
पुण्यातील ‘दि पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी’ आता पुणे नगर वाचन मंदिर म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही नावाजलेली संस्था आहे. समाजात साक्षरता निर्माण करण्यासाठी, लोकांचे प्रबोधन करण्यासाठी या ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. या ग्रंथालयाच्या स्थापनेत महादेव रानडे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, कृष्णशास्त्री चिपळूणकर, आदींनी बरेच परीश्रम घेतले. ७ फेब्रुवारी, १८४८ ला या वाचन मंदिराची स्थापना झाली.
या ग्रंथालयाची स्थापना म्हणजे ब्रिटीशांच्या काळात येथील जनतेला इंग्रजीचे शिक्षण देण्यासाठी जे प्रयत्न होत होते, तोच एक प्रयत्न होता. पाषाण, बिबवेवाडी, वारजे, कर्वे रोड, सिंहगड रोड, गणंजय सोसायटी, आयडियल सोसायटी इत्यादी ठिकाणी ग्रंथालयाच्या शाखा आहेत. पुणे नगर वाचन मंदिर ही संस्था दर वर्षी काही साहित्यिकांना श्री. ज. जोशी, श्री. ना. बनहट्टी आदींच्या नावाचे पुरस्कार देते.
या ग्रंथालयात सुमारे पन्नास हजार पुस्तके असून तीन हजारहून अधिक नोंदणीकृत सदस्य आहेत. पुणे नगर वाचन मंदिरातील ग्रंथांनी अनेक विद्वानांची वाचनाची भूक भागविली आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासात या पुणे नगर वाचन मंदिराचे उल्लेखनीय योगदान आहे.