
साहित्य : हरभरे – 1 कप, छोटे कांदे चिरुन -1 कप, नारळाचे खोबरे -1 कप, हळद- अर्धा चमचा, गरम मसाला-अर्धा चमचा, मीठ, तेल, मोहरी, लाल मिरच्या, आले-लसूण पेस्ट, नारळाच्या खोबऱ्याचे चौकोनी तुकडे पाव कप, धणेपूड-2 चमचे, लाल तिखट -1 चमचा, टोमॅटो कापून-पाव कप, कढीपत्याची पाने, कोथिंबीर.
कृती :
सकाळी करी करायची असल्यास आदल्या दिवशी रात्री हरभरे पाण्यात भिजत घालावेत. या पाण्यात मीठ घालावे. त्यानंतर हे हरभरे मऊ शिजवून घ्यावे. एका भांड्यात एक चमचा तेल गरम करावे. या तेलात खोबरे, धणेपूड, लाल तिखट आणि गरम मसाला घालून छान मिसळावे. हे सर्व मिश्रण तांबूस होईपरियंत भाजून घ्यावे. करपू देऊ नये. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घ्यावे. आता या रिकामी झालेल्या भांड्यात फोडणी करावी. प्रथम थोडे खोबरेल तेल गरम करावे.
आपण कोणतेही खाद्यतेल वापरु शकता. त्यात थोडी मोहरी आणि लाल मिरच्या घालाव्यात. त्या चांगल्या तडतडू लागल्या की त्यात चौकोनी तुकडे केलेले नारळाचे तुकडे घालावेत. थोडा वेळ ढवळून त्यात आले-लसूण पेस्ट, कांदे, टोमॅटो आणि थोडी कढीपत्त्याची पाने चुरून घालून छान परतून घ्यावे. कांदा-टोमॅटो चांगला मऊसर शिजल्यावर त्यात शिजवलेले हरभरे घालून पुरेसे पाणी ओतावे. गरजेनुसार मीठ घालून ढवळावे. यामध्ये मिक्सरच्या भंड्यात वाटलेले वाटण घालून छान मिसळून घ्यावे. गरजेप्रमाणे पाणी ओतून ही करी उकळून घ्यावी. व्यवस्थित उकळल्यावर वरुन चिरलेली कोथिंबीर घालून झाकून ठेवावी.