माणकेश्वर मंदिर

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी देखणी व अप्रतिम शिवमंदिरे आहेत. काही शिवमंदिरे तर प्राचीन असून ती उत्तम कलाकृतीचे दर्शन घडवितात. धाराशिवमध्ये असेच एक माणकेश्वर हे एक सुंदर शिवमंदिर आहे. शिव दर्शनाबरोबरच मुद्दामहून हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. या जिल्ह्यातील भूम तालुक्यात हे मंदिर असून मंदिराचे कोरीवकाम उत्कृष्ट आहे. मंदिराच्या वास्तुकलेमधील विविध कलाकृती लक्षवेधी आहेत. हे मंदिर विश्वकर्मा नदीच्या एका सुंदरशा वळणावर शांतपणे उभे आहे. या मंदिरात महादेवाची मोठी पिंड आहे. सोमवारी तसेच महाशिवरात्रीला येथे भाविकांची गर्दी असते. मंदिरासमोर नंदीमंडप असून त्यात असलेला मोठ्या आकारातील नंदी आकर्षक आहे. या मंदिराचे बांधकाम चालुक्य काळात झाले असल्याचे अनुमान काढले जाते.

महाराष्ट्रातील जी आणखी काही प्राचीन मंदिरे आहेत. त्या पंक्तीत अंबरनाथ-बदलापुरचे शिवमंदिर, खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर, औंढ्याचे नागनाथ मंदिर असून पारंडा तालुक्यातील माणकेश्वर मंदिर एक आहे. या मंदिरांतील अप्रतिम शिल्पे, उत्कृष्ट प्राचीन बांधकाम यामुळे ही मंदिरे विशेष आहेत. माणकेश्वर मंदिर बाराव्या शतकातील आहे, असे सांगतात. या मंदिरात जाण्यासाठी औरंगाबाद-धाराशिव रस्त्यावरील कुंथलगिरीतून जावे लागते. येथे जाणारा रस्ता निसर्गरम्य वातावरणातून जातो. मार्गावर टेकड्या, हिरवळ, तलाव असे सुंदर दृश्य दिसते. या रस्त्याने ‘भूम’पर्यंत जावे लागते. तेथून 11 किलोमीटर अंतरावर माणकेश्वर गाव आहे. या मंदिराचे धाराशिवपासून सुमारे ५५ किमी व भूमपासून जवळपास १९ किमी अंतर आहे. येथे पोहोचल्यावर शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला मिळते. धाराशिव तसेच भूम येथून या मंदिराकडे जाण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध असते.