मुलींना सक्षम बनविताना

अनेक वर्षापूर्वीपासून महिला विषमतेच्या बळी ठरत आहेत. लिंगभेद ही तर महिलांसाठीची शतकानुशतके मोठी समस्या आहे. अलिकडे लैंगिक समानतेबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत मुलींच्या हिताच्या अनेक योजना सुरू झाल्या आहेत. यामध्ये पालकांनी अधिक योगदान देणे गरजेचे आहे. मुलीच्या सक्षमतेसाठी पालकांनी दक्ष राहणे कधीही चांगलेच ! मुला-मुलींना समानतेनेच वागवले पाहिजे.

त्यांच्यात कोणत्याही गोष्टीसाठी कधीही तुलना करु नये. मुलगा आणि मुलगी यांच्यातील फरक ही पालकत्वादरम्यान झालेली सर्वात मोठी चूक आहे. आजच्या आधुनिक काळातही अशी अनेक कुटुंबे आहेत, जिथे मुलांना प्राधान्य दिले जाते, आणि मुलींना चांगली वागणूक दिली जात नाही. याचा विपरित परिणाम मुलींच्या मानसिक आरोग्यावर होतो. हा फरक न केल्यास मुलांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतात.

काही घरांमध्ये मुलींना फारसे महत्त्व दिले जात नाही, पालक त्यांच्यावर अनेक प्रकारची बंधने घालतात, शाळेत कसे जायचे, कसे खेळायचे, कसे कपडे घालायचे, याविषयी बंधने घालून जास्त हसायचे नाही, जास्त बोलायचे नाही असे नियम लावतात. अशा गोष्टींपासून मुले पूर्णपणे मुक्त राहतात. या सर्व गोष्टी मुलींच्या विकासात अडथळा आणू शकतात. त्यांना भीती आणि खोटे बोलण्याच्या सवयी लागू शकतात. आजही अनेक ठिकाणी मुलींना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, यामुळे अनेक वेळा मुली शोषणाच्या बळी ठरतात, मात्र त्या कोणाला सांगू शकत नाहीत. लहानपणीच्या या सवयी त्यांना मोठे झाल्यावरही सहन कराव्या लागतात. त्यांना कौटुंबिक हिंसाचार आणि अत्याचार सहन करावे लागतात, पण आवाज उठवायला त्या घाबरतात.

काही पालक मुलींची तुलना मुलांशी करू लागतात. त्यांच्या तुलनेत मुलींचा स्वाभिमान दुखावला जातो. सक्षम असूनही ती स्वत:ला कमकुवत समजू लागते. या तुलनेमुळे अनेकवेळा आयुष्यात काही करण्याची इच्छाही मरून जाते. मुलींना लहानपणी फक्त बाहुल्यांशी खेळण्याचा पर्याय असतो. मुलांकडे अनेक पर्याय असतात. हे देखील मुला-मुलींमध्ये भेदभाव निर्माण करण्याचे काम करते. पालकांनी मुलींना मजबूत बनवायला सुरुवात केली पाहिजे. त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करायला हवे. या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण आपल्या मुलींना अधिक शक्तिशाली आणि आत्मविश्वासू बनवू शकता. ज्याची त्यांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर गरज असते.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
772 वेळा पाहिलं