सालबर्डी – संघर्षाची वास्तववादी गाथा

मराठी चित्रपटसृष्टीत जेव्हा एखादा चित्रपट मातीतील अस्सल संघर्ष आणि वास्तव मांडतो, तेव्हा तो प्रेक्षकांच्या काळजाला थेट भिडतो. १७ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून ‘सालबर्डी’ हा चित्रपट नेमका याच धाटणीचा आहे. यापूर्वी आपण या चित्रपटातील तांत्रिक बाबी आणि कलाकारांच्या भूमिकेबद्दल माहिती घेतली होती परंतु आता प्रत्यक्ष चित्रपट पडद्यावर आल्यानंतर तो प्रेक्षकांशी संवाद साधण्यात किती यशस्वी झाला आहे. हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.

विदर्भाच्या पार्श्वभूमीवर आधारलेली ही कथा केवळ पडद्यावरचे दृश्य नसून तिथल्या निसर्गाप्रमाणेच काहीशी रौद्र आणि वास्तववादी वाटत आहे. दिग्दर्शकाने केवळ मनोरंजन न करता एका ज्वलंत विषयाला हात घातला असून प्रत्येक फ्रेममध्ये तिथल्या मातीचा जिवंतपणा जाणवतो.

अभिनयाच्या बाबतीत या चित्रपटाने प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. शशांक शेंडे यांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली असून त्यांच्या वाट्याला आलेल्या भावनिक छटा त्यांनी अतिशय संयतपणे साकारल्या आहेत. पूजा सावंत हिचा पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेतील वावर अधिक परिपक्व आणि धाडसी वाटतो तिने आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. ओंकार भोजने आणि अंशुमन विचारे यांची साथ चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेते; विशेषतः ओंकार भोजने याने साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर खोलवर ठसा उमटवते. गश्मीर महाजनी आणि भारत गणेशपुरे यांची उपस्थिती चित्रपटाला अधिक प्रगल्भ बनवते. या सर्व कसदार कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपट अधिक वास्तववादी वाटतो आणि प्रेक्षकांना कथानकात गुंतवून ठेवतो.

पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः ग्रामीण भागात आणि विदर्भातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे संवाद आणि पार्श्वसंगीत दृश्यांची तीव्रता वाढवण्यात मोठी भूमिका बजावतात. समीक्षकांच्या मते, हा चित्रपट केवळ डोळ्यांना सुख देणारा नसून अंतर्मुख करणारा आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षकांनी याला ‘मातीतील अस्सल कलाकृती’ म्हणून गौरवले आहे. व्यावसायिक चित्रपटांच्या गर्दीत ‘सालबर्डी’ हा एक वेगळा आणि आशयघन चित्रपट ठरला असून तो समाजातील नात्यांची गुंतागुंत आणि जगण्याचा संघर्ष अतिशय संवेदनशीलपणे मांडतो.

जर तुम्हाला साचेबद्ध चित्रपटांच्या पलीकडे जाऊन एखादी दर्जेदार कलाकृती पाहायची असेल, तर हा चित्रपट एकदा तरी चित्रपटगृहात जाऊन अनुभवायला हवा. चित्रपटाचा वेग काही ठिकाणी संथ वाटला तरी तो विषयाची व्याप्ती मांडण्यासाठी आवश्यक वाटतो. मध्यंतरानंतर चित्रपट अधिक वेगवान होतो आणि प्रेक्षकांच्या भावनांचा ताबा घेतो. कौटुंबिक नात्यांमधील ओलावा आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द यात सुरेखपणे गुंफण्यात आली आहे. पहिल्या दिवसाचा प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही आपली यशस्वी मोहोर उमटवेल असे चित्र सध्या दिसत आहे. दर्जेदार अभिनय आणि प्रामाणिक दिग्दर्शन यामुळे ‘सालबर्डी’ सध्या चर्चेत आहे.






4,817 वेळा पाहिलं