
नोकरी करणाऱ्या महिलांसमोर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखणे हे एक मोठे आव्हान असू शकते. कार्यालयीन कामकाज आणि घरच्या जबाबदाऱ्या त्यांना पेलाव्या लागतात. कधी-कधी या दोन्ही गोष्टी चिडचिड, राग आणि तणावाचे कारण बनतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. यातून बाहेर पडण्यासाठी करिअर किंवा कुटुंब यापैकी एक निवडणे हाच पर्याय उरतो. थोडीशी समज दाखवून आपण आपल्या दोन्ही जीवनात योग्य संतुलन राखू शकता. नोकरदार महिलांनी कार्यालयामध्ये कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी त्यासाठी स्वत:च्या हक्काच्या सुट्टीचा त्याग करू नये. शरीर आणि मनाला आराम देण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोन दिवस सुट्टी घेणे खूप महत्वाचे आहे. आठवड्याची सुट्टी आपणास येत्या आठवड्यासाठी उत्साही ठेवण्यास मदत करते. सुट्टीच्या दिवशी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले वाटते. त्यामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते.व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्यासाठी दोन्ही ठिकाणी योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.
कार्यालयाचे काम कधीही घरी नेऊ नका, किंवा कार्यालयामध्ये घरातील काम संपविण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तुम्हाला कोणतेही काम नीट करता येत नाही. घरातील कामापासून ते कार्यालयाच्या कामापर्यंत सर्व काही वेळेत पूर्ण करण्यासाठी योजना तयार करुन त्याचे पालन करा. ताजेतवाने राहून तणाव कमी करण्यासाठी कुटुंब आणि मित्रांशी बोला. एखादी गोष्ट आपणांस खूप त्रास देत असेल तर ती जवळच्या लोकांना सांगण्यात काही गैर नाही. कार्यालयाशी संबंधित काही समस्या असल्यास, व्यवस्थापन किंवा मालकांशी चर्चा करा. ताणतणाव घेणे हे सामान्य आहे, परंतु तो जास्त काळ पेलणे योग्य नाही. आर्थिक चणचण आणि घरगुती जबाबदाऱ्या यामुळे आरोग्याशी तडजोड करू नका, याचा तुमच्या जीवनावरही परिणाम होऊ शकतो.
दोन्ही जीवनात योग्य संतुलन राखण्यात व्यायाम आणि ध्यान यांचाही मोठा वाटा आहे. यामुळे मन शांत राहून तुमची उत्पादकता वाढते. याशिवाय तुम्ही तंदुरुस्त राहता. निरोगी शरीरही आपला आत्मविश्वास वाढविण्याचे काम करते. अनेकवेळा आपल्या समाजातील लोकही नोकरदार महिलांबद्दल चुकीचे गृहितक बांधतात की, त्या घरच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात आणि फक्त त्यांच्या करिअरचा विचार करतात, पण हे पूर्णपणे खरे नाही. ज्या महिलांना एकाच वेळी कुटुंब आणि करिअरच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात, त्यांचा उद्देश स्वावलंबी बनणे हा असतो. कुटुंबाला आर्थिक आधार देणे आणि स्वत:सह इतरांनाही चांगले आणि आरामदायी जीवन देणे हा असतो.