भागूबाई – गावात भरणार हास्याची जत्रा

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री निर्मिती सावंत पुन्हा एकदा एका धमाकेदार भूमिकेत प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आगामी २४ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा ‘भागूबाई’ हा चित्रपट सध्या सिनेवर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट केवळ एक कॉमेडी-ड्रामा नसून, तो संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाची एक मोठी मेजवानी ठरणार आहे. या चित्रपटाची कथा ‘भागूबाई’ नावाच्या अशा एका स्त्रीभोवती फिरते, जिचा छंद म्हणजे गावातील लहान-मोठ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि गप्पांची मैफल जमवणे. आपल्या खट्याळ आणि अतिउत्साही स्वभावामुळे संपूर्ण गावात तिचे एक वेगळेच वलय आहे पण एके दिवशी तिच्या आयुष्यात एक अशी अनपेक्षित घटना घडते, ज्यामुळे संपूर्ण गावाचा शांततापूर्ण माहोल बदलून जातो. या घटनेनंतर जे विनोदी पेचप्रसंग आणि गोंधळ उडतात, तो प्रवास म्हणजे ‘भागूबाई’ ही ‘हास्यजत्रा’ आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन संजय अमर यांनी केले असून, त्यांनी ग्रामीण भागातील माणसांचे स्वभाव आणि त्यांच्या जगण्यातील बारकावे अतिशय प्रभावीपणे पडद्यावर मांडले आहेत. निर्मिती सावंत यांनी ‘भागूबाई’ ही मुख्य भूमिका अत्यंत जिवंतपणे साकारली आहे. त्यांच्या विनोदी अभिनयाची खास शैली, देहबोली आणि संवादफेक प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करेल, यात शंका नाही. त्यांच्यासोबतच शशांक शेंडे, मंगेश देसाई आणि विजय पाटकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांची तगडी फौज या चित्रपटाला अधिक उंचीवर घेऊन जाते. या दिग्गज कलाकारांची जुगलबंदी चित्रपटाला एक वेगळीच रंजकता प्रदान करते ज्यामुळे प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.

केवळ विनोदाचा डोस देण्यापलीकडे जाऊन हा चित्रपट कौटुंबिक मूल्यांची जपणूक करणारा एक सुंदर प्रवास आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात जिथे प्रत्येकजण मनोरंजनाच्या शोधात आहे तिथे ‘भागूबाई’ हा चित्रपट एक उत्तम ‘स्ट्रेस-बस्टर’ ठरेल. चित्रपटातील हलका-फुलका विनोद आणि भावूक प्रसंगांचा योग्य ताळमेळ साधत प्रेक्षकांना एक परिपूर्ण अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुटुंबासोबत दर्जेदार मराठी सिनेमाचा आनंद घ्यायचा असेल तर ‘भागूबाई’ हा चित्रपट आपल्या यादीत नक्कीच समाविष्ट करा. निर्मिती सावंत यांची ही अभिनयाची हास्यजत्रा अनुभवण्यासाठी आणि या हास्याच्या लाटेत सामील होण्यासाठी जवळच्या चित्रपटगृहात जाण्यास विसरू नका!






16,394 वेळा पाहिलं