जगदंबे – भक्तीचा सुरेल जागर

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आगामी चित्रपट ‘सालबर्डी’ची जोरदार चर्चा सुरू आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटातील ‘जगदंबे’ हे विशेष गीत १७ मार्च २०२६ रोजी अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आले असून त्याने अवघ्या काही तासांतच श्रोत्यांच्या मनावर मोहिनी घातली आहे.

गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या पावन पर्वावर आय जगदंबेच्या आशीर्वादाने या गीताचे लोकार्पण करण्यात आले. ज्यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे. ‘एव्हरेस्ट मराठी’च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आलेले हे गीत केवळ एक संगीत रचना नसून तो आदिशक्तीचा एक चैतन्यमय भक्ती सोहळा आहे, जो प्रेक्षकांना थेट एका आध्यात्मिक अनुभवाची अनुभूती देतो.

या गीताचा सर्वात प्रभावी आणि आत्म्याला भिडणारा पैलू म्हणजे त्याचे गायन. मराठी संगीत विश्वातील दिग्गज गायक अजय गोगावले यांनी आपल्या खणखणीत आणि दमदार आवाजात हे गीत गायले आहे. त्यांच्या आवाजातील आर्तता, स्वरांचा सखोलपणा आणि भक्तीचा ओलावा या गीताला एक वेगळीच उंची प्रदान करतो. अजय गोगावले यांच्या गायनामुळे गीतातील प्रत्येक शब्द जिवंत झाला आहे.

संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांनी या गीताला अत्यंत लयबद्ध आणि पारंपरिक वाद्यांच्या साहाय्याने स्वरसाज चढवला आहे. ढोल-ताशांचा गजर, टाळांचा कडकडाट आणि शहनाईचे मंगलमय सूर यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीने भारून गेले आहे. मुकुंद भालेराव यांनी लिहिलेले शब्द थेट काळजाला भिडणारे असून त्यातून देवीप्रती असलेली अपार श्रद्धा प्रकर्षाने जाणवते.

चित्रीकरणाच्या दृष्टीनेही हे गीत अत्यंत भव्य दिव्य झाले आहे. अभिनेता गश्मीर महाजनी याने आपल्या अभिनयातून आणि नृत्यातून एक रौद्र तरीही पूर्णपणे समर्पित अवतार सादर केला आहे. कपाळावर लावलेला मोठा टिळा आणि हातात घेतलेले दिवे हे दृश्य देवीच्या जागरणाची आठवण करून देते. प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी या गीताचे नृत्य दिग्दर्शन केले असून त्यांनी हालचालींमध्ये एक प्रकारची शिस्त आणि प्रचंड ऊर्जा जपली आहे. हे गीत पाहताना प्रेक्षकांना एका भव्य यात्रेचा अनुभव येतो. ज्यामध्ये भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम पाहायला मिळतो.

तांत्रिकदृष्ट्याही हे गीत अतिशय समृद्ध आहे. उत्कृष्ट कॅमेरा वर्क, प्रकाशयोजना आणि संकलन यामुळे गाण्याचा प्रभाव अधिक वाढला आहे. या गीतातून मानवी आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी आई जगदंबेला घातलेली आर्त साद मनाला स्पर्श करते. रमेश साहेबराव चौधरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘सालबर्डी’ हा चित्रपट येत्या १७ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘जगदंबे’ गीताला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
17,212 वेळा पाहिलं