
डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, डोळ्यांना सूज येणे हे अलीकडे सर्वसामान्य झाले आहे. केवळ जागरणांमुळेच अशी समस्या उद्भवते, असे नाही. तर बदलत्या जीवनशैलीचेदेखील हे परिणाम आहेत. फोन आणि लॅपटॉपचा सतत वापर करणे, याबरोबरच शरीरातील पोषणाची कमतरता यामुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. डोळे थकलेले दिसतात. काही वेळा डोळ्यांतून पाणीही येत राहते. जेव्हा बाहेर कुठे जावे लागते, तेव्हा मनात न्यूनगंड निर्माण होतो. यावर काही घरगुती उपाय आहेत. त्यांचा अवलंब केल्यास फायदा होऊ शकतो. मात्र, हे उपाय करण्यापूर्वी आपल्या ब्युटीशियनचा सल्ला घ्यावा.
डोळ्यांच्या या समस्या दूर करण्यासाठी बटाटा हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. बटाट्यामध्ये असणारे तुरट घटक डोळ्यांचा थकवा दूर करतात. त्यांना आराम देतात. बटाट्यामध्ये सौम्य ब्लीचिंग गुणधर्म देखील असतात. त्यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या दूर होते. त्याकरिता बटाटे किसून घ्यावेत एका सुती कपड्यात ठेवून त्याची पुरचुंडी बनवावी. ही पुरचुंडी किमान 15 मिनिटे डोळ्यांवर ठेवावी. हिरव्या चहाच्या पिशव्या (ग्रीन टी बॅग) मुळे काळ्या वर्तुळांसह सूज येण्याची समस्याही दूर होते. यासाठी या चहाच्या पिशव्या हलक्या पाण्यात बुडवून थंड होण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवाव्यात. त्यानंतर 10-15 मिनिटे डोळ्यांखाली ठेवाव्यात. त्याच्या थंडपणामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो.
गुलाबपाण्यामध्ये जीवनसत्व सी, जीवनसत्व ए आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. यामुळे खाज आणि जळजळ होण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी कापूस गुलाबपाण्यात भिजवून काही वेळ डोळ्यांवर ठेवावा. यानेही डोळ्यांना आराम मिळतो. थंड दुधानेही आपण डोळ्यांना आराम देऊ शकता. दुधामध्ये असणारे दोन घटक डोळ्यांशी संबंधित समस्यांवर प्रभावी आहेत. त्यातील लॅक्टिक ॲसिड थकवा दूर करते. दुसरे अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सुरकुत्या कमी करते. यासाठी फक्त एक कापसाचा गोळा थंड दुधात बुडवून डोळ्यांखाली 10-15 मिनिटांसाठी ठेवावा.