इन्व्हिन्सिबल सीझन ४ – एक जीवघेणा संघर्ष

ॲनिमेटेड सुपरहिरो मालिकांच्या जगात आपला एक वेगळा आणि स्वतंत्र ठसा उमटवणारी अत्यंत लोकप्रिय मालिका ‘इन्व्हिन्सिबल’ आपल्या चौथ्या सीझनसह प्राइम व्हिडिओवर दिमाखात परतली आहे. १८ मार्च २०२६ रोजी या सीझनचे पहिले तीन भाग प्रदर्शित झाले असून उर्वरित भाग प्रेक्षकांना दर आठवड्याला पाहायला मिळणार आहेत. समीक्षकांच्या मते, हा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी, भावनिक आणि तितकाच रक्तरंजित सीझन ठरणार आहे. विशेषतः ‘विल्ट्रमाईट’ साम्राज्याविरुद्ध पुकारलेले महायुद्ध आणि पात्रांमधील अंतर्गत संघर्ष यावर यात प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

या सीझनचे मुख्य कथानक आता केवळ पृथ्वीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण अंतराळात पसरलेल्या महायुद्धाकडे वळले आहे. विल्ट्रमाईट साम्राज्य, ग्रहांची प्रबळ युती आणि ‘थ्रॅग’ या अत्यंत शक्तिशाली व क्रूर खलनायकाचा उदय ही या भागाची प्रमुख आकर्षणे ठरली आहेत. कथेचा नायक मार्क आता एका मोठ्या नैतिक पेचात अडकला आहे. नायक म्हणून आपली भूमिका बजावताना आपण नकळतपणे आपल्या वडिलांच्या म्हणजेच ओम्नी-मॅनच्या हिंसक मार्गावर तर जात नाही ना या विचाराने तो अस्वस्थ आहे. दुसरीकडे ॲटम ईव्हला तिच्या शक्तींच्या बाबतीत मोठ्या वैयक्तिक आव्हानांचा सामना करावा लागत असून मार्क आणि ईव्हच्या नात्यातील बदल प्रेक्षकांसाठी अत्यंत भावनिक ठरत आहेत.

या सीझनची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यातील थरार आणि कच्चा हिंसाचार. हा भाग मालिकेतील आतापर्यंतचा सर्वात गडद आणि भीषण भाग असल्याचे म्हटले जात आहे. ज्या प्रेक्षकांना ‘इन्व्हिन्सिबल’मधील नैसर्गिक आणि धक्कादायक हिंसाचार आवडतो, त्यांच्यासाठी हा सीझन एक मेजवानीच आहे. यासोबतच ओम्नी-मॅन म्हणजेच नोलन याच्या प्रायश्चित्ताचा प्रवासही यात अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. आपल्या जुन्या चुकांची क्षमा मागताना तो आता ‘ॲलन द एलियन’सोबत मिळून काम करताना दिसत आहे. ज्यामुळे कथेला एक नवीन वळण मिळाले आहे.

डेबी, ॲटम ईव्ह आणि डॅमियन डार्कब्लड यांसारख्या इतर महत्त्वाच्या पात्रांचा विकासही यात लक्षवेधक पद्धतीने करण्यात आला आहे. जरी काही ठिकाणी कथानकाचा वेग प्रचंड जास्त वाटत असला किंवा ॲनिमेशनमध्ये काही तांत्रिक उणिवा जाणवत असल्या तरी एकंदरीत हा सीझन गेल्या तीन भागांच्या तुलनेत अधिक सरस आणि परिपक्व ठरला आहे. विल्ट्रमाईट युद्धाचा काळ अत्यंत उत्कृष्टपणे पडद्यावर उतरवण्यात आल्याने ही मालिका पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
8,133 वेळा पाहिलं