कोंडुरा किनारा

ज्येष्ठ साहित्यिक आरती प्रभू यांच्या लेखणीने अजरामर केलेला शांत, सुखद समुद्रकिनारा म्हणजे सिंधुदुर्गातील कोंडुरा किनारा आहे. वेंगुर्ला तालुक्यात माडांच्या सावलीत अलगद विसावलेला हा किनारा म्हणजे निसर्गरम्यतेची मस्त अनुभूती आहे. हा किनारा वेंगुर्ला तालुक्यात आहे. या किनाऱ्यावर पांढरीशुभ्र वाळू, आणि अजस्त्र लाटांनी अणकुचीदार झालेले मोठे- मोठे खडक पहायला मिळतात. वेंगुर्ला तालुक्यापासून बारा किलोमीटरच्या अंतरावर हा किनारा आहे. नारळाची उंचच उंच झाडे असलेला हा स्वच्छ किनारा असून येथे भगवान शंकरांचे सुंदर देवालय आहे.

कोंडुऱ्याच्या समुद्राकडे जायला कोंडुरावाडीहून एक पाणंद आहे. पाणंदीच्या बाजूला आंब्याची झाडे आहेत. पाणंद उतरुन गेल्यावर सागराचे निळेशार पाणी मन लुब्ध करते. या किनाऱ्यावर माडाची उंच झाडे उभी आहेत. पूर्वी समुद्राच्या भरतीचे पाणी वेगाने कोंडुऱ्यात घुसायचे. त्योवळी मोठा आवाज यायचा. तो दूरवर ऐकायला यायचा. याला ‘कोंडुऱ्याची गाज’ म्हणतात. येथील मंदिराकडे कमालीची शांतता आहे. येथील माडांच्या झाडातून पुढे गेल्यावर कोंडुऱ्याची गुहा दिसते. अशा लहानमोठ्या अनेक गुहा तेथे आहेत.

या किनाऱ्यावर दगडांवर समुद्राने केलेले कोरीवकाम पहायला मिळते. समुद्राच्या लाटांनी दगड फोडून विवर बनवली आहेत. हे दगड अतिशय अणकुचीदार बनले आहेत. विस्तीर्ण समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा, बागेतून वाहणारा गोड्या पाण्याचा झरा आणि लिंगेश्वराचे देऊळ हे दृश्य फारच सुंदर आहे. येथे जाण्यासाठी विमानप्रवास करीत असाल तर गोव्यातील मोपा विमानतळ जवळ आहे. वेंगुर्ला शहरातून येथे जाण्यास रिक्षा उपलब्ध असतात.