मजबूत केसांसाठी

मजबूत आणि निरोगी केस सर्वांनाच हवे असतात. अलिकडच्या काळात जीवनशैलीतील बदलांमुळे महिला तसेच पुरुष सर्वांनाच केसांशी संबंधित समस्या भेडसावू लागल्या आहेत. हिवाळ्यात तर केस गळणे, केसांचा रुक्षपणा आणि केसातील कोंडा यासारख्या समस्या सामान्य असतात. शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेचा थेट परिणाम आपल्या केसांच्या आरोग्यावर होतो. आहारात असे खाद्यपदार्थ असावेत जे अप्रत्यक्षपणे केसांची वाढ करण्यास कारणीभूत ठरतील. त्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास चे केस गळणे कमी होऊन केसांची वाढही होईल. भाजीपाला खाणे हा उत्तम उपाय आहे. हिरव्या पालेभाज्या तर अनेक पोषकतत्वांची कमतरता भरून काढतात, केसगळती रोखण्यासाठी त्या बऱ्याच प्रमाणात प्रभावी आहेत. यामध्ये आयर्न, बीटा कॅरोटीन, जीवनसत्व ‘सी’ आणि फोलेट असते. ते केस मजबूत बनवण्यास मदत करतात. याशिवाय, या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व ‘ए’ देखील आढळते. त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते.

आवळा हा केस गळतीमध्ये जीवनसत्व ‘सी’ची कमतरता भरुन काढतो. आवळ्यामध्ये हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते. आवळा खाणे, आवळा रस पिणे यासोबतच त्याचा रस थेट टाळूवरही लावू शकता. आवळा नुसता सेवन जरी केला, तरी केसांसाठी तो टॉनिकपेक्षा कमी नाही, हे लक्षात घ्या. आवळा आपण मुरंबा, कँडी किंवा चटणीच्या रूपातही सेवन करु शकता. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे मेथी दाणे केसांचे आरोग्य सुधारतात. या दाण्यांच्या सेवनाबरोबरच आपण ते भिजवून त्याची पेसट केसांनाही लावू शकता. यासाठी १-२ चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवावेत. सकाळी बारीक वाटून केसांच्या मुळांना लावावेत. 1 तासानंतर केस धुवावेत. आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावल्याने केस गळणे थांबते. असे केल्याने टाळूला आणि केसांना पोषण मिळते. जीवनसत्व ‘सी’, जीवनसत्व ‘ए’, कॅल्शियम, पोटॅशियम यासह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा मुबलक स्त्रोत असलेले पदार्थ खाल्ल्याने केसांच्या समस्या कमी होतात.






16,023 वेळा पाहिलं