आरोग्यासाठी प्रोटीन – तूरडाळ

डाळ ही अत्यंत पौष्टिक असून, याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त डाळीचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. डाळीचे अनेक प्रकार आहेत; पण विशेष म्हणजे तूरडाळ शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे; पण जर हीच डाळ एक महिन्यासाठी आहारातून काढून टाकली, तर काय होईल?  तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, “आपल्या चांगल्या निरोगी आरोग्यासाठी प्रोटीन्सची अत्यंत आवश्यकता असते; पण आहारात एक महिना डाळ नसेल, तर प्रोटीन्स मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागू शकतो. विशेषत: शाकाहारी लोकांसाठी हे खूप मोठे आव्हान ठरू शकते.”

डाळीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. डाळीचे महिनाभर सेवन केले नाही, तर त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि प्रतिकारशक्तीवर होऊ शकतो.

तज्ज्ञ सांगतात, “डाळीचे सेवन न केल्याने त्याचा परिणाम थेट तुमच्या आहार, जीवनशैली व आरोग्यावर होऊ शकतो. शाकाहारी लोक टोफू, सुका मेवा, बिया व शेंगा यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ पर्याय म्हणून खाऊ शकतात.” ते पुढे सांगतात, “आहारात कोणतेही बदल करताना त्याबाबत जवळच्या डॉक्टरांशी चर्चा करणे गरजेचे आहे.” दररोज १/२ ते ३/४ कप शिजविलेल्या डाळीचे आहारात सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

डाळ ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जर तुम्ही एक महिन्यासाठी डाळीचे सेवन कमी करण्याचा निर्णय घेत असाल, तर त्याऐवजी प्रोटीन्स आणि फायबर स्रोतांचा आहारात समावेश करण्याचा विचार करा. संतुलित आहार आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचा आहे.






24,897 वेळा पाहिलं