दुग्धपदार्थ उद्योग

जेवल्यावर थोडं तरी गोड खाण्याची इच्छा ही खूप जणांना होते. त्यात रोज वेगळा गोड पदार्थ हवा अशी मागणी असते. किमान मुंबईमध्ये आपण गल्लोगल्ली मिळाईची दुकाने बघतो. त्या दुकानांत रंगीबेरंगी, विविध चवीच्या मिठायांची रेलचेल असते. कोणती मिठाई घ्यावी, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो; तर अशा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा उद्योग सुरू करुया.
हा उद्योग सुरू करताना मुख्यतः तुम्हांला मुबलक प्रमाणात दूध आणि साखर यांची उपलब्धता घाऊक बाजारातून करून ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या भागात मिठाईचे दुकान सुरू करणार आहोत त्या भागात कोणत्या राज्यातील मंडळी जास्त राहतात याचा अभ्यास करून जर आपण दुग्धपदार्थ उपलब्ध केले, तर येणारी मागणी ही वाढलेली असेल.
या उद्योगासाठीची प्राथमिक गुंतवणूक ही रुपये 3 लाखांपर्यंत असते. हा उद्योग अगदी छोट्या स्वरुपात जरी सुरू करायचा झाला, तरी खवा बनविणारे यंत्र आणि फ्रीजर यांची आवश्यकता असतेच. किमान ५ कामगारांची गरज तुम्हांला हा उद्योग सुरू करण्यासाठी असते.
दुग्धपदार्थ उद्योगाला सर्वच क्षेत्रात मागणी आहे. त्यामुळे आपण आपल्या उद्योगाला उपहारगृहे, सण – सोहळे, मॉल्स, बेकरी यांच्यासोबत जोडून घेऊ शकतो. जेणेकरून त्यांच्याकडून येणारी मागणी ही थेट आपल्याला मिळेल. आपल्या उद्योगाची आकर्षक जाहिरात करणे, उद्योगातील दुग्धपदार्थांचा दर्जा, चव सांभाळणे हे आपले कर्तव्य असते.