
शिवडीचा किल्ला हा मुंबई शहरातील चांगल्या स्थितीत असलेला किल्ला आहे. हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकाच्या पूर्वेला 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर हा किल्ला आहे.
बहादूरखानाने त्याच्या ताब्यात असताना शिवडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधला. सन १५३४ च्या तहात हा किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात गेल्यावर त्यांनी या किल्ल्याची डागडुजी केली. सन १६७२ साली जंजिऱ्याच्या सिद्दीकडून मुंबईवर हल्ले झाले. त्यानंतर इंग्रजांनी अनेक नवीन किल्ले बांधून जुने किल्ले मजबूत केले. शिवडी किल्ल्याची दुरुस्ती इंग्रजांनी सन १६८० मध्ये पूर्ण केली.
सन 2007-2008 मध्ये किल्ल्याचे नुतनीकरण पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय खात्याने केले. या किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. येथून आपण सय्यद जलाल शहा यांच्या दर्ग्याजवळ येतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराने आत गेल्यावर अर्धवर्तुळाकार छताच्या 2 लांबलचक इमारती दिसतात. किल्ल्याच्या चारही बाजूंना असणारी तटबंदी अजून शाबूत आहे. येथे त्रिकोणाकृती बुरुज येथे पहायला मिळतात.
या किल्ल्याचे स्वरुप पाहता बाहेरच्या बाजूस एक तटबंदी, आत आणखी एक तटबंदी असे आहे. किल्ल्याची सीमा भिंत जाड असून पूर्णपणे दगडात बांधलेली आहे. किल्ल्याच्या दक्षिणआणि उत्तरेकडे 2 दरवाजे आहेत. आता फक्त दरवाजांचे आकार शिल्लक आहेत.
हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकापासून पूर्वेला पूर्व द्रुतगती मार्गाच्या खालून एक रस्ता आहे. या रस्त्याने सरळ गेल्यावर काही मिनिटातच हजरत अली बाबांचा दर्गा लागतो. या दर्ग्याच्या लगतच या किल्ल्याचे द्वार आहे. शिवडी किल्ल्यालगतच्या समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी हिवाळ्यात सैबेरियातून हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येत येतात. फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन पर्यटकांना येथे घेता येते. चांगल्या अवस्थेत असलेला किल्ला आणि दरवर्षी येणारे फ्लेमिंगो पक्षी यामुळे या किल्ल्यावर पर्यटक आवर्जून जातात.