सह्याद्री मराठी वाहिनी

Category: मराठी चित्रपट

नवीन मराठी चित्रपट, परीक्षण, प्रदर्शन तारीख जाणून घेण्यासाठी सह्याद्री मराठी वाहिनीला नक्की भेट द्या.

  • तिघी – तीन पिढ्यांची भावस्पर्शी गोष्ट

    तिघी – तीन पिढ्यांची भावस्पर्शी गोष्ट

    मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच आशयघन आणि वास्तववादी विषयांना प्राधान्य दिले आहे. कधी सामाजिक प्रश्न तर कधी नात्यांमधील हळवेपण पडद्यावर मांडत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. याच परंपरेत आता एका नव्या चित्रपटाची भर पडणार आहे, ज्याचे नाव आहे ‘तिघी’. जिजिविषा काळे यांच्या दिग्दर्शनाखाली आकाराला आलेला हा चित्रपट येत्या ६ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होत असून, यात मराठी चित्रपटसृष्टीतील तीन दिग्गज अभिनेत्री पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये दिसणार आहेत.

    तीन पिढ्या, तीन स्वभाव आणि एक ‘आईचं घर‘

    ‘तिघी’ या चित्रपटाची टॅगलाईन आहे ‘आईचं घर… हजार आठवणी’. ही टॅगलाईनच चित्रपटाच्या गाभ्याबद्दल बरंच काही सांगून जाते. कथा फिरते ती एका आई आणि तिच्या दोन लेकींभोवती. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी यात आईची भूमिका साकारली आहे, तर सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे या त्यांच्या दोन मुलींच्या भूमिकेत आहेत. प्रत्येक घरात आई आणि मुलींचे नाते हे जगातील सर्वात सुंदर पण तितकेच गुंतागुंतीचे असते. लग्नानंतर मुलींचे आयुष्य बदलते, प्राधान्यक्रम बदलतात आणि हळूहळू माहेरच्या आठवणी मागे पडू लागतात. अशाच एका वळणावर जेव्हा या तिघी पुन्हा एकत्र येतात, तेव्हा जुन्या आठवणींचा पदर कसा उलगडतो, हे या चित्रपटात अत्यंत संवेदनशीलतेने मांडले आहे.

    तगडी स्टारकास्ट: अभिनयाची जुगलबंदी

    या चित्रपटाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्याची स्टारकास्ट. भारती आचरेकर या आपल्या नैसर्गिक अभिनयासाठी ओळखल्या जातात. ‘आई’ म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरील मायेचा ओलावा आणि लेकींसाठी असलेली ओढ प्रेक्षकांना हेलावून टाकणारी आहे. दुसरीकडे, सोनाली कुलकर्णी हिने नेहमीच चोखंदळ भूमिका निवडल्या आहेत. या चित्रपटातही तिची भूमिका अत्यंत संयत आणि प्रगल्भ आहे. नेहा पेंडसे हिने केवळ या चित्रपटात अभिनयच केलेला नाही, तर ती या चित्रपटाची सह-निर्माती देखील आहे. नेहाची भूमिका आजच्या काळातील स्वतंत्र विचारांच्या स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी आहे. या तिन्ही अभिनेत्रींना एकत्र पाहणे ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरेल. त्यांच्यासोबत पुष्कराज चिरपुटकर, निपुण धर्माधिकारी आणि जैमिनी पाठक यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांची साथ लाभल्याने चित्रपटाची उंची अधिकच वाढली आहे.

    दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू

    जिजिविषा काळे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. स्त्रियांच्या मनातील भावविश्व टिपण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण आणि पार्श्वसंगीत कथेला पोषक आहे. प्रियंका बर्वे आणि शरयू दाते यांच्या स्वरातील गाणी आधीच लोकप्रिय झाली असून, ती चित्रपटातील भावनिक प्रसंगांना अधिक गडद करतात.

    हा चित्रपट का पाहावा?

    आजच्या धावपळीच्या युगात आपण अनेकदा आपल्या जवळच्या माणसांना आणि विशेषतः आपल्या आईला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. ‘तिघी’ हा चित्रपट आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुळांकडे नेणारा आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही, तर प्रेक्षकांना अंतर्मुख करतो. आपल्या घरातील स्त्रियांच्या संघर्षाची आणि त्यांच्या प्रेमाची जाणीव हा चित्रपट करून देतो. तीन वेगवेगळ्या पिढ्यांच्या अभिनेत्रींची जुगलबंदी पाहण्यासाठी हा चित्रपट आवर्जून पाहावा. हा चित्रपट कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून पाहण्यासारखा आहे. यात कोणताही भडकपणा नसून केवळ शुद्ध भावनांचा प्रवाह आहे.

    थोडक्यात सांगायचे तर ‘तिघी’ हा चित्रपट म्हणजे केवळ एक कौटुंबिक कथा नसून तो प्रत्येक स्त्रीच्या जगण्याचा आरसा आहे. आईच्या घराच्या भिंतीत दडलेल्या त्या हजारो आठवणी जेव्हा जिवंत होतात, तेव्हा डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. येत्या शुक्रवारी, ६ मार्चला आपल्या जवळच्या माणसांसोबत चित्रपटगृहात जाऊन हा अनुभव नक्कीच घेण्यासारखा आहे.

  • तीन पायांचा घोडा – तरुणाईच्या वेड्या स्वप्नांचा संघर्षमय प्रवास

    तीन पायांचा घोडा – तरुणाईच्या वेड्या स्वप्नांचा संघर्षमय प्रवास

    मराठी चित्रपटसृष्टीत वास्तवाशी घट्ट नातं जोडणारे चित्रपट क्वचितच दिसतात पण ‘तीन पायांचा घोडा’ हा चित्रपट त्या प्रवाहातला एक संवेदनशील अपवाद ठरतो. दिनांक 7 नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे सादर करते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि मुग्धा श्रीकांत देसाई हे असून कुणाल शुक्ला, रिया नलावडे आणि अविनाश लोंढे यांनी प्रभावी अभिनय केला आहे. त्यांच्या सोबत देविका दप्तरदार आणि गजानन परांजपे यांनीही आपल्या भूमिका उत्कृष्टरीत्या साकारल्या आहेत. नुपूर बोरा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या पुण्यात घडणाऱ्या एका भावस्पर्शी आणि अनोख्या मैत्रीची कथा सांगतो. जी नात्यांचा, स्वप्नांचा आणि बदलत्या काळाचा अर्थ नव्याने समजावते.

    २००३ साल आहे. पुणे शहर अजूनही शांत आहे, ट्रॅफिक कमी आहे आणि लोक प्रत्यक्ष भेटून बोलतात. नोकिया फोन, कायनेटिक होंडा स्कूटर आणि चालणाऱ्या माणसांच्या आवाजांनी शहराच्या रस्त्यांवर एक वेगळंच संगीत घुमतं. या काळात तंत्रज्ञान आणि जीवनशैली दोन्ही बदलाच्या उंबरठ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर घडते अदनान, चंद्रिका आणि राठोड यांची कथा.

    अदनान हा बारावीची परीक्षा वारंवार नापास होणारा मुलगा. त्याच्या आयुष्यात मोठं स्वप्न नाही, पण त्याच्या आजोबा म्हणजेच गजानन परांजपे यांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे. दुसरीकडे चंद्रिका ही एक महत्वाकांक्षी मुलगी आहे. अभिनय क्षेत्रात नाव कमावण्याचं तिचं स्वप्न आहे. अदनान आणि चंद्रिका यांचं नातं कोवळं आणि प्रामाणिक आहे पण आयुष्याच्या वास्तवात ते दोघं हरवतात.

    त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात प्रवेश करतो राठोड बनावट कागदपत्रं तयार करण्यात पटाईत, पण मनाने संवेदनशील मुलगा. चंद्रिका जेव्हा अदनानसाठी बनावट मार्कशीट मिळवण्यासाठी राठोडकडे जाते, तेव्हा एक वेगळीच मैत्री जन्म घेते. तिघे मिळून त्यांच्या लहानसहान साहसांचा आनंद घेतात, पण त्यांना कल्पनाही नसते की हाच प्रवास त्यांच्या आयुष्यात आणि शहरात एक मोठा बदल घडवून आणणार आहे.

    चित्रपटाचं नाव “तीन पायांचा घोडा” हेच त्याचं योग्य शीर्षक आहे . जीवनात असंतुलन असलं तरी पुढे जाण्याची धडपड थांबत नाही. दिग्दर्शक नुपूर बोरा यांनी या संकल्पनेला अत्यंत संवेदनशीलतेने हाताळलं आहे. पात्रांची वाढ, नात्यांची गुंतागुंत आणि काळाचा बदल हे सर्व घटक इतक्या सहजतेने मांडले आहेत की प्रेक्षकांना स्वतःचं आयुष्य पडद्यावर उमटल्यासारखं वाटतं.

    चित्रपटाचं छायाचित्रण आणि संगीत दोन्हीही भावनांना पूरक आहेत. जुन्या पुण्याचं वातावरण, गल्ल्या, स्कूटरचा आवाज आणि कॉल सेंटरच्या जगात पाऊल ठेवणारी तरुणाई. हे सगळं दृश्यरूपाने अनुभवताना प्रेक्षकही त्या काळात जातात. देविका दप्तरदार आणि गजानन परांजपे यांच्या भूमिका विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांच्या अभिनयातून चित्रपटाला भावनिक खोली मिळते.

    समीक्षकांनी या चित्रपटाला पाच पैकी साडेतीन गुण दिले आहेत. प्रेक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर “आजच्या पिढीचा आरसा” आणि “नात्यांचा अर्थ नव्याने उलगडणारा प्रवास” अशा प्रतिक्रिया दिसत आहेत.

    एकूणच ‘तीन पायांचा घोडा’ हा केवळ एका काळाची कथाच नाही तर ती बदलत्या शहरातल्या तरुणांच्या भावविश्वाची त्यांच्या संघर्षाची आणि नात्यांच्या असंतुलनातून निर्माण होणाऱ्या संवेदनशील वास्तवाची जाणीव करून देणारी गोष्ट आहे. तरुणाईने हा चित्रपट नक्कीच एकदातरी अनुभवावा असा आहे.

  • अफजलखानाची भूमिका साकारत संजय दत्त करणार राजा शिवाजी चित्रपटातून पुनरागमन

    अफजलखानाची भूमिका साकारत संजय दत्त करणार राजा शिवाजी चित्रपटातून पुनरागमन

    प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नवा चित्रपट येणार आहे. आणि तो चित्रपट म्हणजे ‘राजा शिवाजी’ रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित हा सिनेमा 2026 मध्ये प्रदर्शित होणार असून या भव्य ऐतिहासिक चित्रपटात बॉलिवूडचा दमदार अभिनेता संजय दत्त ‘अफजलखान’ ही गाजलेली भूमिका साकारणार आहे.

    ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित असून त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे प्रतापगडचा संग्राम. या चित्रपटाचा केंद्रबिंदू असेल. महाराजांच्या विश्वासू ‘जिवा महाला’ ची भूमिका देखील चित्रपटात तितकीच ठसठशीत आणि भावपूर्ण स्वरूपात सादर केली जाणार आहे.

    संजय दत्त यांच्या अफजलखानच्या भूमिकेमुळे या चित्रपटात अधिक ताकद आणि भव्यता येणार आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गांभीर्य, तीव्रता आणि अभिनयातील वजन या ऐतिहासिक पात्राला नवे रूप देणार आहेत. दुसरीकडे, रितेश देशमुख दिग्दर्शक म्हणून पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव घेऊन येत आहेत.

    ‘राजा शिवाजी’चे चित्रीकरण महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांवर आणि भव्य सेट्सवर होत असून युद्धदृश्यं आणि पार्श्वसंगीताच्या माधुर्यामुळे हा सिनेमा दृश्यरम्य आणि भावनिक अनुभव ठरण्याची चिन्हं आहेत.

    सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून संजय दत्तच्या अफजलखान रूपातील दमदार लुकबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. लवकरच प्रेक्षकांना “राजा शिवाजी विरुद्ध अफजलखान” हा ऐतिहासिक संघर्ष मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

  • अभंग तुकाराम – गाथा संघर्षातून समाज परिवर्तन घडवणारी

    अभंग तुकाराम – गाथा संघर्षातून समाज परिवर्तन घडवणारी

    मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा भक्ती, अध्यात्म आणि समाजपरिवर्तनाचा संगम अनुभवायला मिळाला तो म्हणजे दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’. दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आणि त्यांच्या अभंगांच्या गाथेवर आधारित असून तो केवळ धार्मिक चित्रपटच न राहता मानवी मूल्यांचा आणि श्रद्धेचा अनुभव देतो. या चित्रपटात योगेश सोमण यांनी संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारली आहे तर स्मिता शेवाळे त्यांच्या पत्नी आवलीच्या भूमिकेत दिसते. अजय पूरकर एका विशेष भूमिकेत आहेत. ‘अभंग तुकाराम’ हा तुकाराम महाराजांच्या जीवनातील संघर्ष, भक्ती आणि समाजाशी असलेल्या नात्याचं प्रभावी चित्रण आहे. देहूच्या भूमीत उगवलेला एक साधा व्यापारी समाजातील अन्याय, जातीभेद आणि अंधश्रद्धांच्या विरोधात उभा राहतो आणि भक्तीमार्गावर आत्मशांती शोधतो हाच त्याच्या जीवनाचा खरा ‘अभंग’ ठरतो.

    योगेश सोमण यांचा अभिनय या चित्रपटाचा आत्मा आहे. त्यांच्या डोळ्यांतील शांतता आणि आवाजातील भक्तीभाव तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला जिवंत करतात. स्मिता शेवाळेची ‘आवली’ ही केवळ पत्नी नसून तुकारामांच्या भक्तीचा आरसा आहे. तिचा राग, वेदना आणि शेवटी झालेलं समाधान हे सर्व स्मिताने अत्यंत प्रभावीपणे अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वारकरी संगीत आहे. तब्बल दहा अभंगांचा समावेश असलेल्या या चित्रपटात प्रत्येक अभंग प्रसंगानुसार गुंफला गेला आहे. वीणेचा नाद, पखवाजाचे ठोके आणि तबल्याचे सूर हा आध्यात्मिक क्षण प्रेक्षकांना वारीच्या भावविश्वात घेऊन जातो. संगीतकारांनी भक्तीभावाला आधुनिकतेचा स्पर्श देत एक हृदयस्पर्शी वातावरण तयार केलं आहे.

    दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटात भक्ती आणि वास्तवाचा समतोल अप्रतिम राखला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, देहूतील जीवन, वारीचे दृश्य आणि तुकाराम महाराजांच्या समाधीचा प्रवास याचे छायाचित्रण अत्यंत मोहक आणि भावपूर्ण आहे. संवाद, वेशभूषा आणि दृश्यरचना या सर्व घटकांनी चित्रपटाला ऐतिहासिक सौंदर्य लाभले आहे. ‘अभंग तुकाराम’ पाहताना जाणवतं की हा केवळ धार्मिक चित्रपटच नाही तर मानवतेचा सण आहे. तुकाराम महाराजांचा “जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले” हा विचार आजही तितकाच लागू पडतो. भक्ती ही फक्त देवापर्यंत पोहोचण्याचं साधन नसून समाजपरिवर्तनाचं शस्त्र आहे असा संदेश या चित्रपटातून प्रभावीपणे उमटतो.

    एकंदरीत ‘अभंग तुकाराम’ हा प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा, विचार करायला लावणारा आणि मनात शांततेचा ओलावा निर्माण करणारा सिनेमा आहे. अभिनय, संगीत, दिग्दर्शन आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा सुंदर मिलाफ या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेतो. काही ठिकाणी गती मंदावली तरी भक्तीभाव आणि अभिनयाची खोली त्या त्रुटींवर मात करते. अभंग हे केवळ ओव्या नाही तर ते जिवंत अनुभव आहेत आणि त्या अनुभवांना पडद्यावर उतरवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो. भक्ती, अभिनय आणि संदेश या तिन्ही स्तरांवर तो उत्कृष्ट ठरतो. त्यामुळे ‘अभंग तुकाराम’ चित्रपटाला पाच पैकी साडेचार गुण देत त्याला “मनाला शांती देणारी आणि विचारांना उजाळा देणारी” भव्यदिव्य कलाकृतीची विलक्षण कथा असं म्हणणं योग्य ठरेल.

  • पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाची मोठी विक्रमी कमाई

    पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाची मोठी विक्रमी कमाई

    महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून थिएटर्समध्ये ‘हाऊसफुल’चे फलक झळकू लागले आहेत.अभिनेता सिद्धार्थ बोडके याने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि प्रेरणेचा मानबिंदू असलेले महाराज आजच्या काळात अवतरतात आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढा देतात.अशी या चित्रपटाची प्रभावी कथा आहे.

    ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ने पहिल्याच दिवशी एकोणीस लाख रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी हा आकडा चौतीस लाखांपर्यंत पोहोचला. अशा प्रकारे केवळ दोन दिवसांत चित्रपटाने त्रेपन्न लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी कमाईत आणखी वाढ झाली आहे.चित्रपटात सिद्धार्थ बोडकेसोबत विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, सयाजी शिंदे, तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या भूमिका पाहायला मिळतात. कथा आणि पटकथा स्वतः महेश मांजरेकर यांनी लिहिली असून संवाद सिद्धार्थ साळवी यांचे आहेत.

    महेश मांजरेकर म्हणतात, “शेतकरी आत्महत्येचा विषय मला अनेक वर्षांपासून अस्वस्थ करत होता. या विषयावर बोलणं आणि तो समाजासमोर मांडणं ही काळाची गरज आहे. आजच्या काळातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून महाराज किती संतप्त होतील, हे प्रेक्षकांना या चित्रपटातून दिसेल. हा प्रत्येक मराठी माणसाचा चित्रपट आहे.” चित्रपटाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रातील जनतेला तो पाहण्याचं आवाहन केलं आहे. दमदार विषय, ऐतिहासिक संदर्भ आणि आधुनिक वास्तव यांचा संगम असलेल्या या चित्रपटाची ‘माऊथ पब्लिसिटी’मुळे ही कमाई मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.

    सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी सिद्धार्थ बोडके यांच्या अभिनयाचं आणि चित्रपटातील संवादांचं विशेष कौतुक केलं आहे. आयएमडीबीवर सध्या या चित्रपटाला दहा गुणांपैकी सात पूर्णांक आठ रेटिंग मिळालं असून गूगलवर अठ्याऐंशी टक्के प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

  • ‘ये रे ये रे पैसा ३’

    ‘ये रे ये रे पैसा ३’

    ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे फार मनोरंजन केले होते. त्यानंतर या चित्रपटाने ‘ये रे ये रे पैसा २’ सुद्धा

    आणला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा

    करण्यात आली आहे.      

    या चित्रपटांचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले होते. दि. १ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून

    हसायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमावर जोडण्यात आले आहे. ‘ये रे ये रे पैसा ३’

    या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची असून संवाद

    लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे.

  • ‘ये रे ये रे पैसा ३’

    ‘ये रे ये रे पैसा ३’

    ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे फार मनोरंजन केले होते. त्यानंतर या चित्रपटाने ‘ये रे ये रे पैसा २’ सुद्धा
    आणला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा
    करण्यात आली आहे.


    या चित्रपटांचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले होते. दि. १ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून
    हसायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमावर जोडण्यात आले आहे. ‘ये रे ये रे पैसा ३’
    या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची असून संवाद
    लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे.


    पैसा मिळविण्यासाठीची धडपड या चित्रपटात पहायला मिळाली होती. ‘ये रे ये रे पैसा ३’ मध्ये काय वेगळे
    दाखविणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाएली आहे.


    चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश
    भोसले असे कलाकार आहेत. सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, कुमार मंगत पाठक,
    ओमप्रकाश भट्ट, नासिर शरीफ हे या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. निनाद बत्तीन हे या चित्रपटाचे
    सहनिर्माते आहेत.

  • राजाराणीची उत्कंठा

    राजाराणीची उत्कंठा

    सत्य घटनेवर आधारित असलेली गावाकडील प्रेमकहाणी दाखविणारा ‘राजाराणी’ हा चित्रपट लवकरच
    प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाला ‘एक थरारक प्रेमकहाणी’ अशी टॅगलाईन दिलेली आहे. येत्या ४
    ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
    सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे
    यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत
    विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर यांनी गाणी गायली
    आहेत. छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे.


    अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोड़ी या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार
    आहे. याशिवाय या चित्रपटात भारत गणेशपुरे, सूरज चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, तानाजी गलगुंडे, माधवी जुवेकर,
    भक्ती चव्हाण आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.