कैरीचे पन्हे

आंबटचिंबट कैरीचे दिवस आहेत, नाही ? झाडाला कोवळ्या-कडक कैऱ्या लगडलेल्या आहेत. आता त्या बाजारातही येऊन दाखल झाल्या आहेत. मग या उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे नको का व्हायला? चला तर मग, आज बनवू कैरीचे पन्हे !
आवश्यक साहित्य :
अर्धा किलो कैऱ्या, साखर किंवा गूळ, १ चमचा मीठ आणि आवडत असल्यास वेलचीपूड

कृती :
कैऱ्या धुऊन घ्याव्यात. कैरीची साले काढून अख्ख्या कैऱ्या किंवा फोडी करून एका भांड्यातून कुकरमध्ये उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर या कैरीचा गर काढावा. हा गर आणि साखर किंवा गूळ मिक्सरच्या भांड्यामधून अथवा पुरणयंत्रामधून छान फिरवून घ्यावे. गराचे गठ्ठे राहू देऊ नयेत.

जेवढा गर असेल त्याच्या अडीच पट साखर घातली, तर ते व्यवस्थित गोड होते. हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते. पन्हे बनविताना थोड्या गरात थंड पाणी, किंचित मीठ, हवी असल्यास वेलचीपूड घालून प्यायला द्यावे. आंबटगोड पन्हे पिण्यास तयार आहे.






498 वेळा पाहिलं