
हॉलिवूडमध्ये नेहमीच काही चित्रपट असे निर्माण होतात जे फक्त पाहायचे नसतात तर अनुभवायचे असतात. ‘बगोनिया’ हा असाच एक विलक्षण आणि विचार करायला लावणारा चित्रपट आहेजो वास्तव आणि कल्पनारंजन यांच्या सीमारेषा पूर्णपणे पुसून टाकतो. हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला असून सर्वप्रथम व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध आणि प्रतिभावान दिग्दर्शक यॉर्गोस लॅंथिमॉस यांनी केले आहे तर प्रमुख भूमिकांमध्ये एम्मा स्टोन आणि जेसी प्लेमन्स यांनी अप्रतिम अभिनय साकारला आहे.
‘बगोनिया’ ही कथा आहे दोन संशयग्रस्त आणि कट-थिअरींवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींची आहे. त्यांना असं वाटतं की एका मोठ्या कंपनीची सीईओ ही मुळात मानव नसून एक परग्रही म्हणजेच एलियन आहे जी पृथ्वी नष्ट करण्याच्या मिशनवर आली आहे. या विचित्र आणि धाडसी कल्पनेवर ते अपहरणाची योजना आखतात पण कथा जसजशी पुढे सरकते तसतसे वास्तव आणि भ्रम यांच्या सीमारेषा धूसर होऊ लागतात. प्रेक्षकांच्या मनात सतत प्रश्न निर्माण होतो की नेमकं खरे कोण आणि वेडे कोण?
चित्रपटाची दृश्यरचना प्रकाशयोजना आणि प्रत्येक फ्रेममधील तपशील अप्रतिम आहेत. रंगसंगती आणि पार्श्वसंगीत एकत्र येऊन प्रत्येक दृश्याला जणू स्वप्नवत रूप देतात. एम्मा स्टोनने साकारलेली नायिका आपल्या भावनांच्या आणि संभ्रमाच्या अवस्थेत प्रेक्षकांना पूर्णपणे गुंतवून ठेवते तर जेसी प्लेमन्सने साकारलेले पात्र आपल्या अंतर्मनातील भीती, असुरक्षितता आणि जिज्ञासा या सर्व भावनांचा प्रभावी संगम सादर करते.
‘बगोनिया’ हा केवळ मनोरंजनासाठी बनवलेला चित्रपट नाही, तर तो प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो की आपण पाहतो तेच खरं असतं का? की आपल्या कल्पना, भीती आणि विश्वास मिळून आपणच वास्तव निर्माण करतो? दिग्दर्शकाने या प्रश्नांभोवती विचार करायला भाग पाडणारा असा सिनेमा तयार केला आहे.
‘बगोनिया’ पाहणं म्हणजे आपल्या मनाच्या कोपऱ्यांत खोलवर डोकावण्यासारखं आहे जिथं कल्पना आणि वास्तव एकत्र येऊन नवा अर्थ, नवं तत्त्वज्ञान आणि नवी जाणीव निर्माण करतात. हा चित्रपट केवळ पाहण्याचा नाही तर अंतर्मनात अनुभवण्याचा आहे. जगभरातील प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही या चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे. तर गुगलवर ५ पैकी ४ गुण देण्यात आले आहेत. अनेकांनी त्याला ‘आधुनिक विज्ञान आणि काल्पनिक सिनेमाचा नवा अध्याय’ असेही म्हटले आहे.