सकारात्मक नातेसंबंध

मुलांचे भावविश्व नाजूक असते. त्यांच्या मनाची कोरी पाटी सुसंस्कारांनी भरण्यासाठी, तसेच कुटुंबातील इतर सदस्याला आनंदाने जगता येण्यासाठी कौटुंबिक नातेसंबंध मजबूत आणि सकारात्मक असावे लागतात. ते नकळतपणे मुलांच्या मनावर परिणाम करीत असतात. तेव्हाच मुलांना सुरक्षित वाटते.

सकारात्मक कौटुंबिक नातेसंबंध हे एकमेकांना दिला जाणारा वेळ, संवाद आणि एकमेकांचे कौतुक यावर बांधले जात असतात. सकारात्मक कौटुंबिक संबंध इतर अनेक कारणांसाठी देखील महत्त्वाचे आहेत. यामुळे मुलांना नवीन गोष्टी करण्याचा आणि शिकण्याचा आत्मविश्वास मिळतो. कुटुंबातील समस्या सोडवणे सोपे होऊन जाते. मुलांना कलाकौशल्यांचेही ज्ञान द्या.

दर्जेदार कौटुंबिक वेळ म्हणजे कुटुंबीयांनी एकत्र सहवासात घालविलेला जास्तीत जास्त वेळ होय.
दिवसातील काही वेळ एकत्र बसावे, बोलावे, संवाद साधावेत. हास्यविनोद करावेत. एकमेकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. मुलांना समजून घ्यावे. मुलांसमोर मोठ्या माणसांनी कधीही वाद करू नयेत.

वैयक्तिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत मनमोकळे बोला. मूल झोपायला जाण्यापूर्वी काही मिनिटे तरी त्याच्याशी संवाद साधा. जसे मोठे म्हणून आपले स्वतःचे जग आहे, तसेच त्यांचेही एक जग आहे. तिथे त्यांचे काय चालले आहे, हे जाणून घ्या. मुलांच्या मित्रमैत्रिणींविषयी जाणून घ्या.तुमच्या जोडीदाराला वेळ द्या. एकत्र कुटुंब म्हणून नियमितपणे मजेदार गोष्टी करा. आठवड्यातून एकदा स्थानिक उद्यान किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाऊन या.

कुटुंबातील इतर सद्स्यानाही त्यांचे दृष्टिकोन किंवा भावना व्यक्त करण्यासाठी वेळ द्या. कोणाच्याही चुका, राग, आनंद, निराशा, भीती आणि चिंता यासह सर्व प्रकारच्या भावनांबद्दल बोलण्यास मोकळे रहा; परंतु त्यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी क्रोधाला आवर घालणे कधीही चांगले ! उत्स्फूर्त संभाषणांसाठी तयार रहा. उदाहरणार्थ, लहान मुले आंघोळ करीत असताना किंवा अंथरुणावर पडताना त्यांच्या भावनांबद्दल बोला.

किशोरवयीन मुलांशी लैंगिक जाणीव, ड्रग्ज, अल्कोहोल, शैक्षणिक अडचणी आणि पैसा अशा अनेक विषयांबद्दल आस्थेने बोला. आपल्या मुलांना कौतुकावेळी स्तुतीने प्रोत्साहित करा. कुटुंबातील प्रत्येकाला कळू द्या की, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता. त्यांचे कौतुक करता.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
942 वेळा पाहिलं