तारिणी – नवी एन्ट्री नवा ट्विस्ट

झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ ही मालिका सध्या आपल्या वेगवान कथानकामुळे आणि गुन्हेगारी जगताचा वेध घेणाऱ्या शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘स्पेशल क्राईम युनिट’मधील आव्हाने आणि गुंतागुंतीचे गुन्हे सोडवण्याचे तंत्र प्रेक्षकांसाठी रंजक ठरत असतानाच, आता ही मालिका एका अत्यंत रंजक वळणावर पोहोचली आहे. मुख्य पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यात एका नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे मोठी खळबळ उडणार असल्याचे संकेत मिळत असून, या मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या नवीन वळणानुसार, टीममध्ये ऑफिसर हरप्रीत चड्ढाची धमाकेदार एन्ट्री होणार आहे.

मालिकेच्या नव्या कथानकानुसार, तारिणी स्वतः तिच्या टीमला या नवीन सदस्याची ओळख करून देताना दिसते. हरप्रीत चड्ढा हा एक शिस्तबद्ध, वक्तशिष्ट, कर्तृत्ववान आणि धडाकेबाज ऑफिसर असल्याचे वर्णन तारिणी अतिशय उत्साहाने करताना दिसते. विशेष म्हणजे, नेहमी कडक आणि व्यावसायिक राहणाऱ्या तारिणीचा चेहरा हरप्रीतबद्दल बोलताना ज्या पद्धतीने खुलला आहे, ते पाहून तिच्या टीममधील इतर सदस्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. एरवी गुन्ह्यांच्या तपासात मग्न असणाऱ्या या युनिटमध्ये आता वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. “बॉसचा चेहरा आज वेगळाच खुलला आहे”, “बॉस हरप्रीतला कोणत्या नजरेने बघतील काय माहीत?” अशा प्रकारची कुजबुज टीममध्ये सुरू झाल्यामुळे केदारच्या मनात मात्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

केदारचे तारिणीवर मनापासून प्रेम आहे, मात्र ते अद्याप अव्यक्तच राहिले आहे. सध्या हे दोघेही एका गुप्त मिशनसाठी खांडेकर कुटुंबात पती-पत्नी म्हणून राहत असले, तरी त्यांच्यातील नाते केवळ कर्तव्यावर आधारित आहे असे तारिणीला वाटते. मात्र, केदारसाठी हे केवळ नाटक नसून त्याच्या भावना खऱ्या आहेत. आता हरप्रीत चड्ढाच्या रूपात एका सक्षम, देखण्या आणि तितक्याच हुशार ऑफिसरची एन्ट्री झाल्यामुळे केदारला स्पष्टपणे ईर्षा जाणवू लागली आहे. हरप्रीतची कामाची पद्धत आणि त्याचे व्यक्तिमत्व तारिणीला प्रभावित करत असल्याचे पाहून केदारला आपली जागा डळमळीत झाल्यासारखे वाटत आहे.

हरप्रीतच्या येण्याने केदार आणि तारिणीच्या नात्यात अंतर पडणार की या स्पर्धेतून केदार अखेर आपली प्रेमाची कबुली देणार, हे पाहणे आता प्रेक्षकांसाठी कमालीचे ठरेल. हरप्रीत चड्ढा ही भूमिका नेमका कोणता अभिनेता साकारणार आणि या नवीन त्रिकोणामुळे मालिकेत पुढे काय नाट्य घडणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. एकीकडे गुन्हेगारी जगाचा तपास आणि दुसरीकडे भावनांचा हा गुंता, अशा दुहेरी पेचात अडकलेली ‘तारिणी’ आता कोणती भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मालिकेचे पुढील भाग नक्कीच प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे असतील यात शंका नाही.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
23,180 वेळा पाहिलं