
एका स्वाभिमानी आईची धगधगती कहाणी आणि स्वतःचे आकाश शोधणाऱ्या तीन लेकींची जिद्द सांगणारी ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका येत्या सोमवारपासून म्हणजेच १५ जून २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. झी मराठी वाहिनीने नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला असून, त्यातील जिवंत संवाद आणि कलाकारांचे लूक यामुळे उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. स्त्री हक्क, कौटुंबिक मूल्ये आणि सामाजिक रूढींवर बोट ठेवणारी ही कथा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी सज्ज झाली आहे.
या मालिकेच्या प्रोमोची सुरुवात एका खानावळीच्या पार्श्वभूमीवर होते. तिथे मुलींच्या मालमत्तेवरील अधिकाराबद्दल आणि हक्कांबद्दल पुरुषांमध्ये चाललेली चर्चा समाजातील संकुचित मानसिकतेवर प्रकाश टाकते. “मुलींना काहीही द्यायची गरज नाही,” या पुरुषी अहंकाराला चोख उत्तर देत, अत्यंत बाणेदारपणे तिथे एका तरुणीची एन्ट्री होते. कायद्याचे अचूक ज्ञान आणि डोळ्यात अंगार घेऊन मुलींच्या हक्कांसाठी लढणारी ही मुलगी म्हणजेच कृष्णाईची मोठी लेक ‘गौरी’ होय. वकिलीचे शिक्षण पूर्ण करून जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारी गौरी ही केवळ एक व्यक्तिरेखा नसून, आजच्या काळातील कणखर स्त्रीचे प्रतीक वाटते. तिची ही निर्भिड शैली कथेमध्ये एक वेगळाच थरार निर्माण करते.
या संपूर्ण कथेचा मुख्य कणा म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी साकारलेली ‘कृष्णाई’ ही मध्यवर्ती भूमिका आहे. कृष्णाई ही केवळ आपल्या मुलींचे संगोपन करणारी आई नाही, तर ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी एक ढाल आहे. तिच्या तीन लेकी या तिच्या आयुष्यातील तीन वेगवेगळ्या शक्ती आहेत. मोठी मुलगी कायद्याच्या भाषेत बोलते, तर दुसरी मुलगी ‘शारदा’ ही शांत, संयमी आणि कृष्णाईची सावली बनून खानावळीच्या कामात तिला मदत करते. यापूर्वी ऐतिहासिक आणि पौराणिक भूमिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री एकता लब्दे आता या साध्या, घरगुती पण तितक्याच महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तिसरी मुलगी अभ्यासात हुशार असण्यासोबतच मैदानावर शत्रूला धूळ चारणारी फायटर आहे.
लोकांनी कितीही टोमणे मारले, तरी कृष्णाईचा आपल्या मुलींवरील विश्वास अजिबात डगमगत नाही. “लेकींच्या सुखात तिला सुख लाभतं… एका आईला आणि काय हवं असतं…” हे या मालिकेचे ब्रीदवाक्य आई आणि मुलींमधील अतूट नात्याची खोली दर्शवते. या प्रवासात अभिनेता रोहित परशुराम हा देखील एका महत्त्वाच्या आणि भावनिक भूमिकेत पाहायला मिळणार असून, त्याचे येणे कथेला कोणते नवे वळण देणार याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.