कोका अभयारण्य

निसर्ग पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी अभयारण्य हे उत्तम प्रेक्षणीय स्थळ ठरते. येथे वनस्पतीबरोबरच प्राणी, पक्ष्यांचे दर्शन होते. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात ‘न्यू नागझिरा’, ‘उमरेड कऱ्हाड’ आणि ‘कोका’ अशी 3 अभयारण्ये आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या ‘न्यू नागझिरा’ अभयारण्याला लागूनच ‘कोका अभयारण्य’ घोषित करण्यात आले.

डिसेंबर 2013 पासून या अभयारण्याच्या विकासाकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली. या क्षेत्रात 25 नैसर्गिक पाणवठे असून ज्याठिकाणी पाणी उपलब्ध नाही, त्याठिकाणी विंधन विहिरी बांधण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंटच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. सौरऊर्जेवर चालणारे पंप या टाक्यांवर बसविण्यात आले आहेत.

हे अभयारण्य म्हणजे वन्यजीवांसाठी उत्कृष्ट अधिवास आहे. त्यामुळेच या जंगलाला वन्य प्राण्यांसाठी ‘संरक्षित’ केले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, काळवीट, नीलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुकर इत्यादी प्राणी आहेत. त्याचबरोबर येथे अनेक पक्ष्यांचा अधिवास आहे. समृद्ध जैवविविधतेने हे जंगल श्रीमंत झाले आहे.

या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूरमध्ये प्रवेशद्वार आहे. पर्यटकांना जंगलसफर करता यावी यासाठी 5-7 गाड्या सोडण्यात येतात. गावातीलच मुलांना मार्गदर्शकाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या अभयारण्यात वन्य प्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळेच पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वळला आहे.

नागपूर-भंडारा हे 65 कि.मी. अंतर असून भंडाऱ्याहून चंद्रपूर हे प्रवेशद्वार 19 कि.मी. आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून वाहनांची व्यवस्था आहे. स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते. पर्यटकांना जंगल सफारीकरिता सकाळी 5 ते 9.30 आणि दुपारी 3 ते 6.45 या कालावधीत जाता येते. एकावेळी 5 ते 7 गाड्या सोडण्यात येतात.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
659 वेळा पाहिलं