माहिमचा किल्ला

मुंबईत माहिमच्या खाडीजवळ माहिमचा किल्ला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी असून उत्तरेला वांद्रे आहे. सभोवतालच्या झोपडपट्ट्या व सततच्या अतिक्रमणामु़ळे हा किल्ला सध्या सुस्थितीत नाही.

पोर्तुगीज अधिकारी दे मोनो याने माहीमच्या खाडीत प्रवेश करून माहीमचा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातचा अली शाह आणि पोर्तुगीजांमध्ये खूप चकमकी झाल्या. पोर्तुगीजानी राजकन्येच्या लग्नात हुंडा म्हणून इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला हा किल्ला दिला. शत्रूच्या आक्रमणापासून संरक्षणासाठी हा किल्ला ताब्यात असणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

माहिमचा किल्ला पाहण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘माहिम’ रेल्वे स्थानकावर उतरून टॅक्सी किंवा बसने माहीम समुद्रकिनाऱ्यावर पोहोचता येते. स्वतःची गाडी असेल तर थेट जाता येते. माहीम समुद्रकिनाऱ्याच्या मुखाशी भक्कम तटबंदी असलेला हा किल्ला आजही उभा आहे. प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्यासाठी माहीम-कोळीवाड्यातील छोट्या गल्ल्यांमधून वाट काढत जावे लागते.

मुंबईतील प्रसिद्ध ‘मिठी’ नदीच्या तीरावर हा किल्ला आहे. किल्ल्यावरून माहीम खाडी, अथांग पसरलेला अरबी समुद्र दिसतो. मागच्या बाजूला मकदूमबाबाचा दर्गा आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूचे दर्शन होते. अलीकडे लोकवस्तीतून किल्ल्याचे अस्तित्व शोधून काढणे नवीन लोकांसाठी खूप जिकिरीचे काम आहे.

माहीतगार व्यक्ती सोबत असल्यास दोन एकरवर पसरलेल्या या किल्ल्यावरील तटबंदीवर तोफा ठेवण्यासाठी असणाऱ्या खाचा, दिवे लावण्याची सोय, युरोपियन पद्धतीचे स्तंभ, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी असणारी व्यवस्था, सैनिकांची निवासस्थाने, छोटेखानी धान्यकोठार, पाण्याची विहीर इत्यादींचे अवशेष शोधून पाहता येऊ शकतात. येथे कोळी-आगरी लोकांची वस्ती आहे. आजही हे ऐतिहासिक ठिकाण दुर्लक्षित आहे. अतिक्रमणामुळे किल्ल्याची रया पार गेली आहे.

मुंबईच्या खुल्या समुद्रावर असलेला हा पहिला किल्ला होय. एके काळी लष्करीदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणावर असणारा हा किल्ला मुंबईतील समुद्रीमार्गाचा संरक्षक शिलेदार समजला जाई. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या या वास्तूला आवर्जून भेट द्यायला हवी.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
774 वेळा पाहिलं