रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय

संग्रहालये ही इतिहासाची सर्वंकष माहिती देणारी जिवंत दालनेच असतात, असे म्हणायला हरकत नाही ! या संग्रहालयांना इतिहासप्रेमी पर्यटक आवर्जून भेट देत असतात. देशासह विदेशातील संग्रहालये पाहणारे पर्यटकही अनेक आहेत. इतिहास जागविण्यासाठी संग्रहालये असणे गरजेचे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे ऐतिहासिक रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय आहे. या संग्रहालयात तेर गावातील रहिवासी रामलिंगअप्पा लामतुरे व त्यांचे सुपूत्र भागवतप्पा लामतुरे यांनी संग्रहीत केलेल्या पुरातन वस्तू संवर्धित केल्या आहेत. मुळात या वस्तुंचे जतन लामतुरे या पिता-पुत्रांनी केले होते. रामलिंगअप्पा लामतुरे यांनी सन १९६१ मध्ये हा संग्रह शासनाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. सन १९६७ मध्ये महाराष्ट्र शासनाने हा संग्रह घेण्याचे ठरविले. त्यानंतर सन १९७१ मध्ये लामतुरे यांनी हा संग्रह शासनाकडे प्रदान केला. उस्मानाबादपासून तेर हे गाव २२ किमी अंतरावर आहे.

हे संग्रहालय पहायचे झाल्यास आत तीन दालने आहेत. या दालनांमध्ये सुमारे पंचवीस हजार वस्तू पहायला मिळतात. लामतुरे संग्रहालयात हस्तिदंताच्या स्त्रीमूर्ती आहेत. या मूर्ती त्यावेळी आरशाच्या मुठी म्हणून वापरल्या जात. स्त्रीमूर्तीच्या माथ्यावर भोक आहे. त्यात चकचकीत तांब्याच्या पत्र्याचे आरशाचे दांडे अडकवले जात.अर्थात आरशाची प्रतिमा म्हणून या मूर्ती वापरल्या जात. या संग्रहालयात हस्तिदंतावर कलाकुसर केलेल्या वस्तू, शंखांच्या वस्तू, हाडांच्या वस्तू, मातीच्या वस्तू, खापरे, मणी, दगडांच्या मूर्ती, शाडूच्या मुर्ती तसेच वेगवेगळ्या स्त्री प्रतिमा पहायला मिळतात. येथे सातवाहनकालीन व इतर राजघराण्यांची नाणी आहेत. नाण्यांच्या मातीच्या प्रतिकृती आणि नाण्यांचे साचेसुद्धा पहायला मिळतात. या वस्तुसंग्रहालयात अनेक प्रकारच्या वस्तू आहेत.