मोहिनी – शालिनीच्या लग्नात प्रतापरावांची एन्ट्री

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ सध्या अतिशय रोमांचक आणि भावनिक वळणावर आली आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. शालिनी आणि महेंद्र यांचा विवाहसोहळा तोंडावर आला असतानाच, या आनंदाच्या वातावरणाला अचानक संकटाचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. सध्या मोहिनीच्या घरात शालिनी आणि महेंद्र यांच्या लग्नाची लगबग सुरू आहे. वेडिंग प्लॅनर आणि डेकोरेशन टीमच्या मदतीने प्रत्येक गोष्टीचे नेटके नियोजन केले जात आहे. मात्र, या आनंदाच्या वातावरणात मिठाचा खडा टाकण्यासाठी ‘आरके’ आणि ‘बंटी’ सज्ज झाले आहेत. आरकेने मोहिनीच्या कुटुंबावर दबाव आणण्यासाठी आपल्या श्रीमंतीचा वापर करून तिला एक महागडे मंगळसूत्र खरेदी करण्यास भाग पाडले होते. स्वाभिमानी शालिनी हेच मंगळसूत्र आरकेला परत करण्यासाठी त्याच्या घरी जाणार आहे, ज्यामुळे कथानकात मोठी खळबळ उडणार आहे.

दुसरीकडे, पारूबाईने घरात आणलेला ज्योतिषी एक धक्कादायक भविष्यवाणी करतो. “हे लग्न झाल्यास मोठा अनर्थ होईल,” असा इशारा तो देतो. या भविष्यवाणीमुळे घरात भीतीचे वातावरण पसरते, परंतु मोहिनी मात्र कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या मुहूर्तावरच लग्न लावून देण्याच्या निर्णयावर ठाम आहे. लग्नाची मेहंदी हातावर रडत असतानाच शालिनीच्या मनात तिच्या भूतकाळातील काही वेदनादायक आठवणी पुन्हा ताज्या होतात. यापूर्वी मोहिनीने शालिनीच्या जुन्या बंधनांचे प्रतीक असलेले मंगळसूत्र तोडून तिला नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचे धैर्य दिले होते.

या संपूर्ण कथानकात सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा कार्तिकीकडून नकळत ‘प्रतापरावांशी’ संपर्क साधला जातो. प्रतापराव हे नाव ऐकताच शालिनी अस्वस्थ होते. त्यातच आता प्रतापराव मुंबईच्या देशाने रवाना झाले आहेत. प्रतापरावांच्या अचानक होणाऱ्या एन्ट्रीमुळे शालिनीच्या भूतकाळातील कोणते गुपित सर्वांसमोर येणार, या भीतीने कुटुंबात कमालीची शांतता पसरली आहे.

कथानकात केवळ प्रतापरावच नाही, तर मुकुंद देखील मोहिनीला लग्नाची मागणी घालण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शालिनी-महेंद्र यांच्या लग्नसोहळ्यात एकाच वेळी अनेक वादळे घोंघावताना दिसणार आहेत. आरकेचे कारस्थान, ज्योतिषाची भविष्यवाणी आणि प्रतापरावांचे आगमन या सर्व संकटांवर मात करून शालिनी आणि महेंद्र यांचे लग्न यशस्वीरित्या पार पडणार का? मोहिनी शालिनीला न्याय मिळवून देण्याची आपली प्रतिज्ञा कशी पूर्ण करणार? हे पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे. आगामी भागात भावनिक संघर्ष आणि अनपेक्षित खुलाशांची मोठी मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
25,562 वेळा पाहिलं