सखे गं साजणी – लाखो मनं जिंकली अभिजीत सावंतच्या सुरांनी

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या एका नव्या संगीतमय प्रवासाची चर्चा रंगली आहे. ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाचे शीर्षक गीत काल ११ मार्च २०२६ रोजी अधिकृतपणे रिलीज झाले. प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या १ दिवसात या गाण्याने १ लाख ९४ हजारांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केला असून, सोशल मीडियावर या गाण्याची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

या गाण्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता तर वाढवलीच आहे, पण त्याचसोबत अभिजीत सावंतच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरली आहे. या शीर्षक गीताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गायक अभिजीत सावंत यांचा आवाज. आपल्या सुश्राव्य आणि मखमली आवाजाने संपूर्ण देशाला भुरळ घालणाऱ्या अभिजीतने या गाण्यातून पुन्हा एकदा आपली जादू दाखवून दिली आहे. हे गाणे केवळ एक संगीत रचना नसून, ती मैत्री आणि प्रेमाच्या नाजूक धाग्यांची एक अनुभूती आहे. लखन चौधरी यांनी लिहिलेले शब्द आणि विजय भाते यांनी दिलेले संगीत यांचा मेळ इतका सुरेख जमला आहे की, हे गाणे ऐकताना प्रेक्षकांना एक वेगळाच ताजेपणा जाणवतो.

गाण्याच्या चित्रिकरणाबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील तीन प्रसिद्ध आणि लाखो चाहते असणाऱ्या कलाकारांपैकी हे तीन कलाकार म्हणजे प्रार्थना बेहरे, पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांच अनोखं त्रिकुट पाहायला मिळत आहे. या तिघांमधील मैत्रीची केमिस्ट्री पडद्यावर अतिशय देखणी आणि नैसर्गिक वाटत आहे. प्रार्थना आणि पूजा यांच्या सौंदर्यासोबतच अभिजीत खांडकेकरचा पडद्यावरील वावर गाण्याला एक वेगळीच उंची मिळवून देतो. या गाण्यात केवळ मेलडी नाही, तर रोहन तुपे यांनी लिहिलेले आणि सादर केलेले ‘रॅप’ देखील आहे, जे आजच्या तरुणाईला आकर्षित करणारे ठरत आहे. संगीताचे संयोजनही रोहन तुपे यांनीच केले असून, त्यांनी गाण्याला एक आधुनिक साज चढवला आहे.

तांत्रिक बाजूचा विचार केला तर या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक जवळकर यांनी या गाण्याचे छायांकन आणि संपादनही कौशल्याने केले आहे. गाण्यात वापरलेली सनई आणि क्लॅरिनेटची जोड, जी दुर्गेश भोसले यांनी वाजवली आहे, ती गाण्याला एक पारंपारिक आणि आधुनिक असा सुंदर टच देते. श्वेता ठाकूर, वैभवी पंचगणे, मानसी जगताप आणि ऋषभ साठे यांच्या बॅकिंग व्होकल्समुळे गाण्याचा गोडवा अधिकच वाढला आहे. ध्वनी मुद्रणाचे काम ‘एलोप’ आणि ‘एएमव्ही’ स्टुडिओमध्ये करण्यात आले असून, रोहन तुपे यांनी गाण्याचे मिक्सिंग आणि मास्टरिंग अतिशय दर्जेदार पद्धतीने केले आहे.

‘रेड बल्ब’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अभिषेक जवळकर यांनी केली असून, सह-निर्माते म्हणून अभिषेक दिलीप वाकचौरे आणि जतीन उपाध्याय यांनी धुरा सांभाळली आहे. तसेच आदित्य घरत, अभिजीत खांडकेकर आणि श्रेयस सावंत यांनीही या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. ३ एप्रिलला चित्रपटगृहात येण्यापूर्वीच या शीर्षक गीताने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मैत्रीच्या जादुई प्रवासाची झलक दाखवणारे हे गाणे सध्या युट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंगमध्ये आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
15,333 वेळा पाहिलं