कानातील कृत्रिम दागिने निर्मिती
कृत्रिम कर्णफुलांच्या म्हणजेच कानातील दागिन्यांची निर्मिती हा अलंकार उद्योगातील वेगाने वाढणारा व्यवसाय मानला जातो. कमी खर्चात आकर्षक आणि फॅशननुसार बदलणारे दागिने तयार करता येत असल्यामुळे या उद्योगाला मोठी मागणी आहे. विशेषतः तरुणांमध्ये आणि महिलांमध्ये विविध प्रकारच्या कानातील कृत्रिम दागिन्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे लघुउद्योग आणि घरगुती उद्योग म्हणूनही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो.
कानातील कृत्रिम दागिन्यांमध्ये झुमके, टॉप्स, लांब कानातले, वलयाकृती कानातले, स्टड्स आणि विविध डिझायनर प्रकार लोकप्रिय आहेत. सण, लग्नसमारंभ आणि दैनंदिन वापरासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार केले जातात. बदलत्या फॅशननुसार सतत नवे नमुने तयार केल्यामुळे या उद्योगाची बाजारपेठ कायम सक्रिय राहते.
हा उद्योग लघु व कुटीर उद्योग म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर चालवला जातो. कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि महिलांसाठी रोजगार निर्माण करणारा हा व्यवसाय मानला जातो. यासाठी कृत्रिम मोती, रंगीत मणी, पितळ किंवा इतर हलकी धातू, प्लास्टिक किंवा राळ, कानातल्यांचे हुक, पिन, वलये, सजावटीचे दगड, गोंद व रंग या कच्च्या मालाची आवश्यकता आहे.
यासोबतच तार वाकवण्यासाठी लहान प्लायर, कटर, साचा किंवा डिझाइन बनविण्याची साधने, फाइल किंवा घासणी, पॉलिश करण्याची साधने यांचीही गरज लागेल. हा व्यवसाय ज्या जागेत करायचा आहे ती जागा स्वच्छ आणि प्रकाशमान असावी. तिथे टेबल, खुर्ची आणि साहित्य ठेवण्यासाठी कपाट किंवा डबे असावेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त भांडवल लागत नाही. कच्चा माल, साधने आणि पॅकिंगसाठी सुरुवातीला काही हजार रुपयांचे भांडवल पुरेसे ठरते. या दागिन्यांची विक्री स्थानिक बाजारपेठ, दागिन्यांची दुकाने, प्रदर्शन या ठिकाणी करता येते. समाज माध्यमांवर याविषयी पोस्ट टाकता येते. शिवाय ऑनलाइन विक्री करता येते. अशाप्रकारे कानातील कृत्रिम दागिन्यांच्या निर्मिती उद्योगाला चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत.