
भारतीय डिजिटल विश्वात ऐतिहासिक घटना आणि गुप्तहेर कथा या विषयांवर अनेक कलाकृती आल्या आहेत. मात्र ‘सोनी लिव’ आता एक अत्यंत आगळीवेगळी आणि संगीतमय ऐतिहासिक वेब सीरिज घेऊन येत आहे, जिचे नाव आहे ‘जैझ सिटी’. ही मालिका केवळ मनोरंजनाचा भाग नसून, १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडलेली एक थरारक कथा आहे. १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणारी ही १० भागांची मालिका त्या काळातील गुंतागुंतीचे राजकारण, हेरगिरी आणि मानवी संघर्षावर आधारित आहे. ऐतिहासिक घटनांना संगीताच्या चौकटीत बसवून मांडण्याचा हा एक अनोखा प्रयत्न या सीरिजच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
या मालिकेची कथा १९७० च्या दशकातील कलकत्ता शहरात घडते. त्या काळी शहरातील प्रसिद्ध ‘पार्क स्ट्रीट’वरील जैझ क्लब हे केवळ संगीताचे अड्डे नव्हते तर ते गुप्तहेर क्रांतिकारी आणि अनेक राजकीय हालचालींचे मुख्य केंद्र बनले होते. मालिकेचा मुख्य नायक ‘जिमी’ हा मुळात संगीत विश्वात रमलेला असतो. मात्र काळाच्या ओघात तो जासूसीच्या आणि राजकारणाच्या धोकादायक वळणावर येऊन पोहोचतो. एका भाषेच्या अस्मितेतून एका नवीन राष्ट्राची निर्मिती कशी झाली आणि त्यामागे पडद्याआड किती मोठी राजकीय खेळी होती, याचा अतिशय रोमहर्षक प्रवास या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
अभिनयाच्या बाबतीत ‘जैझ सिटी’ अत्यंत समृद्ध आहे. लोकप्रिय बांगलादेशी अभिनेता अरिफिन शुवो याने ‘जिमी’ची मध्यवर्ती भूमिका अत्यंत ताकदीने साकारली असून त्याला सौरासेनी मैत्रा आणि इतर दिग्गज कलाकारांची मोलाची साथ लाभली आहे. ‘ज्युबली’ सारख्या गाजलेल्या कलाकृतीचे दिग्दर्शक सौमिक सेन यांनी या मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन केल्यामुळे, यातील ऐतिहासिक संदर्भ आणि ७० च्या दशकातील वातावरण अतिशय जिवंत वाटते. विशेष म्हणजे ही मालिका हिंदी, बंगाली आणि इंग्रजी अशा तीन महत्त्वाच्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याने तिला जागतिक स्तरावरही पसंती मिळण्याची शक्यता आहे.
तांत्रिकदृष्ट्या या सीरिजचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील संगीत. एका ‘म्युझिकल थ्रिलर’मध्ये आवश्यक असलेले सर्व घटक यात गुंफलेले आहेत. २५ हून अधिक मूळ गाणी, ज्यात जैझ संगीतासह रवींद्र संगीत आणि क्रांतीगीतांचा समावेश आहे. प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. १९७० च्या दशकातील कलकत्त्याचे दर्शन घडवण्यासाठी सिनेमॅटोग्राफीवरही विशेष मेहनत घेण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांना कलाटणी देणाऱ्या ऐतिहासिक घटनांचा हा संगीतमय प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच एक विलोभनीय अनुभव ठरू शकतो.