निसर्गसुंदर गुलाब
गुलाब हे वर्षभर मागणी असलेले एक सुंदर फुल आहे. युरोपात तर गुलाब विशेष लोकप्रिय आहे. जगभरात होणाऱ्या फुलांच्या उलाढालीत एकट्या गुलाबाचा वाटा हा ३५ ते ४० टक्के आहे. गुलाबाच्या जवळपास २० हजारहून अधिक जाती आहेत. गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रमात गुलाबास मोठा मान असतो. याशिवाय गुलाबावर प्रक्रिया करून केलेल्या पदार्थानाही मोठी मागणी आहे. गुलकंद, अत्तर,गुलाबजल यासाठी देखील गुलाबाच्या फुलांना मागणी असते.
भारतातही गुलाबाची लागवड केली जाते. गुलाबाच्या लागवडीसाठी अतिपाऊस झाला तरी पाण्याचा निचरा होईल अशा प्रकारची मध्यम पोताची जमीन असावी. अति भारी किंवा अति हलकी जमीन यासाठी उपयोगाची नाही.. गुलाब झुडूपवर्गीय रोप असून साधारणतः ५ ते ६ वर्ष या रोपाचे आयुष्य आहे. बाराही महिने फुले येणारे हे रोप असल्याने पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे केव्हाही त्याची लागवड करू शकता. सुगंधित, टपोरी व दर्जेदार फुलांचे उत्पादन देणारी गुलाबाची जात निवडावी. लागवडीनंतर मशागतीवर काळजीपूर्वक लक्ष द्यावे. जमीन तणमुक्त ठेवावी.कलमांची चांगली वाढ होण्यासाठी झाडाला पहिल्या येणाऱ्या कळ्या खुडाव्यात. योग्य वेळी गरजेनुसार पाणी द्यावे. पावसाळ्यात गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्याने मुळे कुजतात. नवीन फांद्या येण्यासाठी वेळोवेळी छाटणी करावी.
गुलाबाची शेती करायची झाल्यास सर्वप्रथम जमीन चांगल्या पद्धतीने नांगरून घ्यावी. नांगरणी झाल्यावर उन्हामध्ये जमीन चांगली तापू द्यावी. त्यानंतर लागवडीसाठी खड्डे काढून ते माती व खताने भरावेत. सेंद्रिय खते, शेणखत यांचा वापर करावा. कृषी सहाय्यकांकडून मार्गदर्शन घ्यावे.
निसर्गसुंदर गुलाब पाहताक्षणीच मनात भरते. या गुलाबाची शेती तर फारच मनोहर दिसते.