
देशभरात सध्या फक्त श्रीरामांचीच चर्चा होत आहे. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला भगवान श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. सगळी भारतीय जनता या संधीची आतुरतेने वाट पाहत आहे. महिलांमध्ये तर वेगळीच क्रेझ दिसून येत आहे. अयोध्येचा सोहळा साजरा करताना स्वत: राममय होण्यासाठी त्या रामाचे नाव, मंदिराचे व रामाचे छायाचित्र असणाऱ्या साड्या खरेदी करताना दिसत आहेत. विविध प्रकारच्या आकर्षक साड्या बाजारात आल्या असून या साड्या परिधान करुन नटूनथटून या सोहळ्याचा आनंद घेण्याचा त्यांचा मानस दिसत आहे. अशी वस्त्रे परिधान करुन रामभक्त आपले सौंदर्य अधिक खुलवणार आहेत, हे विशेष !
समाजमाध्यमांवरच नव्हे तर बाजारातही लोकांचा उत्साह पहायला मिळत आहे. सध्या रामभक्तांना राम नाम असलेले शर्ट-टीशर्ट आणि साडी खरेदी करण्याची आस लागली आहे. हे कपडे बाजारात भरमसाठ दराने विकले जात आहेत. यावरून आपण रामभक्तांच्या उत्साहाची कल्पना करू शकतो. महिलांमध्ये अशा साड्या खरेदी करण्याची क्रेझ आहे. जे अयोध्येला जाऊ शकत नाहीत त्यांना त्यांच्या घरीच श्रीरामाचे स्वागत करायचे आहे. लोकांना रामनामात स्वतःला हरवून घ्यायचे आहे. लोक स्वत:च्या कपड्यांवर रामाचे नाव आणि चित्र छापून ते परिधान करणार आहेत.
श्रीराम, अयोध्या मंदिर आणि त्यावर रामाचे नाव असलेल्या कपड्यांची खरेदी वाढलेली दिसत आहे. महत्त्वाचा सोहळा अधिक खास बनविण्यासाठी महिला रामजींचे चित्र आणि मंदिर असलेल्या साड्या खरेदी करीत आहेत, जेणेकरून प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्या परिधान करतील. सध्या या साड्यांची क्रेझ एवढी आहे की, या साड्यांची खास दुकाने थाटून विक्री केली जात आहे. पुरुषांमध्येही तोच उत्साह पहायला मिळत आहे. त्यांनाही त्यांच्या कपड्यांवर रामाचे नाव लिहिलेले पहायचे आहे. त्यामुळे ‘राम’ नावाचे शर्ट बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.