विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे आकर्षण


अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच या पदार्थांच्या विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी ठाणे शहरात नुकत्याच झालेल्या एका चर्चासत्रात शहरातील शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिकवणी वर्गांचे संचालक आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भयानक सत्य मांडले. विद्यार्थ्यांच्या दफ्तरांमध्ये गुटखा पाकिटे, पानटपरीवर मिळणारी नशेची गोळी, ई-सिगारेट आढळत असल्याचे त्यांनी उपस्थित पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील व अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

विद्यार्थी पानटपरीवर मिळणारी नशेची गोळी सेवन करून शाळेत जातात. शाळेतही ही मुले नशेत असतात. काही मुले वर्गात नशेच्या गोळ्या आणून त्या अन्य मुलांना देत असल्याचे सांगितले. शाळकरी मुले अमली पदार्थांकडे आकर्षित होत आहेत. शाळेपासून काही अंतरावर असलेल्या पानटपऱ्यांमधून ई-सिगारेटची विक्री होते. शाळकरी मुलांकडे ई-सिगारेटदेखील आढळल्या आहेत. त्यामुळे पानटपऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षकांनी केली. याशिवाय, शाळांमध्ये ये-जा करणाऱ्या मुलींची छेड काढली जात असल्याची गंभीर बाबही शिक्षकांनी मांडली. शाळकरी मुलांचे हे व्यसनाधीन होणे चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेच्या आसपास असलेल्या पान टपऱ्यांमधून ई-सिगारेट, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह ड्रग्जची विक्री होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तस्कर मुलांना ड्रग्ज पुरवत आहेत. हुशार मुलेसुद्धा अजाणतेपणाने ड्रग्जकडे वळू लागली असल्याने या चर्चासत्रात केवळ चिंतेचा सूर उमटलेला दिसून आला. प्रत्येक पोलीस ठाण्यात शाळा आणि पोलीस ठाणे यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी एका महिला पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. असे कोणतेही प्रकार शाळेत आढळल्यास या अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. आम्हाला माहिती मिळताच नक्की कारवाई करू, अशी हमी देऊन नशेचा विळखा दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.