
मराठी डिजिटल विश्वात सध्या नवनवीन विषयांवर वेब सीरिज येत आहेत, मात्र शालेय जीवनावर आधारित कथा प्रेक्षकांना नेहमीच आपल्या बालपणात घेऊन जातात. ‘आठवी अ’ ही ‘इट्स मज्जा ओरिजिनल्स’ प्रस्तुत वेब सीरिज सध्या तरुण पिढीसह मोठ्यांच्याही पसंतीस उतरत आहे. यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या या सीरिजने आपल्या साध्या, सुंदर आणि वास्तववादी मांडणीमुळे अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. ही सीरिज केवळ मनोरंजन करत नाही, तर शाळेतील ते निष्पाप दिवस पुन्हा जिवंत करते.
कथेची सुरुवात शाळेतील नवीन शैक्षणिक वर्षापासून होते. ‘आठवी अ’ या वर्गातील विद्यार्थ्यांचे भावविश्व, त्यांच्यातील मैत्री, छोटी-छोटी भांडणे आणि शिक्षकांसोबतचे त्यांचे नाते यावर ही सीरिज प्रकाश टाकते. सीरिजच्या पहिल्या भागात दाखवल्याप्रमाणे, शाळेच्या नवीन इमारतीची चर्चा आणि त्यानंतर शिक्षक महेश कांबळे जेव्हा नवीन तुकडीत शिकवायला जातात, तेव्हापासून खऱ्या अर्थाने कथेला वेग येतो. एका विद्यार्थ्याला त्याच्या तुकडीवरून होणाऱ्या त्रासाबद्दल समजल्यावर शिक्षक त्याला ज्या प्रकारे आत्मविश्वास देतात ते पाहून शिक्षकी पेशातील संवेदनशीलता मनाला भिडते.
सीरिजचा तिसरा भाग अत्यंत रंजक आहे, जिथे ‘आठवी ड’ ची मुले अखेर ‘आठवी अ’ मध्ये येतात. येथूनच कथेमध्ये खरे वळण येते. ‘आभ्या’ आणि ‘केवडा’ या पात्रांमधील पहिली नजरभेट आणि त्यांच्यातील सुप्त आकर्षण प्रेक्षकांना आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देते. त्यांचे हे एकमेकांकडे पाहणे सीरिजमध्ये पुढे काय नवीन ट्विस्ट आणणार याची उत्सुकता प्रत्येक भागात वाढत जाते. तसेच चौथ्या भागात ‘मध्या’ नावाचे पात्र आपल्या आत्याच्या मुलीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करताना दिसते, ज्यातून निखळ विनोद आणि ग्रामीण धाटणीचे मनोरंजन पाहायला मिळते.
या सीरिजचे यश तिच्या नैसर्गिक अभिनयात दडलेले आहे. बालकलाकारांनी साकारलेल्या भूमिका इतक्या जिवंत वाटतात की आपण एखाद्या खऱ्या वर्गात बसलो आहोत असा भास होतो. ग्रामीण आणि निमशहरी भागातील शाळेचे वातावरण, तिथले वर्ग, फळा आणि विद्यार्थ्यांची धिंगामस्ती दिग्दर्शकाने अतिशय बारकाईने टिपली आहे.
सवादांमध्ये अस्सल मराठी ठसका असून, त्यात कोठेही कृत्रिमता जाणवत नाही. प्रत्येक भाग साधारणतः १० ते १५ मिनिटांचा असल्याने प्रेक्षकांना तो पाहताना कोठेही कंटाळा येत नाही.’आठवी अ’ ही वेब सीरिज आजच्या धावपळीच्या युगात थोडा वेळ थांबून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी देते. शाळेतील ‘पहिले प्रेम’, शिक्षकांचा धाक आणि मित्रांसाठी काहीही करण्याची तयारी हे सर्व पैलू यात खुबीने गुंफले आहेत.
थोडक्यात सांगायचे तर ‘आठवी अ’ ही वेब सीरिज म्हणजे मैत्री, प्रेम आणि संस्कारांचा एक गोड मिलाफ आहे. येणाऱ्या भागांमध्ये आभ्या आणि केवडाच्या नात्याचे काय होणार आणि ही मुले कोणती नवीन धमाल करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी नवीन भागाची वाट पाहणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग या सीरिजने तयार केला आहे.