या नावाने १ ऑक्टोबर १९२६ रोजी याची स्थापना करण्यात आली. नंतर भारत सरकार कायदा, १९३५ नुसार ‘ फेडरल संघराज्य लोकसेवा आयोग’ असे नामकरण करण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे ‘संघ लोकसेवा आयोग’ असे नामकरण करण्यात आले.
महाराष्ट्रातील पारंपरिक कलेची जोपासना करुन कलेचा विकास करण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक उपक्रम, योजना, कार्यक्रम राबविले जातात. राज्य स्तरावर या कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई कार्यरत आहे. या संचालनालयामार्फत कला व सांस्कृतिक क्षेत्रात विविध कार्यक्रम राबविले जातात. महाराष्ट्र राज्य निर्मितीवेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रंगमंचीय कलांचा विकास करण्याची जबाबदारी शासनाची आहे, या गोष्टीस मान्यता दिली. सन १९७० मध्ये मनोरंजन समितीचे सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये रुपांतर करण्यात आले.सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे शासकीय पातळीवर सांस्कृतिक कार्यासंबंधीच्या योजना, उपक्रम कार्यान्वित करण्यात येतात. राज्यातील संस्कृतीची लोकांना माहिती व्हावी, कलाप्रकारांचा विकास व प्रसार व्हावा, तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. संचालनालय राज्यातील वयोवृद्ध, अपंग, आर्थिक स्थैर्य नसलेल्या कलाकारांना आर्थिक मदत प्रदान करते. सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या संस्थांना सहाय्यक अनुदान देते.
कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल कला क्षेत्रातील व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. संगीत व गायन क्षेत्रातील प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्याबद्दल एका ज्येष्ठ कलाकारास ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार प्रदान केला जातो. मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता दिर्घकाळ आयुष्य वेचलेल्या, तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी गुणांनी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ कलाकारास ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला जातो. मराठी चित्रपटसृष्टीत विशेष योगदान देणाऱ्या एका कलाकारास ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्काराने गौरविण्यात येते. मराठी रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ नाट्य कलाकारास ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मराठी संगीत रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ नाट्य कलाकारास ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येते.
हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरीता दिर्घकाळ आयुष्य उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ कलाकारास ‘स्व. राज कपूर जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष योगदान देणाऱ्या एका कलाकारास ‘स्व. राज कपूर विशेष योगदान’ पुरस्काराने गौरविण्यात येते. तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारास ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येते. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या एका लेखकास अथवा मान्यवरास ‘ज्ञानोबा तुकाराम’ पुरस्काराने गौरविण्यात येते. शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका कलाकारास ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येते. संचालनालयामार्फत राज्याच्या कला-संस्कृतीचे प्रदर्शन करणारा चित्ररथ दरवर्षी राजपथ, नवी दिल्ली येथे पाठविण्यात येतो. राज्य नाट्य महोत्सव, राज्य चित्रपट महोत्सव, संगीत, नृत्य, तमाशा, कीर्तन, भजन, लोककला, शाहिरी आणि दशावतार महोत्सव इत्यादी महोत्सव आयोजित करण्यात येतात. याशिवाय संचालनालय नाट्य, तमाशा, कीर्तन व शाहिरी प्रशिक्षण शिबिरेही आयोजित करते.
भारतीय कृषी संशोधन परिषद ही कृषी आधारीत संशोधन संस्था आहे. शेतीविषयी संशोधन करणारी ही भारतातील प्रमुख संस्था आहे; तसेच जगातील मोठ्या कृषी संशोधन संस्थांपैकी एक आहे. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद ही भारत सरकारच्या कृषी मंत्रालय व कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग अंतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत शाश्वत शेतीसाठी संशोधन करुन तंत्रज्ञान विकास योजना, उपक्रम राबविले जातात.त्यात समन्वय राखून प्रोत्साहन दिले जाते. दर्जेदार मानव संसाधन विकास सक्षम करण्यासाठी कृषी शिक्षणाला मदत देणे आणि समन्वय साधणे हे काम या संस्थेचे आहे. कृषी-आधारित ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर, ज्ञान व्यवस्थापन, कृषी संशोधन, शिक्षण आणि विस्तारामध्ये धोरण, सहकार्य आणि सल्लामसलत करण्याचे काम केले जाते.
ही संस्था संपूर्ण देशात फलोत्पादन, मत्य्् पालन व प्राणीविज्ञान याचे शिक्षण देऊन त्यात समन्वय राखणारी, मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करणारी सर्वोच्च संस्था आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने आपल्या संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाद्वारे भारतात हरितक्रांती घडवून आणली. त्यानंतरही कृषी क्षेत्रात अनेक घडामोडी घडवून आणण्यात अग्रणी भूमिका बजावली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राष्ट्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण प्रणाली समाजाच्या कल्याणासाठी विज्ञानाच्या प्रगतीचा उपयोग करण्यासाठी कटिबद्ध आहेत. ही संस्था ‘पुसा इन्स्टिट्यूट’ या नावाने ओळखली जाते.
हेन्री फिल्स या अमेरिकेच्या गृहस्थांनी दिलेल्या देणगीतून ही संस्था प्रथम बिहारमधील पुसा येथे सन १९०५ मध्ये सुरू झाली. त्यानंतर सन १९३४ मध्ये भूकंपामुळे संस्थेच्या इमारतीचे फार नुकसान झाले. त्यानंतर ही संस्था सन १९३६ साली नवी दिल्ली येथे हलवण्यात आली. या संस्थेत संशोधन व प्रशिक्षणाची उत्तम सोय असून येथे भारतीय विद्यार्थ्याशिवाय आशिया, आफ्रिका, युरोप व अमेरिका या विविध प्रदेशांतील विद्यार्थी येतात. सन १९५८ साली या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा मिळाला. कृषिविज्ञानाच्या विविध शाखांतील एम्. एस्सी. व पीएच्. डी. स्तरावरील पदव्युत्तर शिक्षण येथे देण्यात येते. या संस्थेची देशात प्रादेशिक संशोधन केंद्रे आहेत. संस्थेने दिल्लीच्या जवळपासच्या भागात सन १९४९ पासून सधन शेती योजनेखाली शेतकऱ्यांच्या शेतात प्रात्यक्षिके व नवे प्रयोग केले आहेत. संस्थेतील संशोधनातून उपलब्ध होणाऱ्या उपयुक्त माहिती विविध शास्त्रीय नियतकालिकांतून तसेच इंग्रजी, हिंदी व इतर प्रादेशिक भाषांतून लेखांद्वारे आणि आकाशवाणी व दूरदर्शनवरील कार्यक्रमांद्वारे पोहोचवली जाते.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) ही भारत सरकारच्या मालकीची सर्वोच्च विकास बँक आहे. एकात्मिक ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी व कृषी आणि ग्रामीण विकासाला समर्थन देऊन प्रोत्साहन देण्यासाठी संसदेच्या कायद्यानुसार या बँकेची स्थापना 12 जुलै 1982 रोजी करण्यात आली. देशातील शेती आणि बिगरशेती क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या विकासामध्ये नाबार्ड महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नाबार्ड शाश्वत आणि न्याय्य कृषी आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी संसदेच्या कायद्यानुसार सन 1982 मध्ये स्थापन करण्यात आली. चार दशकांहून अधिक कालावधीच्या प्रवासात या प्रमुख विकास वित्तसंस्थेने कृषी-वित्त, पायाभूत सुविधांचा विकास, बँकिंग तंत्रज्ञान, लघुवित्त आणि ग्रामीण उद्योजकता याद्वारे भारतीय खेड्यांमध्ये जीवन बदलले आहे. नाबार्डकडून ग्रामीण भागात सहभागी आर्थिक आणि गैर-आर्थिक हस्तक्षेप, नवकल्पना, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विकासाद्वारे राष्ट्रउभारणीत मदत करणे सुरूच आहे. भारत सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी संस्थात्मक कर्जाचे महत्त्व ओळखल्यामुळे या समितीची स्थापना करण्यात आली. कृषी आणि ग्रामीण विकासासाठी संस्थात्मक कर्जाच्या व्यवस्थेचे पुनरावलोकन करण्यासाठी 30 मार्च, 1979 रोजी नियोजन आयोगाचे माजी सदस्य बी. शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अंतरिम अहवालाच्या शिफारशीवर आधारित नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) ची निर्मिती संसदेने केली. ग्रामीण विकासाशी निगडीत कर्जाशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या विकास वित्तीय संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या तत्कालीन कृषी पुनर्वित्त आणि विकास महामंडळाचे कार्य नाबार्डकडे हस्तांतरित करण्यात आले. दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी ते राष्ट्रसेवेला समर्पित केले होते. नाबार्ड ग्रामीण समृद्धी वाढवण्यासाठी शाश्वत आणि समतोल कृषी आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देते. नाबार्ड कर्जपुरवठ्याबरोबरच ग्रामीण वित्तीय संस्था, लघु वित्तीय संस्थांच्या अधिकाऱ्यांना कृषी आणि ग्रामीण विकासामध्ये क्षमता प्रदान करते.
नाबार्ड आर्थिक, विकासात्मक आणि पर्यवेक्षण विभागांतर्गत राबविलेल्या उपक्रमांद्वारे ग्रामीण भारताला आर्थिकदृष्ट्या सर्वसमावेशक बनवून सक्षम करीत आहे. नाबार्डचे सर्वसमावेशक उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक महत्त्वाच्या पैलूंचा समावेश करतात. पुनर्वित्त सहाय्य, जिल्हास्तरीय पतयोजना, नवीन विकास योजना, भारत सरकारच्या विकास योजनांची अंमलबजावणी, विपणन व्यासपीठ, कौशल्य विकास प्रशिक्षण, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका यांचे पर्यवेक्षण ही सर्व कार्ये नाबार्डमार्फत केली जातात. नाबार्डने भारताच्या एकूण ग्रामीण पायाभूत सुविधांपैकी एक पंचमांश वित्तपुरवठा यशस्वीरित्या केला आहे.
पुण्यातील ‘दि पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी’ आता पुणे नगर वाचन मंदिर म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही नावाजलेली संस्था आहे. समाजात साक्षरता निर्माण करण्यासाठी, लोकांचे प्रबोधन करण्यासाठी या ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. या ग्रंथालयाच्या स्थापनेत महादेव रानडे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, कृष्णशास्त्री चिपळूणकर, आदींनी बरेच परीश्रम घेतले. ७ फेब्रुवारी, १८४८ ला या वाचन मंदिराची स्थापना झाली.
या ग्रंथालयाची स्थापना म्हणजे ब्रिटीशांच्या काळात येथील जनतेला इंग्रजीचे शिक्षण देण्यासाठी जे प्रयत्न होत होते, तोच एक प्रयत्न होता. पाषाण, बिबवेवाडी, वारजे, कर्वे रोड, सिंहगड रोड, गणंजय सोसायटी, आयडियल सोसायटी इत्यादी ठिकाणी ग्रंथालयाच्या शाखा आहेत. पुणे नगर वाचन मंदिर ही संस्था दर वर्षी काही साहित्यिकांना श्री. ज. जोशी, श्री. ना. बनहट्टी आदींच्या नावाचे पुरस्कार देते.
या ग्रंथालयात सुमारे पन्नास हजार पुस्तके असून तीन हजारहून अधिक नोंदणीकृत सदस्य आहेत. पुणे नगर वाचन मंदिरातील ग्रंथांनी अनेक विद्वानांची वाचनाची भूक भागविली आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासात या पुणे नगर वाचन मंदिराचे उल्लेखनीय योगदान आहे.
महाराष्ट्रात दि. २१ फेब्रुवारी २००८ रोजी स्वतंत्र अल्पसंख्याक विकास विभागाची निर्मिती करण्यात आली. अल्पसंख्याक लोकसमुहाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाने न्या.सच्चर समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने हा विभाग स्थापन झाला.
अल्पसंख्याक लोकसमुहांच्या सर्वसमावेशक उत्कर्षासाठी तसेच अल्पसंख्याकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी या विभागाची स्थापना झाली. हा विभाग अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमाचे समन्वयन करुन आढावा घेतो.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे शासकीय स्तरावरील संनियंत्रण आणि समन्वयन करतो. महाराष्ट्र राज्य हज समितीचे शासकीय स्तरावरील संनियंत्रण आणि समन्वयन करतो. राज्यातील अल्पसंख्याकांकडून चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रे देणे, वक्फ व त्या अनुषंगीक बाबींची शासकीय स्तरावरील अंमलबजावणी,संनियंत्रण व समन्वयन करतो. महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी न्यायमुर्ती सच्चर समितीच्या स्वीकृत शिफारशीसंबंधातील बाबींची अंमलबजावणी, संनियंत्रण व समन्वयन करतो. राज्य शासनाने अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी जाहीर केलेल्या सर्व योजनांचे समन्वयन करुन आढावा घेतो.