
डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे सध्या मराठी वेब विश्वात नवनवीन प्रयोग होत आहेत. या शर्यतीत ‘इट्सच’ या यूट्यूब वाहिनीवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘लव्ह रेसिपी’ ही वेब सीरिज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेली ही मालिका विशेषतः तरुण पिढीला आपल्यातीलच एक वाटत आहे. आजच्या काळातील नातेसंबंध आणि त्यातील गुंतागुं त्यासोबत येणारा निखळ विनोद याचे एक उत्तम मिश्रण म्हणजे ही वेब सीरिज आहे असे म्हणता येईल.
या मालिकेचा सर्वात रंजक पैलू म्हणजे यातील नायकाची शाकाहारी जेवणाची वृत्ती आणि नायिकेचे मांसाहारावर असलेले प्रेम. शाकाहारी विरुद्ध मांसाहारी म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज असा हा अनोखा सामना प्रेमाच्या रंगात रंगलेला दिसतो. दोन विरुद्ध स्वभावाचे आणि आवडीनिवडींचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या आयुष्यात जो वैचारिक गोंधळ उडतो, त्याचे चित्रण अत्यंत खुसखुशीत संवादांनी केले आहे. सुमित चव्हाण याने आपल्या सहज सुंदर अभिनयाने तरुणाईचे प्रतिनिधित्व केले असून त्याच्यातील संवाद आणि चेहऱ्यावरील हावभाव प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.
तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केला तर ही मालिका अत्यंत उच्च दर्जाची वाटते. यातील रोमँटिक शीर्षकगीत सध्या इन्स्टाग्राम रीलवर प्रचंड गाजत असून ते गाणे ऐकताना प्रेक्षक कथेमध्ये अधिक गुंतून जातात. कथेचा वेग कुठेही रेंगाळत नाही आणि प्रत्येक भागाचा शेवट प्रेक्षकांना पुढच्या भागाची उत्सुकता लावून जातो. ‘लव्ह रेसिपी’ यशस्वी होण्याचे मुख्य कारण म्हणजे यातील जिवंतपणा. महाविद्यालयीन मित्रमैत्रिणी असोत किंवा कार्यालयीन सहकाऱ्यांसोबतची चर्चा हे सर्व विषय आजच्या तरुणांना आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडणारे आणि आगदी जवळचे वाटतात.
तीन आठवड्यांपूर्वी या वेब सीरिजचा शेवटचा म्हणजेच पाचवा भाग प्रदर्शित झाला असला तरी या महिन्यातही त्याची जादू कायम आहे. सीरिज पूर्ण होऊनही तरुणाईकडून मिळणारा उदंड प्रतिसाद अजूनही कमी झालेला नाही. सुमित चव्हाण आणि इतर कलाकारांची जुगलबंदी ही या मालिकेची खरी ताकद असून अत्यंत मोजक्या वेळात प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
एकमेकांच्या सवयींचा आदर करत नाते कसे फुलवावे आणि नाते कसे जपावे हे या कथेतून अतिशय उत्तम रीतीने उलगडत जाते. कथेची मांडणी आणि तरुणांच्या मनाचा ठाव घेणारा आशय असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरली आहे.