
वाढत्या वयाबरोबर त्वचा सैल होण्याची आणि सुरकुत्या पडण्याची समस्या उद्भवू शकते. याचे कारण आपल्या शरीरात कोलेजनची कमतरता आहे. कोलेजन हे एक प्रकारचे प्रथिन आहे. ते त्वचा व स्नायू मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्वचेवरील सुरकुत्या सौंदर्य कमी करतात. त्यामुळे तुकतुकीत त्वचेसाठी, अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी याबाबत दक्ष असायला हवे. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, कोलेजन हे ‘प्रोलाइन’, ‘ग्लाइसिन’ आणि ‘हायड्रॉक्सीप्रोलीन’ या अमिनो अॅसिडपासून बनवले जाते.
शरीरातील एकूण प्रथिनांपैकी 30 टक्के प्रथिनांमध्ये हे असते. ते शरीराला आधार आणि ताकद देण्यास मदत करते. त्वचेसाठी कोलेजन खूप महत्वाचे आहे. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकणे, त्याठिकाणी नवीन पेशी आणणे, नवीन पेशी तयार करणे तसेच त्वचेला लवचिकता देण्यास मदत करते. जसजसे वय वाढते तसतसे आपले शरीर कमी कोलेजन तयार करू लागते. त्यामुळे सुरकुत्या पडणे, डोळ्यांजवळ खड्डे पडणे, त्वचा सैल होणे आदी समस्या दिसू लागतात. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर लोक त्यांच्या त्वचेची काळजी घेऊन आहारात अशा गोष्टींचा समावेश करू लागतात. ज्यामुळे कोलेजन तयार होण्यास मदत होते.
वृद्धत्व हे कोलेजन कमी होण्याचे एक कारण असले तरी काही वेळा आपल्या जीवनशैलीशी संबंधित काही सवयींमुळेही कोलेजन कमी होऊ लागते. त्यामुळे त्या सवयी जाणून घेऊन त्या सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे बरेच नुकसान होते, ज्यामध्ये अकाली वृद्धत्व देखील समाविष्ट आहे. अतिनील किरणांमुळे कोलेजन कमी तयार होते. ऑक्सिडेशनमुळे ते लवकर तुटतात. त्यामुळे सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. धूम्रपान केल्याने कोलेजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्वचेपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. त्वचेचे खूप नुकसान होते. धुम्रपानामुळे शरीरावर सुरकुत्या आणि बारीक रेषा लवकर दिसू लागतात. त्यामुळे धूम्रपान करू नका, आणि निष्क्रिय धुरापासून दूर रहा.
आहारात साखर, मीठ किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात घेतल्याने कोलेजनचे नुकसान होते. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये शर्करा असते, जी प्रथिनांशी प्रतिक्रिया देऊन शरीरात अशी उत्पादने तयार करतात, जी कोलेजनसाठी हानिकारक असतात. त्यामुळे प्रक्रिया केलेले आणि जास्त साखरेचे पदार्थ आहारात समाविष्ट करू नका.शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेच्या पेशी पुन्हा निर्माण होऊ शकत नाहीत. ज्यामुळे कोलेजन खराब होते. त्यामुळे रोज ७-८ ग्लास पाणी प्यावे .