
छत्रपती संभाजीनगर शहरात सोनेरी महाल ही एक देखणी व ऐतिहासिक वास्तू आहे. ही वास्तू सातमाळा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. येथून जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. सोनेरी महाल हे राजपूत व मुघल यांच्या संमिश्र स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
सोनेरी महालाच्या परिसरात झाडे, कुरणे आणि शेत आहे. या महालाच्या तळमजल्यावर दरबार महाल असून त्यातील चित्रे खऱ्या सोन्याच्या पाण्याने रंगवलेली आहेत. म्हणनच या वास्तूला ‘सोनेरी महाल’ म्हणतात.
या महालातील हाथीखान्याचे बांधकाम भव्य व आयताकृती असून त्यात निमुळत्या कमानी आहेत. याच हाथीखान्यातून मुख्य महालाकडे एक मार्ग जातो. या मार्गाच्या दोन्ही बाजूस बाग आहे. या रस्त्याच्या मधोमध लंबाकार जलाशय आहे. सोनेरी महालाची वास्तू आयताकृती आणि दुमजली आहे. उंच चौथऱ्यावर आहे. खालच्या मजल्यावर चार अन्य खोल्या आहेत. खालच्या मजल्यावरून वर जाण्यासाठी दक्षिणोत्तर भागात जिने आहेत. सर्वात वर गच्ची असून त्यावर टेहळणीचा मनोरा आहे. इमारतीस नक्षीदार कमानी आहेत. वास्तूच्या दुसऱ्या मजल्यावर सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन, औरंगाबाद याचे कार्यालय आहे.
ही वास्तू दगड, लाखोरी विटा व चुन्यातील आहे. ही वास्तु महाराष्ट्र शासनाचे राज्यसंरक्षित स्मारक आहे. मुघल चित्रांमध्ये वनस्पती वास्तुशास्त्राचा अभ्यास उत्कृष्टरीत्या केलेला दिसतो. वास्तूव्या पूर्वेकडे असलेले कोनाडे पारंपरिक फुलझाडे आणि फुलदाण्यांनी सुशोभित केले आहेत. चित्रांमध्ये तपकीरी लाल, निळा, हिरवा, जांभळा, पांढरा व सोनेरी अशा भडक रंगांचा वापर केलेला दिसतो. वास्तूच्या पहिल्या मजल्यावर प्रादेशिक वस्तुसंग्रहालय सन १९७९ साली स्थापन करण्यात आले. या वस्तुसंग्रहालयात पुरातन कलावस्तूंचा संग्रह आहे.. हे संग्रहालय सोमवार व्यतिरिक्त आठवड्याच्या अन्य दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले असते.