अभया – स्त्री शक्तीची गाथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग आणि आशयघन विषयांची मोठी लाट पाहायला मिळत आहे. याच परंपरेला पुढे नेणारा ‘अभया’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकताच या चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेड या नामांकित कंपनीची निर्मिती असलेल्या या चित्रपटाने आपल्या पहिल्या पोस्टरपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. डॉ. विमल राज माथुर निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन युसुफ सुरती यांनी केले असून त्यांनी एका महिलेच्या जीवनातील संघर्षाची अत्यंत टोकदार आणि भावनिक मांडणी या माध्यमातून केली आहे.

चित्रपटाचे कथानक एका अशा कणखर स्त्रीच्या प्रवासाभोवती फिरते जिला परिस्थितीने अनेकदा झुकवण्याचा प्रयत्न केला मात्र तिने आपल्या धैर्याने आणि अथांग आत्मविश्वासाने संकटांवर मात केली. ‘अभया’ ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट नसून ती आजच्या काळातील स्त्री शक्तीचे प्रतीक मानली जात आहे. चित्रपट निर्मात्यांच्या मते ही कथा प्रेक्षकांना केवळ विचार करायला भाग पाडणार नाही तर त्यांना भावनिकरित्या समृद्ध देखील करेल. आयुष्यातील कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ देणारा हा चित्रपट सशक्तीकरणाचा एक नवा अध्याय मांडताना दिसणार आहे.

या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यातील तगडी स्टारकास्ट. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्यासारख्या अनुभवी कलाकाराची साथ या चित्रपटाला लाभली आहे ज्यामुळे या कथेतील गांभीर्य अधिकच गडद झाले आहे. अभिनेत्री योगिता भोसले या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून पोस्टरमधील त्यांची मुद्रा चित्रपटाच्या विषयाची व्याप्ती स्पष्ट करते. त्यांच्यासोबतच कमलेश सावंत, गणेश यादव, रोहित कोकाटे आणि हर्षा निक्कम यांसारख्या कसलेल्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या सर्व कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच एक पर्वणी ठरणार आहे.

ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट सध्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात वेगाने विस्तार करत असून ‘अभया’च्या माध्यमातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत एक दर्जेदार पाऊल टाकले आहे. कंपनीचे अध्यक्ष डॉ. विमल राज माथुर यांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार प्रेक्षकांना एक अर्थपूर्ण सिनेमॅटिक अनुभव देणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता सर्वत्र याच्या टीझर आणि ट्रेलरची उत्सुकता लागली आहे. दमदार विषय आणि ताकदीचे कलाकार यामुळे हा चित्रपट येणाऱ्या काळात बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निश्चितपणे निर्माण करेल अशी चिन्हे दिसत आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
2,937 वेळा पाहिलं