तापमान आधीच वाढले आहे. ते अधिक वाढणार असल्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आज काहीतरी वेगळे आंबटगोड, गार-गार बनवूया. संत्र्याचे सिरप लागणारे साहित्य ४ संत्री, चवीनुसार साखर, २ बाटल्या सोडा, १ मोठा कप आइस्क्रीम
कृती अगदी सोपी आणि झटकन होणारी आहे. प्रथम संत्री सोलून घ्यावीत. आता या संत्र्यांच्या फोडींचा मिक्सरमधून फिरवून रस काढून घ्यावा. हा रस गाळून घ्यावा. त्यात आपल्या चवीनुसार साखर घालून छान एकजीव करून घ्यावे. नंतर हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवून थंडगार करावे. आयत्यावेळी त्यात सोडा ओतून वर आइस्क्रीम घालावे. म्हणजे हे ‘सिरप’ आणखी लज्जतदार लागते.
केरळ हे समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य राज्य आहे. येथील खाद्यसंस्कृती अर्थातच मासे या घटकाभोवती फिरते. केरळमधील असाच एक लोकप्रिय पदार्थ !
साहित्य : 200 ग्रॅम कोळंबी, अर्धा लहान चमचा हळद पावडर, दीड लहान चमचा मिरची पावडर, 2 मोठे चमचे स्वयंपाकाचे तेल, मूठभर कढीपत्ता, 2 सुक्या लाल मिरच्या, एक चमचा मोहरी, अर्धा कप चिरलेला कांदा, अर्धा कप चिरलेला टोमॅटो, एक चमचा आले-लसूण वाटण, अर्धा लहान चमचा धणे पावडर.
कृती : कोळंबी स्वच्छ करून वाहत्या पाण्याखाली धुवा. कोळंबीला मीठ आणि हळद घालून बाजूला ठेवा. एक पॅन गरम करून घ्या. त्यात 2 चमचे तेल घाला. नंतर मोहरी, कढीपत्ता,धणे पावडर आणि लाल मिरच्या घाला. आता यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला. 3-4 मिनिटे परतून घ्या. त्याच टोमॅटो-कांद्याच्या मिश्रणात एक चमचा आले-लसूण वाटण आणि 1 चमचा लाल तिखट घाला. एकत्र करण्यासाठी चांगले मिसळून घ्या. मसाल्याचा कच्चा वास निघून गेला की, एक कप पाणी घालून एक उकळी आणा. ही केरळची प्रसिद्ध कढी भात किंवा पराठ्यांसोबत खाण्यास द्या.
अर्धा कप तूरडाळ, अर्धा कप मसूर डाळ, 1 मोठे पडवळ, 8 गवारीच्या शेंगा, 6 भेंडी, 6 लहान अळूची पाने, 2 शेवग्याच्या शेंगा, एक मध्यम आकाराचे वांगे, 1 मध्यम आकाराचा बटाटा, 150 ग्रॅम काकडी, 1 मोठा कांदा,1 टोमॅटो, 3 चमचे सांबार पावडर, 10 लहान कांदे, 3 सुक्या लाल मिरच्या, पाव कप कोळलेली चिंच, 3 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा हिंग, चवीनुसार मीठ, कढीपत्ता आणि कोथिंबीर.
कृती : सांबार बनविण्यासाठी आधी सर्व भाज्या धुऊन घ्या. या भाज्यांचे तुकडे करून त्या प्रेशर कुकरमध्ये घाला. यात डाळी, मीठ घालून भाज्या बुडतील एवढे पाणी घाला. मोठ्या आचेवर शिजवा आणि शिटी होऊ द्या. शिटी झाल्यावर आच बंद करा. कुकरची वाफ जाईपर्यंत उघडू नका. वाफ जिरल्यावर कुकर उघडा आणि 2-3 चमचे सांबार पावडर, कोळलेल्या चिंचेचे पाणी आणि हिंग घाला. ढवळून घ्या. हे मिश्रण दोन मिनिटे गरम करा. आता तेलात मोहरी, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता तडतडू द्या. ही फोडणी कुकरमधील सांबारवर वरून द्या. कोथिंबिरीने सजवा. सांबार तयार!
साहित्य: बडीशेप – अर्धा कप, साखर – चवीनुसार, लिंबू – २ लहान चमचे, काळे मीठ – चवीनुसार, आवश्यकता असल्यास मीठ – चवीनुसार, पुदिन्याची पाने – ३ किंवा ४, बर्फ, पाणी.
कृती: बडीशेप स्वच्छ धुवा. यानंतर बडीशेप सुमारे २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर ही बडीशेप काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या. यासोबत साखर, काळे मीठ, पुदिन्याची पाने आणि पाणी घाला. आता हे मिक्सरवर बारीक करून घ्या. हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. यानंतर त्यात पाणी आणि लिंबाचा रस घाला. गरज असल्यास साधे मीठ चवीनुसार वापरा. आता एका ग्लासमध्ये सरबत घ्या, आवश्यकतेनुसार त्यात बर्फाचे तुकडे टाका. बडीशेप सरबत पिण्यासाठी तयार आहे.
आंबटचिंबट कैरीचे दिवस आहेत, नाही ? झाडाला कोवळ्या-कडक कैऱ्या लगडलेल्या आहेत. आता त्या बाजारातही येऊन दाखल झाल्या आहेत. मग या उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे नको का व्हायला? चला तर मग, आज बनवू कैरीचे पन्हे ! आवश्यक साहित्य : अर्धा किलो कैऱ्या, साखर किंवा गूळ, १ चमचा मीठ आणि आवडत असल्यास वेलचीपूड
कृती : कैऱ्या धुऊन घ्याव्यात. कैरीची साले काढून अख्ख्या कैऱ्या किंवा फोडी करून एका भांड्यातून कुकरमध्ये उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर या कैरीचा गर काढावा. हा गर आणि साखर किंवा गूळ मिक्सरच्या भांड्यामधून अथवा पुरणयंत्रामधून छान फिरवून घ्यावे. गराचे गठ्ठे राहू देऊ नयेत.
जेवढा गर असेल त्याच्या अडीच पट साखर घातली, तर ते व्यवस्थित गोड होते. हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते. पन्हे बनविताना थोड्या गरात थंड पाणी, किंचित मीठ, हवी असल्यास वेलचीपूड घालून प्यायला द्यावे. आंबटगोड पन्हे पिण्यास तयार आहे.
ओल्या काजूचे दिवस सुरु आहेत. गावांमध्ये गेल्यावर झाडावर लगडलेले काजू वाऱ्यावर डोलताना दिसतात. अर्थात, बाजारातही ते उपलब्ध आहेत. ओले काजू स्वादिष्ट असतात. आज बनवूया, ओल्या काजूची भाजी. साहित्य : पाव किलो सोललेले ओले काजूगर, २ कांदे, २ बटाटे, १ टोमॅटो, अर्धा ओला नारळ किसून, लसुण, आले, गरम मसाला पावडर, तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर आणि तेल.
कृती : ओले काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून त्यांचे तुकडे करावेत. प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, एक बारीक चिरलेला कांदा, लसुण व बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. हे मिश्रण चांगले परतवून घ्यावे. छान मऊ शिजल्यावर त्यात सोललेले काजू आणि बटाट्याचे तुकडे घालावेत. त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत.
आता बारीक उभा चिरलेला कांदा तेलात भाजून घ्यावा. तो लालसर झाला की त्यात ओले खोबरे घालून खरपूस भाजून घ्यावे. या भाजलेल्या कांदा- खोबऱ्याचे मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटण करुन घ्यावे. कढईतील बटाटा, काजू शिजले की त्यात हे मिश्रण घालून मिसळून घ्यावे. एक मस्त वाफ आणावी. यावेळी त्यात गरम मसाला पावडर घालावी. उतरताना बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
साहित्य : १ किलो साखर, ४०० मिली. पाणी, अर्धा लहान चमचा सायट्रिक ॲसिड, पाव लहान चमचा रासबेरी लाल रंग, अर्धा चमचा रोझ इसेन्स.
कृती : प्रथम १ किलो साखरेमध्ये ४०० मिली. पाणी मिसळावे. त्यात अर्धा चमचा सायट्रिक ॲॅसिड घालावे. सर्व एकत्र करून गॅसवर एक उकळी येईपर्यंत ठेवावे. गार झाल्यावर त्यात रंग व इसेन्स घालावा. नंतर हे गाळून बाटलीत भरावे. सरबत देताना पाव भाग तयार केलेले द्रावण आणि पाऊण भाग पाणी किंवा दूध घालून पिण्यास द्यावे.
सुप्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांच्या पद्धतीने बनविलेली शिराळ्याची (दोडके) रुचकर भाजी आज बनवूया. साहित्य : ४ शिराळी, २ बारीक चिरलेले कांदे, २ बारीक चिरलेले टोमॅटो, ३ ते ४ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, ३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरलेली, २ ते ३ चमचे देशी तूप, १ चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, पाव चमचा हिंग, चिमुटभर हळद, आपणास हवे त्या प्रमाणात लाल तिखट, धणे पावडर आणि चवीनुसार मीठ.
कृती : सर्वप्रथम शिराळी स्वच्छ धुवून वरील शिरा काढून घ्या. नंतर त्याचे जरासे मोठे चौकोनी तुकडे करा. आता कढईत देशी तूप घालून गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे, बडीशेप आणि हिंग घाला. जिरे लाल झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण घाला. लसूण थोडा शिजला की हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे आणि चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. कांदा लालसर झाला की त्यात धणेपूड, हळद, लाल तिखट टाका. चांगले मिसळून घ्या. आता मसाल्यांसोबत चिरलेले शिराळे घालून मंद आचेवर शिजवा. कढईवर झाकण ठेऊन एक वाफ काढा. शिराळ्यात पाणी असल्याने भाजीला पाणी सुटते. ते शिजायला लागल्यावर टोमॅटोचे तुकडे घाला. चवीनुसार मीठ घालून झाकून ठेवा. ५ मिनिटांत टोमॅटो आणि शिराळी शिजतील आणि शिराळ्याची भाजी तयार होईल.
उन्हाळ्याचे दिवस आहेत. आहारातही सौम्य पदार्थ असावेत हे वाटणे स्वाभाविक आहे. आज बनवूया दक्षिण भारतात प्रसिद्ध असणारी काकडीची चटणी !
साहित्य : काकडी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, २ हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, २ लसूण पाकळ्या, २ ते ३ चमचे चिंचेचा कोळ, अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा हरभरा डाळ, मीठ चवीनुसार, ओली कोथिंबीर, कढीपत्ता, सुकी लाल मिरची, २ चमचे तेल.
कृती : सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून सोलून घ्यावी. नंतर ती किसून घ्यावी. एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात हिरवी मिरची, उडीद डाळ आणि चणाडाळ घालून भाजून घ्यावी. गॅस बंद करून भांडे थंड होऊ द्यावे. हे भाजलेले समान मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यावे. त्यात जिरे, मीठ आणि लसूण पाकळ्या घालून बारीक वाटण बनवावे. या वाटणामध्ये थोडी किसलेली काकडी आणि चिंचेचा कोळ घालावा. चांगले मिसळून घ्यावे. हे वाटण एका भांड्यात काढून घ्यावे. त्यात उरलेली किसलेली काकडी मिसळावी. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावे. काकडीच्या चटणीला तडका देण्यासाठी भांड्यामध्ये तेल गरम करावे. त्यात जिरे आणि मोहरी टाकावी. ती तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या टाकाव्यात. आता त्यात चिमूटभर हिंग टाकावा. हा तयार तडका चटणीवर घालून चांगले मिसळून घ्यावे. चटणी तयार !
साहित्य : अर्धा किलो रवा, १ लहान चमचा मीठ, अर्धा लहान चमचा मोहरी, १०-१२ कढीपत्त्याची पाने, ३०० ग्रॅम आंबट दही, १ लहान चमचा खाण्याचा सोडा आणि तेल.
कृती : एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि चिरलेला कढीपत्ता व रवा घालावा. थोडासा भाजून गॅस बंद करावा. गार झाल्यावर एका भांड्यात दही घेऊन त्यात रवा भिजवावा. मीठ घालून १ तास झाकून ठेवावा. हे मिश्रण जास्त पातळ असू नये. इडली पात्रांना तेल लावून ठेवावे. एका वाटीत तेल गरम करून त्यात १ लहान चमचा खाण्याचा सोडा घालून गरम करावे. हे रव्याच्या मिश्रणात घालून झटपट ढवळत रहावे. म्हणजे मिश्रण फुलून जाईल. आता हे मिश्रण पात्रामध्ये घालावे आणि नेहमीप्रमाणे इडल्या बनवाव्यात. इडली खोबऱ्याची चटणी आणि सांबारबरोबर वाढावी.
कृती : पालक स्वच्छ धुवून घ्यावा. त्यांनंतर वाफवून घ्यावा. वाफवलेला पालक हाताने फेटून घ्यावा. त्यामध्ये गव्हाचे आणि डाळीचे पीठ मिसळावे. वाटलेली हिरवी मिरची, मीठ, वाटलेला लसूण आणि मिरेपूड घालावी. यानंतर पीठ मळून घ्यावे. पीठ भिजवताना एक चमचा तेल घालावे. हे पीठ एक तास भिजत ठेवावे. त्यानंतर पिठाचे छोटे गोळे करून चपातीप्रमाणे लाटून तव्यावर खरपूस भाजावेत. भाजत असताना कडेने तेल सोडावे. चटणीबरोबर गरम-गरम खायला द्यावेत.
साहित्यः एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी ज्वारीचे किंवा हुरड्याचे पीठ, एक वाटी बाजरीचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, एक वाटी पालक, मेथी, कांद्याची पात यापैकी कोणतीही एक, बारीक चिरलेली पालेभाजी, एक बारीक चिरलेला कांदा, पाऊण लहान चमचा वाटलेले आले आणि लसूण, चवीनुसार वाटलेली हिरवी किंवा लाल मिरची,चवीनुसार मीठ,अर्धा छोटा चमचा ओवा,आवश्यकतेनुसार तेल.
कृती : प्रथम वरील सर्व साहित्य एकत्र करून छान मिसळून घ्यावे. त्यात थोडे तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ 1 तास भिजत ठेवावे. भिजलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे करावेत. पोळपाटावर प्लॅस्टिकचा कागद किंवा ओले फडके घेऊन त्यावर गोळा हाताने थापावा. तव्यावर आवश्यकतेनुसार तेल घालावे. थापलेले थालिपीठ तव्यावर टाकून मंद आचेवर लाल होईपर्यंत खरपूस भाजावे. तयार झालेले थालिपीठ दही, लोणचे किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे.
साहित्य : दीड वाटी गव्हाचे पीठ, पाऊण वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने ,एक छोटा चमचा ओवा, एक छोटा चमचा तीळ ,पाव छोटा चमचा मिरची पावडर ,पाव छोटा चमचा हळदपूड, दोन चमचे तेल, चवीपुरते मीठ.
कृती : चिरलेल्या मेथीच्या पानांमध्ये ओवा, तीळ, तिखट, हळद , तेल आणि मीठ हे साहित्य मेथीची पाने मऊ होईपर्यंत मिसळून घ्या. या मिश्रणामध्ये गव्हाचे पीठ घालून मळून घ्या. यानंतर हे पीठ एक तास भिजवून ठेवा. पिठाचे छोटे गोळे करून ते पातळ लाटा. ते तव्यावर टाकल्यानंतर त्यावर तेल किंवा तूप घाला. मंद ज्वालेवर कापडाने दाब देऊन कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
साहित्य : ताजे दही – दोन ते अडीच कप (500 ग्राम), पावडर साखर – पाव कप, मँगो पल्प – 1 कप, काजू-बदाम – 4, पिस्ता – 5 ते 6, वेलची – 2
कृती : प्रथम दही जाड कापडात बांधून लटकवून ठेवा. दह्याचे सर्व पाणी निथळल्यावर घट्ट झालेले दही एका भांड्यात काढावे. या दह्यात साखर घालून त्याला घोटून श्रीखंड तयार करावे. त्यात मँगो पल्प, सुके मेवे, वेलची घालून फ्रिजमध्ये गार होण्यासाठी ठेवावे.
शाळांना उन्हाळी सुट्टी आहे म्हटल्यावर मुलांना रोज काहीतरी वेगवेगळा सुका खाऊ येता – जाता तोंडात टाकायला हवा असतो. मग अशावेळी नेहमी काय बनवून ठेवणार हा प्रश्न पालकांना भेडसावत असतो. अशावेळी आपण झटपट १५ ते २० मिनिटांत भडंग चिवडा घरच्याघरी बनवू शकतो.
साहित्य 4 मोठ्या वाट्या भडंग चुरमुरे (बाजारात भडंग कुरमुरे विकत मिळतात) फोडणीसाठी 3 चमचे तेल, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट कढीपत्त्यची 15 पानं 3 चमचे मेतकूट 2 चमचे लाल तिखट अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी आमचूर पावडर चवीपुरते मीठ चवीपुरती पिठीसाखर
कृती: १) भडंग कुरमुरे पातेल्यात घ्यावेत. तेल न घालता मध्यम आचेवर परतून घ्यावे. कुरमुरे सारखे ढवळत राहावे. परतून कुरकुरीत झालेले कुरमुरे परातीत काढून ठेवावे. २) त्याच पातेल्यात मंद आचेवर तेल गरम करावे. त्या तेलात शेंगदाणे तळून घ्यावे. थोडे लालसर झालेले शेंगदाणे बाजूला काढून ठेवलेल्या कुरमुऱ्यावर घालावेत. ३) कुरमुरे आणि शेंगदाणे मिक्स करावेत. त्यातच मेतकूट आणि लाल तिखटाचे मिश्रण घालून हलक्या हाताने ढवळून एकत्र करावे. ४) उरलेल्या तेलात फोडणी करावी. त्यात हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालावा. कुरमुरे फोडणीत घालावेत. झाऱ्याने मिक्स करावे. आमचूर पावडर, मीठ आणि साखर घालावे. एकजीव करावे. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे ठेवावे. भडंग चिवडा गार झाला की लगेच हवा बंद डब्यात भरून ठेवावा. भडंग चिवड्याचा रंग लालसर असतो. त्यामुळे लालसर रंग आणण्यासाठी काश्मिरी लाल मिरची पावडर वापरावी. ज्यांना चिवड्यामध्ये लसूण आवडतो त्यांनी फोडणीच्या वेळी फोडणीतच लसूण तळावा.
रिमझिम पावसाची बरसात सुरू असताना चटपटीत, पटकन होणारे गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा कुणाला नाही होणार ? त्यासाठीच तर आज बनवूया ‘ब्रेडचा उपमा’ !
साहित्य : ब्रेडचे तुकडे – ३ कप, मोहरी – २ लहान चमचे, कढीपत्ता – १ मोठा चमचा, आले चिरून – १ लहान चमचा, चिरलेला कांदा – अर्धा कप, चिरलेला लसूण – १ लहान चमचा, हळद – अर्धा लहान चमचा, टोमॅटो चिरून – १ कप, हिरवी मिरची चिरलेली – २ लहान चमचे, मिरची पावडर – १ लहान चमचा, हिरवी कोथिंबीर चिरलेली – २ चमचे, लिंबाचा रस – २ लहान चमचे, तेल – २ चमचे, मीठ – चवीनुसार.
कृती : ब्रेड उपमा बनविण्यासाठी सर्वप्रथम ब्रेडचे तुकडे करावेत. हवे असल्यास ब्रेडच्या चारही बाजू कडा कापून वेगळ्या करू शकता. आता कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडायला लागली की, त्यात कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, आले घालून परतून घ्यावे. कांदे १-२ मिनिटे परतून घेतल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो, मिरची पावडर आणि हळद घालून मिसळून घ्यावे. यानंतर २ लहान चमचे पाणी घालावे. हे मिश्रण २-३ मिनिटे शिजू द्यावे. चवीनुसार मीठ घालावे. आता हे मिश्रण एकजीव करुन घ्यावे. आता त्यात ब्रेडचे तुकडे टाकून चांगले मिसळून मध्यम आचेवर १ मिनिट शिजवावे. यानंतर गॅस बंद करावा. वरुन कोथिंबीर घालावी. चविष्ट ‘ब्रेड उपमा’ तयार आहे. खाण्यासाठी देताना आवडत असल्यास वरुन लिंबाचा रस वापरु शकता.
साहित्य : १ वाटी बेसन, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी लांब चिरलेला कांदा, 2 लहान चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा मिरची पावडर, अर्धा लहान चमचा धणे-जिरेपूड, पाव लहान चमचा हळद, पाव लहान चमचा हिंग, तेल.
कृती : कांदे उभे चिरून घ्यावेत. आता त्यात तांदळाचे पीठ, बेसन आणि मीठ घालून मिसळून घ्यावे. त्यावर एक झाकण ठेवून 30 मिनिटे झाकून ठेवावेत. असे केल्याने कांद्याने सोडलेले पाणी बेसन आणि तांदळाच्या पिठात शोषले जाते. आता बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि सर्व मसाले घालून मिसळून घ्यावे. जर ते खूप कोरडे वाटत असेल, तर 2-3 चमचे पाणी घालावे. पीठ तयार आहे. तेल गरम करत ठेवावे. नंतर त्यात थोडे-थोडे मिश्रण घालून भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावी. आता कांदा भजी तयार आहे. ती गरमागरम चहासोबत खाण्यास द्यावीत.
हा केरळचा प्रसिद्ध पदार्थ आहे. साहित्य : कोहळा – 1 मध्यम (याला केरळमध्ये ‘कुंबलंग’ म्हणतात.), भोपळ्याचे तुकडे – 1 कप, हिरव्या मिरच्या (अर्ध्या कापलेल्या) – 6, नारळाचे दूध – 1 कप, लाल चवळी – शिजवलेली पाव कप (याला केरळमध्ये ‘वान पायर’ म्हणतात.), वालाचे दाणे आवडीनुसार, कढीपत्ता, मीठ, खोबरेल तेल – 3 चमचे.
कृती कढईत शिजवलेली लाल चवळी घ्या. त्यात कोहळा आणि भोपळ्याचे चौकोनी तुकडे घाला. यात वालाचे दाणे आणि हिरव्या मिरच्या घाला. थोडे ढवळून त्यात थोडे पाणी घाला. भांडे झाकून पाच मिनिटांपर्यंत शिजू द्या. झाकण काढा. हळुवार ढवळा. आता मीठ आणि कढीपत्ता घाला. थोडे ढवळा. यात नारळाचे दूध घालून चांगले मिसळा. थोडे तेल घाला. पुन्हा ढवळा. आस्वाद घेण्यासाठी ‘ओलन’ तयार आहे.
कृती : एका कढईत थोडे तेल गरम करा. त्यात खोवलेले खोबरे घालून तांबूस होईपर्यंत परता. आता मेथी घालून परतत रहा. धणे पावडर, लाल तिखट, ठेचलेली मिरी आणि हळद घाला. चांगले परता. लहान कांदे घालून पुन्हा परता. या सगळ्याचे वाटण बनवा आणि बाजूला ठेवा.
दुसरी कढई घेऊन त्यात 2 चमचे तेल गरम करा. यात वांग्याचे तुकडे आणि चिरलेला कांदा घालून चांगले परतून घ्या. भांडे झाकून थोडा वेळ मंद आचेवर ठेवा. आता झाकण काढून थोडे ढवळून घ्या. पुन्हा झाकण ठेवून थोडा वेळ शिजवा. थोड्या वेळाने पुन्हा झाकण काढून चिंचेचे पाणी घाला. सुरुवातीला केलेले वाटण घाला. त्याला उकळी येऊ द्या. यात थोडॆ पाणी घाला. हळूवार ढवळून घ्या. चवीनुसार मीठ घाला. पुन्हा ढवळा. आता या ‘तीयल’ साठी फोडणी तयार करा. थोडे तेल गरम करून त्यात मोहरी, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घाला. ही फोडणी ‘तीयल’ वर घालून गरमागरम वाढा.
साहित्य : अर्धा किलो भेंडी, २ मध्यम आकाराचे कांदे, ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, ४ लसूण पाकळ्या बारीक चिरून, २ चमचे तेल, अर्धा लहान चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ.
कृती भेंडी चांगली धुवून सुती कापडाने पुसून घ्या. आता त्याचे छोटे तुकडे करा. कांदा धुवून सोलून त्याचे जाडसर काप करा. गॅस चालू करा. एका भांड्यात तेल घ्या. तेल गरम झाल्यावर हिरव्या मिरच्या आणि लसूण घाला. थोडे परतून घ्या, नंतर भेंडी घाला. मध्यम आचेवर भेंडी झाकून ठेवा. अधूनमधून ढवळत रहा. भेंडी थोडी परतून झाल्यावर आणि शिजल्यावर त्यात कांदा घालून परता. झाकण ठेवून १ मिनिट शिजवा. गरजेनुसार आच मंद करा. आता त्यात हळद व मीठ टाका. झाकण काढून मध्यम आचेवर भाजून घ्या. भेंडी कुरकुरीत आणि लाल झाल्यावर गॅस बंद करा. ही ‘कांदा वाली भेंडी’ छान चवदार लागते.
पोह्यांसाठी साहित्य : पोहे २ कप, तेल १ मोठा चमचा, मोहरी १ लहान चमचा, जिरे १ लहान चमचा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या १-२, शेंगदाणे पाव कप, कांदा अर्धा कप (उभा चिरलेला), हळद अर्धा लहान चमचा, साखर १ लहान चमचा, मीठ चवीनुसार, उकडलेल्या एका बटाट्याचे मध्यम आकाराचे तुकडे, लिंबाचा रस १ लहान चमचा, कोथिंबीर १ मोठा चमचा.
तर्रीसाठी साहित्य : हरभरा २ कप (भिजवलेलेला), मीठ चवीनुसार, तेल, खोबरे अर्धा कप, कांदे २-३ मध्यम आकाराचे (चिरलेले), टोमॅटो २-३, लसूण ५-६ पाकळ्या, आले १ इंच तुकडा, दालचिनी १ इंच, हिरवी वेलची ३-४, काळी वेलची १-२, लवंग ४-५, काळे मिरे – ४-६, तमालपत्र २-३, आमचूर पावडर – १ लहान चमचा, मोहरी १ लहान चमचा, जिरे १ लहान चमचा, हिंग १ लहान चमचा, हळद अर्धा लहान चमचा, लाल तिखट ४ मोठे चमचे, कोथिंबीर ,जिरा पावडर १ लहान चमचा, काळा मसाला – २ लहान चमचा, मीठ चवीनुसार, पाणी
कृती : सर्वप्रथम तर्री बनवण्यासाठी आदल्या रात्री हरभरा भिजत घाला. दुसऱ्या दिवशी ते चांगले धुवून घ्या आणि कुकरमध्ये ठेवा. आता त्यात चवीपुरते थोडे मीठ आणि पाणी टाकून शिजवा. कुकरच्या २ ते ३ शिट्या करा. कुकर थंड झाल्यानंतर त्यातील हरभरे काढून घ्या. त्याचे पाणी फेकू न देता ते एका बाजूला ठेवा. आता तर्री बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात खोबरे टाकून ते तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात कांदा, आले, लसूण टाका. हे नीट शिजल्यानंतर सर्व खडा मसाला टाका. २ मिनिटे मध्यम आचेवर नीट भाजून घ्या. आता गॅस बंद करून हे थंड होऊ द्या. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेवून बारीक वाटण करा.
आता त्याच पॅनमध्ये अजून अर्धा कप तेल घ्या. तेल गरम करा आणि त्यात जिरे, मोहरी, तमालपत्र आणि हिंग घाला. आता त्यात तयार केलेले वाटण घाला. सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. आता गॅस कमी करा आणि त्यात तिखट, हळद, मीठ घालून छान मिसळून घ्या. मसाल्यातून तेल वेगळे होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता त्यात शिजलेले चणे, ताजी चिरलेली कोथिंबीर घालून २-३ मिनिटे शिजवा. त्यात हरभऱ्याचे पाणी आणि थोडे अजून पाणी घाला. उकळी येईपर्यंत शिजवा. तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. नंतर आमचूर पावडर घाला, मिसळून घ्या, उकळी आणा. मध्यम आचेवर किमान २०-२५ मिनिटे शिजवा. कोथिंबीरीने सजवा.
नेहमीचे कांदे पोहे बनवता तसे कांदे-पोहे बनवा. एका प्लेटमध्ये कांदे पोहे घ्या. त्यावर ही तयार केलेली तर्री टाका. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून सजवा. सोबत लिंबाची फोड देऊन खाण्यास द्या.
चहा हे सर्वांचे आवडते पेय आहे. सकाळ झाली की एक घोटभर चहा घेतल्याशिवाय काही लोकांचा दिवस सुरु होत नाही.
त्यामुळे चहा खूप महत्त्वाचा असतो. मनपसंत चहा असा बनवावा : साहित्य: १ चमचा चहा, २ ग्लास पाणी, अर्धा कप साखर, दीड ग्लास दूध, १ इंच आले, २ वेलच्या, २ लवंग, अर्धा चमचा बडीशेप, एक तुकडा दालचिनी कृती : चहा तयार करण्यासाठी सर्वप्रथम पाण्यात चहापावडर व साखर घालून तो दोन मिनिटे उकळून घ्यावा. त्यात आले, वेलची, लवंग, दालचीनी, बडीशेप घालून चांगली उकळी आणावी. उकळून झाल्यानंतर त्यात दूध घालून पुन्हा एक उकळी काढावी. उकळी काढून झाली का हा चहा गाळणीने गाळून सर्व्ह करावा. अशा प्रकारे घरच्या घरी अगदी कडक चहा तुम्ही तयार करु शकता.
कृती जाड बुडाच्या कढईत तूप गरम करा. आता मूगडाळ तांबुस रंगाची होईपर्यंत भाजा. एका भांड्यात 2 कप पाणी उकळवा. त्यात भाजलेली मूगडाळ घालून शिजवा, डाळ चांगली शिजली पाहिजे. डाळ घट्ट झाली तर पाणी घालून थोडी पातळ करा. शिजलेली डाळ चांगली घोटा. मीठ आणि हळद घालून चांगली मिसळा. खोवलेले खोबरे, जिरे आणि लसणीबरोबर वाटून घ्या. वाटलेले मिश्रण शिजलेल्या डाळीत पाणी घालून मिसळा. आचेवर चढवून काही मिनिटे उकळू द्या जोपर्यंत डाळ एकजीव होत नाही. हे झाले की, डाळ आचेवरून काढा आणि खोबरेल तेल आणि कढीपत्ता घाला. चांगले मिसळा.
संध्याकाळच्या वेळी मुलांना भूक लागते. मुलांना संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत-हलकेफुलके हवे असते. खाण्यातून वेगळाच आनंद मिळत असतो. मुलांना त्यांच्या मोकळ्या वेळेत चिप्स खायला आवडतात; मात्र, बाजारात मिळणारे चिप्स आणि स्नॅक्स अनेकदा आरोग्यासाठी हानिकारक असतात. मुलांबद्दल बोलायचे झाले, तर जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे ते अनेकदा वेष्टनबंद चिप्सची मागणी करतात. बाजारात मिळणाऱ्या चिप्समध्ये ‘प्रिझर्व्हेटिव्ह’ असतात, ज्याचे आरोग्यावर परिणाम होतात.
मुलांच्या चिप्स आणि स्नॅक्स खाण्याच्या सवयीसाठी काही पौष्टिक पर्याय आहेत, याद्वारे आपण मुलांची खाण्याची इच्छा चांगल्या आरोग्यदायी पद्धतीने पूर्ण करू शकता. मुलांना बाजारात मिळणाऱ्या चिप्सपासून दूर ठेवण्यासाठी घरच्या घरी वांग्याच्या चिप्स बनवू शकता. वांगी शक्यतो मुलांना आवडत नाहीत. परंतु, अशा पद्धतीने केलेले चिप्स मुले आवडीन खावू शकतात. हे चिप्स कुरकुरीत व चवीला चांगले असतात. याकरिता सर्वप्रथम वांग्याचे पातळ काप करून बेकिंग ट्रेवर पसरवावेत. या वांग्याच्या कापांवर थोडे ऑलिव्ह ऑइल टाकावे. चवीनुसार मीठ, मिरपूड आणि लाल तिखट भुरभुरावे. आता ते हलके तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत काही मिनिटे बेक करुन मुलांना खायाला द्यावे.
रताळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तसेच, त्याच्या चिप्समध्ये कमी कॅलरी आणि कमी चरबी असते. आपण रताळ्याचे चिप्स बनवू शकता. त्यासाठी प्रथम रताळ्याचे पातळ काप करून घ्यावेत. आता वर मीठ, काळी मिरी, ऑलिव्ह ऑईल, पेपरिका पावडर आणि ओरेगॅनो घालून चांगले लावून घ्यावे. आता त्यांना एअर फ्रायरमध्ये 10-15 मिनिटे शिजवावे.
मूग डाळीचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हे पचायला हलके असून आरोग्यासाठीही चांगले आहे. आपण आहारात मूग डाळ चीप्सच्या रूपात देखील समाविष्ट करू शकता. सर्वप्रथम मूग डाळ किमान दोन तास पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर ग्राइंडरमध्ये बारीक करावी. आता एका वाडग्यात रवा, गव्हाचे पीठ आणि मसुराचे पीठ घ्यावे. सर्व काही चांगले मिसळून त्यात सुकी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, काळी मिरी आणि तिखट घालून मिसळून घ्यावे. हे मिश्रण पिठासारखे मळून त्याचे छोटे गोळे करून लाटून घ्यावे. सुरीने चिप्सच्या आकारात कापून चांगले बेक करावे.
कोजागरी पौर्णिमा, यादिवशी विशेषकरुन आपण घरी मसाला दूध बनवितो. पौर्णिमेच्या पिठूर चांदण्यात ते प्राशन करण्याचा आनंदच वेगळा, नाही का? मसाला दूध बनविण्यासाठी साहित्य : 1 लिटर दूध, 100 ग्रॅम साखर, अर्धा लहान चमचा वेलची पावडर, काजू-बदाम-पिस्त्याचे काप, चारोळी, १ चिमूटभर जायफळ पावडर, 5-6 केशर काड्या.
कृती : सर्वप्रथम एका स्वच्छ भांड्यात दूध घ्या. गॅसच्या मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवा. दुध आटुन अर्धे होईल इथवर आटण्यासाठी गॅसवर ठेवा. मध्ये-मध्ये नीट ढवळत राहा, जेणेकरून ते जळणार नाही. भांड्याला चिकटणार नाही. दूध आटुन कमी झाल्यावर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि साखर घालून मिसळून घ्या. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले काजू, बदाम, पिस्ता, काही चारोळ्या आणि केशरच्या काड्या घालून आणखी पाच मिनिटे उकळा. दूध तयार झाल्यानंतर एका ग्लासमध्ये काढा. काही वेळ चंद्राच्या प्रकाशात ठेवा. त्यानंतर मसाला दुधाचा आस्वाद घ्या.