पुण्याच्या लेकीची यशाला गवसणी

पुण्यामधील इंदापूर तालुक्यातील वडापुरीची सिमरन ब्रम्हदेव थोरात देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर झाली आहे. वडापुरी येथे एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. सिमरनने आतापर्यंत २० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवास करून आपल्या कामाची छाप पाडली आहे. आपल्या या यशाचे श्रेय ती वडील ब्रह्मदेव, आई आशा आणि भाऊ शुभम यांना देते. कुटुंबाने तीन एकर जमीन विकून सिमरनच्या स्वप्नांना बळ दिले.

इंदापूरमधील श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये बारावी झाल्यावर प्रवेश परीक्षा देऊन ती पुण्यातील ‘महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग’मध्ये गेली. सन २०१९ मध्ये तिची महाविद्यालयामधूनच व्हँकुव्हर-कॅनडा येथील ‘सिस्पन शिप मॅनेजमेंट’ या कंपनीत निवड झाली.

तिने ‘बीएसस्सी नॉटिकल सायन्स’ ही पदवी घेतली. या कंपनीमध्ये अनेक देशातील मुली उच्च पदावर होत्या. मात्र, भारतातून निवड होणारी सिमरन पहिलीच मुलगी होती. त्यानंतर पुढील परीक्षा देऊन तिने परवाना मिळविला. ‘असे आई-वडील लाभणे म्हणजे भाग्य आहे. सर्वांनाच असे आई-वडील मिळाले, तर कोणीही अशिक्षित राहणार नाही,’ असे सिमरन सांगते.