ॲड्रेनलिन संप्रेरक – निसर्गदत्त अमोघ शस्त्र
आपल्या शरीराच्या आत एक अत्यंत जागृत, धाडसी आणि चपळ रक्षक दडलेला असतो, ज्याचे नाव आहे—’ॲड्रेनालिन’. रोजचे आयुष्य जेव्हा संथ आणि साध्या गतीने चाललेले असते, तेव्हा हा रक्षक अगदी शांत बसून असतो. मात्र, अचानक समोर एखादा मोठा धोका आला, पाठीमागे एखादा हिंस्त्र प्राणी लागला, किंवा एखाद्या उंच पाळण्यात बसल्यावर पोटात भीतीचा मोठा गोळा आला, की हा रक्षक एका सेकंदात जागा होतो. अधिवृक्क ग्रंथीच्या बंदिस्त दारातून बाहेर पडून तो थेट रक्ताच्या प्रवाहात उडी घेतो आणि संपूर्ण शरीराला एका अदृश्य युद्धासाठी तयार करतो.
अधिवृक्क ग्रंथी (ॲड्रेनल ग्रंथी) आपल्या शरीरात उदर पोकळीत दोन्ही मूत्रपिंडांच्या म्हणजेच किडनीच्या अगदी वरच्या बाजूला टोपीसारख्या बसलेल्या असतात. या ग्रंथीमधून हे संप्रेरक आपल्या रक्तात स्त्रवतं.
त्याचा रक्तातील प्रवेश म्हणजेच मानवी शरीरातील एका थरारक महानाट्याची सुरुवात असते. तो शरीरात धावून येताच हृदयाचे ठोके प्रचंड वेगाने वाढू लागतात, जणू छातीच्या आत युद्धनौकेवरील ढोल वाजायला लागतात. फुफ्फुसांचे वायू मार्ग तातडीने रुंदावतात जेणेकरून शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा. याच वेळी डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होतात, जेणेकरून समोरील संकटाचा अंदाज घेऊन स्वसंरक्षणाचा मार्ग स्पष्ट दिसावा.
या विशिष्ट क्षणी शरीरातील मरगळ आणि जुना थकवा कुठल्या कुठे पळून जातो. मेंदूला धोक्याची पूर्वकल्पना देऊन हा रक्षक हाता-पायांच्या स्नायूंमध्ये एक अद्भूत, अफाट आणि अविश्वसनीय शक्तीचा संचार करतो. जो माणूस एरवी साधी भिंत ओलांडू शकत नाही, तो संकटाच्या वेळी याच शक्तीच्या जोरावर उंच कुंपणही एका उडीत पार करतो. ही किमया केवळ आणि केवळ या एका संप्रेरकामुळेच शक्य होते.
ॲड्रेनालिन म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले ‘लढा किंवा पळा’ चे एक अमोघ अस्त्र आहे. हा केवळ शरीरातील एक रासायनिक स्राव नाही, तर संकटसमयी सामान्य माणसालाही काही काळासाठी ‘सुपरमॅन’ बनवणारा निसर्गाचा जादूचा डोस आहे. जेव्हा समोर ठाकलेले संकट टळते आणि मन शांत होते, तेव्हा हा रक्षकही हळूहळू आपला प्रभाव कमी करतो.
धोका संपल्यानंतर हृदयाचे वाढलेले ठोके पुन्हा संथ होतात आणि संपूर्ण शरीर पुन्हा एकदा नेहमीसारखे विश्रांतीच्या अवस्थेत जाते. आपल्या दैनंदिन जगण्याच्या संघर्षाला, साहसाला आणि थराराला जिवंत ठेवणारी ही मानवी शरीरातील निसर्गाची सर्वात अनोखी आणि सुंदर किमया आहे.