
भारतीय चित्रपटसृष्टीतील अभ्यासू दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनयाचा पॉवरहाऊस अभिनेता विजय वर्मा यांची बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘मटका किंग’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. १९६० च्या दशकातील मुंबई, सट्टेबाजीचे अथांग जग आणि एका सामान्य माणसाचा ‘मटका किंग’ होण्यापर्यंतचा थरारक प्रवास या मालिकेत अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. ही वेब सीरिज १७ एप्रिल २०२६ रोजी ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’ या प्लॅटफॉर्मवर जगभरात प्रदर्शित होणार असून नागराज मंजुळे यांची मांडणी आणि विजय वर्माचा अभिनय यांचा हा संगम प्रेक्षकांसाठी एक मोठी मेजवानी ठरणार आहे.
या वेब सीरिजची कथा प्रामुख्याने १९६० च्या दशकातील मुंबईच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. विजय वर्मा यामध्ये ‘ब्रृज भाटी’ नावाची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. कथेनुसार, ब्रृज भाटी हा एक सामान्य कापूस गिरणी कामगार असतो परंतु त्याची महत्त्वाकांक्षा त्याला मुंबईच्या सर्वात मोठ्या सट्टेबाजीच्या साम्राज्याचा सर्वेसर्वा बनवते. ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार हा प्रवास केवळ पैशांचा नसून तो प्रतिष्ठा, सत्ता आणि गुन्हेगारी जगाशी असलेल्या संघर्षाचा आहे. ही कथा जुगार जगतातील एकेकाळचे प्रसिद्ध नाव ‘रतन खत्री’ यांच्या जीवनाशी साधर्म्य दर्शवणारी असली तरी निर्मात्यांनी ही एक काल्पनिक कथा असल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रेलरमधील विजय वर्माचा स्वॅग आणि त्याचे संवाद प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहेत.
नागराज मंजुळे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले असून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तववादी शैलीची झलक ट्रेलरमध्ये पावलोपावली दिसते. विजय वर्मासोबतच या सीरिजमध्ये सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम आणि कृतिका कामरा यांसारख्या तगड्या कलाकारांची फौज आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे प्रसिद्ध ‘बॅड मॅन’ गुलशन ग्रोव्हर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
तांत्रिक बाजूचा विचार केल्यास, सिद्धार्थ रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली अभय कोरणे यांनी या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. गुन्हेगारी, महत्त्वाकांक्षा, राजकीय वरदहस्त आणि नातेसंबंधांचे एक वेगळे पदर या मालिकेत उलगडणार आहेत.
ज्या प्रेक्षकांना क्राईम ड्रामा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कथा पाहायला आवडतात, त्यांच्यासाठी ‘मटका किंग’ ही या वर्षातील सर्वात मोठी ब्लॉकबस्टर सीरिज ठरण्याची शक्यता आहे. ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर ती प्रेक्षकांच्या पसंतीस कितपत उतरते आणि विजय वर्माचा ‘ब्रृज भाटी’ प्रेक्षकांच्या मनात घर करतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही प्रेक्षकांसाठी ही कलाकृती आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.